आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जीआयएस डाटाबेसप्रकरणी 'सायबर टेक'ला महापालिकेने दुसऱ्यांदा टाकले काळ्या यादीत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - सायबर टेक सिस्टिम अँड सॉफ्टवेअर कंपनीला महापालिकेने दुसऱ्यांदा काळ्या यादीत टाकले आहे. मागील वर्षीच्या मालमत्ता करानंतर आठ वर्षांपूर्वीच्या नगर रचना विभागाच्या प्रकरणात काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय आयुक्त हेमंत पवार यांनी शुक्रवार, २० एप्रिल रोजी घेतला. कंपनीला सात दिवसांत १.३३ कोटी रुपये मनपाला परत करावे लागणार आहे. शहराचे जीआयएस डाटाबेस अर्धवट तयार केल्याची बाब समोर आल्याने हा निर्णय घेण्यात आला. 

 

महापालिका क्षेत्रातील विकास कामे, सेवा, खासगी मालमत्ता, रस्ते, नाल्या, भुयारी गटार योजना, खुले भूखंड, महापालिकेचे भूखंड, मनपाच्या मालमत्ता, विजेचे खांब, बगिचे याबाबत इत्थंभूत माहिती संकलित करत त्या माहितीचा हाय रेझुलेशन सॅटेलाइट इमेजचा वापर करून जीआयएस डाटाबेस तयार करण्याचे काम या कंपनीला दिले होते. २०११ मध्ये दिलेले काम ५२ आठवड्यांत पूर्ण करणे बंधनकारक होते. महापालिकेची हद्द तयार करणे, झोन निहाय व वाॅर्ड निहाय हद्द तयार करणे आवश्यक होते. शहरातील संपूर्ण मालमत्तांचे मुख्य लेअर तयार करून भौगोलिक स्थळदर्शक माहिती, मालमत्ता प्रकारानुसार संपूर्ण माहिती गोळा करणे गरजेचे होते. 
शहरातील संपूर्ण रस्त्यांची मुख्य लेअर तयार करणे. रस्त्याच्या प्रकारानुसार मालकी, माहिती, बांधकाम वर्ष, प्रकार, निधी, लांबी, रुंदी, डांबरी, काँक्रीट, कच्चा, खडीकरण, बायपास, वन-वे, टू-वे, फ्लायओव्हर, राज्यमार्ग, राष्ट्रीय महामार्ग अशी संपूर्ण माहिती संगणक प्रणालीत अंतर्भूत करणे बंधनकारक होते. याप्रमाणे आरोग्य, पाणी पुरवठा, सुरू असलेले प्रकल्प याबाबत देखील इत्थंभूत माहिती समाविष्ट करणे गरजेचे हाेते. मात्र कंपनीकडून करारनामा प्रमाणे माहिती संकलित केली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली. २४ ऑक्टोबर २०१७ राेजी चौकशी समितीसमोर सादरीकरण करण्याची संधी कंपनीला देण्यात आली होती. मात्र महापालिकेला उपलब्ध करून देण्यात आलेली लिंक कार्यान्वित नसल्याची बाब समोर आली. 
एकूण १ कोटी ४८ लाख रुपयांचे कंत्राट कंपनीला देण्यात आले होते. विशेष म्हणजे तत्कालीन अधिकाऱ्यांनी सायबर टेकला १ कोटी ३३ लाख ८१ हजार ५४७ रुपये अदा देखील केले. मात्र लाॅग इन व पासवर्ड मनपाला दिले नाही. १ कोटी ३३ लाखांची रक्कम दिल्यानंतर देखील प्रणाली मनपाला वापरण्याकरिता दिली नसल्याने फसवणूक केल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. निविदेनुसार काम पूर्ण करून द्यावे, त्यासंदर्भात सात दिवसांच्या आत वेळापत्रकासह लेखी हमी सादर करावी लागणार आहे. अन्यथा सात दिवसात १ कोटी ३३ लाख रुपये मनपाला परत करावे असे अायुक्तांच्या आदेशात नमूद आहे. 


कंपनीकडून करारनाम्याच्या व्याप्तीनुसार काम पूर्ण करता आले नाही. तसेच महापालिकेची आर्थिक फसवणूक केली आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त हेमंत पवार यांनी शुक्रवार, २० एप्रिल रोजी पाच वर्षाकरिता सायबर टेक सिस्टिम अँड साॅफ्टवेअर लि. ठाणे या कंपनीला पाच वर्षांकरिता काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय घेतला आहे. 


मालमत्ता कर प्रकरणात कारवाई 
शहरातील इमारतींचे सर्वेक्षण व पुन:करनिर्धारणाचे कार्य देण्यात आलेल्या सायबर टेक सिस्टिम अँड साॅफ्टवेअर लि. या कंपनीला एक वर्षांपूर्वी काळ्या यादीत टाकले आहे. एप्रिल २०१७ मध्ये आयुक्त हेमंत पवार यांनी घेतलेल्या निर्णयात कंपनीची बँक गॅरंटी देखील गोठवण्यात आली होती. 

बातम्या आणखी आहेत...