आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फवारणी बळींच्या वारसांना 4 लाख द्या; नुकसान भरपाईसाठी ठाेस धाेरण अाखा; हायकोर्टाचे आदेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- कीटकनाशक फवारणी मृत्यू प्रकरणांमध्ये मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना देय नुकसान भरपाईत आणखी दोन लाखांची भर घालून पीडित कुटुंबीयांना एकूण चार लाखांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी राज्य शासनाला दिले. तसेच कर्तव्यात कसूर केलेल्या संबंधित अधिकाऱ्यांची तीन महिन्यांत विभागीय चौकशी पूर्ण करावी, गंभीर कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी कारवाई करावी, असे निर्देशही न्या. भूषण धर्माधिकारी आणि न्या. स्वप्ना जोशी यांच्या खंडपीठाने दिले. याशिवाय अशा मृत्यू प्रकरणांत नुकसान भरपाईची किमान रक्कम नेमकी किती असावी याबाबतचे ठोस धोरण तीन महिन्यांत राज्य शासनाने आणावे, असेही न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केले. कीटकनाशक फवारणी मृत्यू प्रकरणांवर सामाजिक कार्यकर्ते जम्मू आनंद यांनी दाखल केलेली जनहित याचिका कोर्टाने गुरुवारी निकाली काढली. 

 

शेतकऱ्यांच्या कार्यशाळा घ्या

कीटकनाशकांचा सुरक्षित वापर कसा करावा, त्यासाठी नेमकी काय काळजी घ्यावी, याबाबत शेतकऱ्यांना जागृत करणे आवश्यक आहे. त्यासाठी कृषी विभाग, सामाजिक संस्था, कीटकनाशक कंपन्यांनी एकत्रित येऊन शेतकाऱ्यांसाठी पावसाळा सुरू होण्यापूर्वी कार्यशाळा आयोजित कराव्या. त्यात शेतकरी -शेतमजुरांच्या सहभागाचे प्रयत्न करावे. कार्यशाळांमध्ये तज्ज्ञ आणि कंपन्यांच्या प्रतिनिधींनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. सहभागी शेतकरी, शेतमजुरांना प्रशिक्षणाची प्रमाणपत्र द्यावी. शेतकऱ्यांनी फवारणीच्या कामासाठी शक्यतोवर अशा प्रमाणपत्रप्राप्त मजुरांकडूनच कामे करून घ्यावी, अशी सूचनाही उच्च न्यायालयाने आदेशात केली आहे. फवारणी मृत्यूच्या घटना झालेल्या सहा तालुक्यांमध्ये अशा कार्यशाळा घेण्यावर अधिक भर असावा, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

 

मृत्यू प्रकरणे दडपली जात आहेत 
याचिकाकर्त्यांचे वकील म्हणाले, राज्य सरकारने २१ प्रकरणांत मृतांच्या वारसांना २ लाखांची नुकसान भरपाई दिली आहे. राज्यात फवारणीमुळे विषबाधा होऊन शेतकरी मृत्यूच्या ५१ घटना घडल्या. सरकार मृत्यूची प्रकरणे दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यावर कोर्टाने भरपाईची रक्कम आणखी दोन लाखांनी वाढवण्याचे निर्देश शासनाला दिले. त्यामुळे अद्याप भरपाई न मिळालेल्या इतर ३० शेतकऱ्यांनाही चार लाखांची नुकसान भरपाई मिळणार आहे. 

 

नुकसान भरपाईचे धोरण आखा
रेल्वे वा इतर अपघातांत मृतांच्या वारसांना किमान १० लाखांची मदत मिळते. त्यामुळे फवारणी मृत्यूसारख्या घटनांमध्ये पीडित कुटुंबीयांना नेमकी किती किमान नुकसान भरपाई द्यायला हवी, याबाबतचे ठोस धोरण ३ महिन्यांत आखण्याचे आदेश कोर्टाने दिले. 

 

घातक कीटकनाशकांवर बंदी?
कीटकनाशक कंपन्या व वितरकांकडून भरपाई वसुली करता येईल का, हे सरकारने तपासून पाहावे. तसेच या कीटकनाशकांचा प्रसार रोखण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करावा, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

 

कोर्ट म्हणाले

कीटकनाशकांचा सुरक्षित वापर, काय काळजी घ्यावी याबाबत शेतकऱ्यांना जागृत करावे. कृषी विभाग, सामाजिक संस्था, कीटकनाशक कंपन्यांनी एकत्रित येऊन कार्यशाळा आयोजित कराव्यात. 

 

 

बातम्या आणखी आहेत...