आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष; देशात 26 पाणवठ्यांना ‘रामसर’ दर्जा, राज्याची पाटी कोरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- जगातील १६० देशांमध्ये स्थलांतरित पाणपक्ष्यांच्या संरक्षणासाठी इराणमधील रामसर येथे २ फेब्रुवारी १९७१ रोजी सामंजस्य करार झाला होता. या करारानुसार २० हजारांपेक्षा जास्त पाणपक्षी आढळून येणाऱ्या पाणवठ्यांना ‘रामसर’ दर्जा मिळाला. भारतात असे २६ रामसर पाणवठे आहेत. मात्र, कराराला ४६ वर्षे होऊनही महाराष्ट्रातील एकाही पाणवठ्याला दर्जा मिळालेला नाही.   


आंतरराष्ट्रीय पातळीवर स्थलांतरित पाणपक्ष्यांच्या संरक्षणासाठी १६० देशांमध्ये २ फेब्रुवारी १९७१ रोजी झालेल्या करारावर भारतानेदेखील स्वाक्षरी केली होती. विविध राज्यांनी केंद्राच्या माध्यमातून पाणवठ्यांना रामसर दर्जा देण्याचे प्रस्ताव दिल्याने देशभरातील २६ पाणवठ्यांना हा दर्जा मिळाला. मात्र, महाराष्ट्राच्या वन विभागाने नांदूर मधमेश्वर, जायकवाडी प्रकल्प, लोणार सरोवर, हतनूर धरण, ठाण्याची खाडी, उजनी धरण व शिवरी (मुंबई) हे सात पाणवठे रामसरच्या दर्जात समाविष्ट होऊ शकतील, अशी स्थिती आहे. तरीही राज्याच्या वन विभागाने केंद्राकडे रामसर दर्जाबाबत प्रस्ताव पाठवलेला नाही. 

 

रामसरमुळे होणारे फायदे
रामसर दर्जा मिळाल्यास या पाणवठ्यांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्व वाढेल. पाणवठ्यांच्या संगोपन व व्यवस्थेवर लक्ष केंद्रित होईल. पक्ष्यांच्या अधिवासाला संरक्षण व पाणवठ्यांना पर्यटनाचा दर्जा मिळून आर्थिक उलाढाली वाढतील, असे फायदे अपेक्षित आहेत. रामसर दर्जासाठी किंवा दर्जा दिलेल्या पाणवठ्यांच्या संरक्षण व उपाययोजनांसाठी दर तीन वर्षांनी १६० देशांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक घेतली जाते. यंदाची बैठक दुबईत होणार आहे. 

 

दर्जासाठीचे निकष
पाणवठ्याजवळ २० हजारांपेक्षा जास्त व किमान १०० पेक्षा अधिक प्रजातींचे पक्षी असावेत. स्थलांतरित पक्ष्यांचे प्रमाण जास्त असावे, जागतिक पातळीवरील स्थलांतरित धोकाग्रस्त प्रजातींमधील किमान एक टक्का पक्षी आढळून यावेत, पाणवठ्यांमध्ये सहा मीटरपेक्षा जास्त पाणीसाठा नसावा, शाश्वत खाद्याचा मुबलक पुरवठा असावा. 


जम्मू-काश्मीरमध्ये प्रमाण अधिक  
जगभरात सर्वाधिक ६५ रामसर पाणवठे ऑस्ट्रेलियात. अल्जेरिया ५०, कॅनडा ३७, चीन ४९, डेन्मार्क ४३, फिनलंड ४९, जर्मनी ३४, हंगेरी २९, तर भारतात केवळ २६ पाणवठ्यांना रामसर दर्जा देण्यात आला आहे. त्यातही काश्मीर व ओडिशातील पाणवठ्यांचे प्रमाण अधिक आहे. 

 

तीन प्रस्ताव पाठवले  
राज्यभरातील हतनूर धरणासह तीन पाणवठ्यांना रामसर दर्जा मिळावा, यासाठी बीएनएचएसच्या माध्यमातून राज्य सरकारला तीन प्रस्ताव दिले आहेत. मात्र, यावर अद्याप पुढील प्रक्रिया झालेली नाही. हतनूरसह राज्यातील किमान सहा जलाशयांना रामसरचा दर्जा मिळू शकतो, मात्र राज्य शासनाची उदासीनता आडवी येते.  

- अनिल महाजन, अध्यक्ष, चातक निसर्ग संवर्धन संस्था

बातम्या आणखी आहेत...