आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यास समन्वयाने काम करा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व संबंधित विभाग, घटक व यंत्रणांनी एकत्रितपणे व समन्वयाने काम करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण आणि भूमि उपयोग नियोजन केंद्रात कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन-उपाययोजना यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले. 


यावेळी केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग, कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, कृषीमुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, आमदार रणधीर सावरकर, आमदार आशिष देशमुख, विजय जावंधिया, कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विजय कुमार, कृषी आयुक्त विजय झाडे व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. ही बैठक सुमारे साडेतीन तास चालली. 


कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या विविध उपाययोजना यासंदर्भातील पुस्तिका, माहितीपत्रक व भिंतीपत्रक तसेच 'आत्मा' नागपूर यांच्यामार्फत विकसित करण्यात आलेल्या एन.ओ. एफ.पी.सी. या ब्रँडचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासंदर्भातील माहिती शेतकऱ्यांपर्यंत त्यांच्या बांधावर पोहोचून देण्यात यावी. बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनामार्फत मदत देण्याचे काम सुरु आहे. सेंद्रिय शेती सर्वांर्थाने उपयुक्त असून या शेतीला तसेच गटशेतीच्या संकल्पनेलाही प्रोत्साहन देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. गुजरातच्या शेतकऱ्यांनाही या संकटाला सामोरे जावे लागले. तेथे योजलेल्या उपायांना सर्व संबंधितांनी समन्वयाने आणि वेळेत त्यांची कामे केल्यामुळे यश लाभले. याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले आणि आपल्या यंत्रणांना बोंडअळीवरील उपायाबाबत शेतकऱ्यांशी थेट संवाद साधावा लागेल असे सांगितले. 


केंद्रिय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. विजय वाघमारे म्हणाले, बिटी कपाशीचा आपण स्विकार केला. मात्र कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी कपाशीचा हंगाम जानेवारी महिन्यापर्यंतच घेणे, पीकांमध्ये बदल करणे, आश्रय पिके घेणे यासारखे बदल करण्याची आवश्यकता आहे. नकली बियाणांचा वापर शेतकऱ्यांनी कटाक्षाने टाळावा असेही, डॉ. वाघमारे यांनी सांगितले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. बी. व्यंकटेश्वरलु म्हणाले, प्रतिबंधासाठी कडूनिंबाचा वापरही उपयुक्त ठरत असल्याचे निर्देशनास आले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास भाले, गुजरातचे कृषी विभागाचे उपसंचालक पि.बी. खिस्तारिया यांनीही गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या विविध उपाय योजना संदर्भातील सादरीकरण केले. 


शेतकऱ्यांची फसवणूक होऊ देणार नाही: फुंडकर 
कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर म्हणाले, कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभागाने यंदा तातडीने उपाययोजना करण्याचे ठरविले असून यासंदर्भात शेतकऱ्यांपर्यत याबाबतची माहिती पोहोचवून त्यांना प्रशिक्षित करण्यात येईल. बिटी बियाणांबरोबरच देशी बियाणेही शेतकऱ्यांना उपलब्ध करुन द्यावे लागेल. दोषी असलेल्या बियाणे कंपन्यांवर कारवाई करण्यात आली असून कृषी विभाग सतर्क असून शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारची फसवणूक होऊ दिली जाणार नाही, असेही श्री. फुंडकर यांनी सांगितले. 


नवे तंत्रज्ञान पोहोचवावे 
केंद्रिय कृषी मंत्री राधामोहन सिंग म्हणाले, कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यास विविध उपाययोजना, तसेच यासंदर्भातील नवे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे. ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांना नुकसान भरपाई देण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...