आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानागपूर- ‘आपल्या समाजात तृतीयपंथी म्हणून वावरणं म्हणजे काय असतं? याचा भयावह अनुभव आम्ही आजवर घेतला आहे. आता कुठं परिस्थिती थोडीफार बदलायला सुरुवात झाली. अवहेलना, उपेक्षा आणि तिरस्काराच्या भावनेकडून आम्हीही माणूस आहोत, या भावनेतून आमच्याकडे बघायला सुरुवात झाली. समाजाने आम्हाला स्वीकारावे, आमच्या समस्या जाणून घ्याव्यात,’ एवढीच आमची अपेक्षा आहे.बारावीपर्यंत शिकलेल्या आणि तृतीयपंथीयांच्या अधिकारांसाठी मागील दहा वर्षांपासून संघर्ष करणाऱ्या विद्याा कांबळे यांची ही भावना आहे. या संघर्षाचा परिणाम म्हणून विद्या कांबळे यांना आता सरकारने लोक अदालतमध्ये न्यायाधीश म्हणून काम करण्याचा सन्मान दिला आहे.
शनिवारी नागपुरात पार पडलेल्या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये तीन जणांच्या पॅनलमध्ये त्यांचा समावेश करण्यात होता. त्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना विद्या कांबळे सांगतात, खरे तर हा माझा नव्हे तर माझ्या सारख्याच हजारो लाखो तृतीयपंथीयांचा हा सन्मान आहे. रोज सहकाऱ्यांसोबत टाळ्या वाजवल्याशिवाय मला करमत नाही. मात्र, आता टाळ्या नाही तर न्यायदानाचे काम केल्याचा वेगळा आनंद आहे. माझ्यासाठी संधी ही महत्त्वाची होती.लोक अदालतीत सहभागी होताना लोकांच्या प्रतिक्रिया काय असतील, याचे थोडे दडपण होते. मात्र, तेथील अनुभव आश्चर्यकारक होता. तेथे मला सन्मान दिला. प्रत्येक जण माझी आस्थेने विचारपूस करीत होता. माझ्यासारख्याच सन्मानाचे आयुष्य माझ्या इतर बांधवांना मिळावे, यासाठी आपले प्रयत्न असल्याचे सांगताना विद्या कांबळे म्हणाल्या, तृतीयपंथीयांच्या समस्या गुंतागुंतीच्या आहेत. त्या सोडवण्याचे आपले प्रयत्न राहतील.
समाजाने आमच्याकडे सन्मानाने बघावे, आमच्या रोजगाराचा प्रश्न सुटावा, हीच अपेक्षा असल्याचे त्या सांगतात. आता टाळ्या वाजवणार नाही. सन्मानाचे आयुष्य जगणार, असा निर्धारही त्यांनी या वेळी व्यक्त केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.