आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानागपूर- रस्त्यांवरील खड्ड्यांवरून कायम चर्चेत राहणाऱ्या विदर्भाची रस्ते विकासातील कूर्मगती कायम आहे. मात्र, मराठवाड्याने निश्चित लक्ष्यपूर्ती करत ११८ टक्के रस्त्यांची विकासकामे केली आहेत, असे विदर्भ वैधानिक विकास मंडळाने विधिमंडळात नुकत्याच सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे. यातून राज्यातील रस्ते उभारणीत विदर्भात सातत्याने येत असलेल्या अपयशाकडे शासनाचे लक्ष वेधले.
विदर्भातील रस्ते विकासाचा वेग राज्याच्या सरासरीच्या तुलनेतही बराच मागे पडल्याचे मंडळाने नमूद केले आहे. इंडियन रोड काँग्रेसच्या मार्गदर्शनानुसार राज्यात सध्या रस्ते विकासाच्या २००१ ते २०२१ या योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. या योजनेनुसार राज्यात ३,२७,०६९ किमी लांबीच्या रस्ते विकासाचे लक्ष्य ठेवले गेले. त्यात विदर्भात ९४,२४१ किमी, कोकण, नाशिक व पुणे विभागाचा समावेश असलेल्या उर्वरित महाराष्ट्राचे १,७७, १७३ तर मराठवाड्याचे ५५,६५४ किलोमीटर रस्ते विकासाचे लक्ष्य आहे. लक्ष्याच्या तुलनेत विदर्भातील रस्ते विकासाची २०१६ पर्यंतची उपलब्धी ६६ हजार २०९ किलोमीटर म्हणजेच केवळ ७० टक्केच असून मराठवाड्यात मात्र आपले लक्ष्य केव्हाच गाठत त्याहीपलीकडे म्हणजेच ६५ हजार ६८५ किलोमीटर रस्त्यांची (११८ टक्के) उभारणी झाल्याचे दिसून आले. रस्ते विकासात उर्वरित महाराष्ट्रदेखील आघाडीवर असून १ लाख ६८ हजार ६९५ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचा विकास साधत उर्वरित महाराष्ट्राने ९५ टक्के लक्ष्य पूर्ण केल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यातही ग्रामीण रस्ते विकासात विदर्भाची मोठ्या प्रमाणात पीछेहाट होत असल्याचे आढळून आले आहे. राज्यातील एकूण १ लाख ४५ हजार ८८१ किलोमीटरच्या ग्रामीण रस्त्यांमध्ये विदर्भात केवळ २६ हजार २८२ किलोमीटरचेच रस्ते उभारणे शक्य झाले असून राज्यात हे प्रमाण केवळ १८ टक्के असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. तुलनेत उर्वरित महाराष्ट्रात ८८ हजार २३१ किलोमीटर तर मराठवाड्यात ३१ हजार ३६८ किलोमीटर लांबीचे ग्रामीण रस्ते उभारणे शक्य झाल्याचे दिसून येत आहे. मोठे राज्य महामार्ग, राज्य महामार्ग, मोठे जिल्हास्तरीय रस्ते आणि अन्य जिल्हा मार्गांच्या उभारणीतही विदर्भाची कामगिरी निराशाजनक राहिल्याचे चित्र आहे. रस्त्यांमुळे विकासाला चालना मिळत असताना विदर्भातील रस्ते विकासाचे चित्र पुरते निराशाजनक असल्याचे मंडळाने नमूद केले आहे. विदर्भात रस्ते विकासाची गती तातडीने वाढवण्याची गरज असल्याचे मतही मंडळाने व्यक्त केले आहे.
पुढील स्लाइडवर पाहा, मंजूर झालेले रस्त्याचे विकासकाम...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.