आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानागपूर- सध्या सूर्य तापदायक ठरत आहे. उन्हाने कहर केला आहे. रखरखत्या उन्हामुळे जीवाची काहिली होत आहे. अशा वातावरणात विदर्भात मान्सून ८ जूनकडे सक्रिय होण्याची दिलासादायक शक्यता आहे. यावर्षी केरळमध्ये मान्सून तीन दिवस आधी म्हणजे २९ मे रोजी दाखल होत आहे. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर ९ दिवसांनी विदर्भात सक्रिय होतो. हे लक्षात घेतले तर ८ जूनकडे विदर्भात दाखल होईल, अशी दाट शक्यता आहे.
मान्सून दोन ठिकाणाहून सक्रिय होतो. अरेबीयन समुद्रातून वारे तीव्र राहिले तर आधी मान्सून कोकणात येतो. तिथून मुंबई आणि त्या नंतर विदर्भात येतो. तर बंगालच्या खाडीत वारे तीव्र राहिल्यास आंध्र व तेलंगणाकडून विदर्भात पाऊस येतो. विदर्भात साधारणत: बंगालच्या खाडीतूनच मान्सून येतो, असे प्रादेशिक हवामान केंद्राचे संचालक ए. डी. ताथे यांनी सांगितले.
विदर्भात मान्सून सक्रिय झाल्याच्या गेल्या सात आठ वर्षातील तारखा पाहिल्यास १० ते १५ जून या कालावधीत मान्सून सक्रिय होतो. गेल्या २५ ते ३० वर्षात एकदाच ७ जूनला मान्सून सक्रिय झाला होता. अगदी २४ व २८ जूनलाही पाऊस आलेला आहे. पण यावर्षी मात्र पाऊस ७ ते १० जून दरम्यान येईल, अशी शक्यता ताथे यांनी वर्तविली.
चंद्रपूर @४७.८ दशकातील सर्वाधिक, ब्रम्हपुरी ४७.१ अं. से.
शनिवार १९ मे रोजी चंद्रपूर येथे गेल्या दशकातील तसेच देशातील सर्वाधिक कमाल ४७.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. तर ब्रम्हपुरी येथे कमाल ४७.१ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. शनिवार १९ मे रोजी नागपुरात ४६.३, अकोला येथे ४४.७, अमरावती ४४.६, गोंदिया ४४.२, वर्धा ४५.६, यवतमाळ ४४.५, वाशिम ४३.६, गडचिरोली ४३.२ अंश से. तापमान नोंदविण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.