आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अमरावती - 'एमबीए' शिक्षित युवतीला स्थळ दाखवण्याच्या बहाण्याने शिर्डीत नेऊन शहरातील एका सुवर्ण व्यावसायिकाने तिचे लैंगिक शोषण केले. तसेच तिचे अश्लील छायाचित्र काढून व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल केले. दरम्यान मुंबईतील एका उच्चशिक्षित तरुणासोबत युवतीचे लग्न जुळताच नियोजित वराला युवतीचे अश्लील छायाचित्रे दाखवून त्यानेच लग्नही मोडल्याचा आरोप पीडित युवतीने तक्रारीत केला आहे. या प्रकरणात फ्रेजरपुरा पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्या सुवर्ण व्यावसायिकाला गुरुवारी रात्री अटक केली आहे.
नरेंद्र विठ्ठलराव गुहे (४८, रा. रवी नगर) असे पोलिसांनी अटक केलेल्या सुवर्ण व्यावसायिकाचे नाव आहे. ग्रामीण भागात राहणारी एक २९ वर्षीय २०१० मध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी शहरात आली. ती भाड्याने खोली करून राहत असताना तिची ओळख ४८ वर्षीय सुवर्ण व्यापाऱ्यासोबत झाली. हा व्यक्ती परिचित असल्यामुळे युवतीचे त्याच्या घरी जाणे येणे होते. दरम्यान युवतीला तिच्यासाठी स्थळ दाखवण्यासाठी गुहेने आठ वर्षांपूर्वी पहिल्यांदा तिला शिर्डीत नेले. त्या ठिकाणी लॉजवर थांबून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर युवतीच्या अश्लील छायाचित्राच्या आधारे तिचे अनेकदा शोषण केले. तसेच त्याच छायाचित्राच्या आधारे काही महिन्यांपूर्वी युवतीचे जमलेले लग्नही त्यानेच तोडले, असे आरोप करून पीडितेने या नरेंद्र गुहेविरुद्ध गुरुवार, १९ एप्रिल रोजी रात्री फ्रेजरपुरा पोलिसांत तक्रार दिली.
एमबीए शिकत असताना युवतीला एकदा २५ हजारांची अडचण आली, तर सुवर्ण व्यावसायिकाने रक्कम देऊन तिला मदतही केली होती. मात्र ही रक्कम युवतीने त्याला परत केली असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान यातून संबंध वाढले व तिने नरेंद्र गुहेच्या घरी भाड्याने खोली घेतली होती. शिवाय तो परिचित असल्यामुळे त्यानेच युवतीच्या आईवडिलांना तिच्यासाठी चांगले स्थळ दाखवतो, असे सांगितले होते. त्याने याच संधीचा फायदा घेऊन युवतीच्या वडिलांना सांगितले की, शिर्डीला एक चांगला मुलगा आहे. मुलीलाच घेऊन जातो व त्याचे घर, दार पाहून येतो तसेच इतरही माहिती घेतो. त्यामुळे २० मार्च २०१० रोजी नरेंद्र गुहे व ही युवती शिर्डीला गेले. २० मार्चला रात्री त्याने शिर्डी येथील साई सूरज लॉजवर मुक्काम केला. त्याच रात्री त्याने युवतीला म्हटले की, तुझे लग्न मी जुळवू शकतो, तर तोडूसुद्धा शकतो. लग्न तोडायचे नसेल तर मी म्हणतो तसे कर असे म्हणून अतिप्रसंग केल्याचा आरोप पीडितेने तक्रारीत केला आहे. याचवेळी युवतीचे काही अश्लील छायाचित्र त्याने काढून ठेवले होते. या छायाचित्राच्या आधारे गुहेने युवतीवर वारंवार अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद आहे. नकार दिल्यास ही छायाचित्र सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल करण्याची धमकीसुद्धा गुहेने दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यामुळे पीडिता अनेक महिने लैंगिक अत्याचार निमूटपणे सहन करत होती. दरम्यान, पीडितेने तिचा मोबाइल क्रमांक बंद केला. त्यानंतर गुहेने अश्लील भाषेचा वापर करून तिला अनेक ई मेल पाठवल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे. तक्रार प्राप्त होताच ठाणेदार आसाराम चाेरमले, अमोल मनोहर, सतीश विघे व अन्य कर्मचाऱ्यांनी गुहेला घरी जाऊन अटक केली आहे. दरम्यान, हे प्रकरण शिर्डीला घडले असल्यामुळे फ्रेजरपुरा पोलिस हे प्रकरण व आरोपीला शिर्डी पोलिसांच्या स्वाधीन करणार आहे, अशी माहिती फ्रेजरपुरा पोलिसांनी दिली आहे.
मुंबईत जमले होते पीडितेचे लग्न
सदर पीडित युवतीचे काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका उच्चशिक्षित तरुणासोबत लग्न जमले होते. सुखी संसाराचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणीला काही दिवसांतच त्या तरुणाने लग्नासाठी नकार दिला. कारण युवतीचे अश्लील छायाचित्र त्या युवकाला दाखवण्यात आले होते व ते काम गुहेने केल्याचे युवतीने पोलिसांना सांगितले आहे. अश्लील छायाचित्र दाखवल्यामुळे एका उच्चशिक्षित तरुणीचा सुखी संसार सुरू होण्यापूर्वीच विस्कटला आहे.
ई-मेलचा गठ्ठाच युवतीने दिला तक्रारीसोबत पोलिसांकडे
सुवर्ण व्यावसायिक नरेंद्र गुहेने मागील काही महिन्यांत पीडितेला अनेक ई मेल करून त्यामध्ये घाणेरड्या भाषेचा व अश्लील शब्दांचा वापर केला आहे. त्यामुळे त्रस्त झालेल्या युवतीने त्या सर्व ई मेलच्या प्रिंट काढून पोलिसांकडे तक्रारीसोबत दिल्या आहेत. जवळपास ४० च्या आसपास प्रिंट असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
मोबाइल जप्त केला
युवतीने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून नरेंद्र गुहेला अटक केली. तसेच त्याने अश्लील छायाचित्र काढल्याचा आरोप तक्रारीमध्ये केला आहे. त्यामुळे त्याचा मोबाइल जप्त केला आहे. सदर प्रकरण शिर्डी येथे घडल्याने आम्ही सदर गुन्हा व आरोपीला शिर्डी पोलिसांच्या स्वाधीन करणार आहे.'' - आसाराम चोरमले, ठाणेदार, फ्रेजरपुरा.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.