आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

४४८ आंदोलक शेतकऱ्यांवरील २४ गुन्हे मागे घेण्याचे पोलिसांना आदेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - शहरासह जिल्ह्यातील २४ प्रकरणांतील ४४८ शेतकऱ्यांविरुद्धचे आंदोलन काळातील गुन्हे मागे घेण्याचे आदेश शासनाने पोलिस विभागाला दिलेत. या आदेशानुसार कोणत्या प्रकारचे गुन्हे दाखल आहे, या प्रकारचा सविस्तर अहवाल शहर व ग्रामीण पोलिसांनी तयार केला असून तो शासनाला पाठवणार आहे. 

 

अनेकदा शेतकऱ्यांकडून शासनाविरोधात किंवा अन्य न्याय मागण्यांसाठी विविध प्रकारची आंदोलने केली जातात. या आंदोलनांनतर पोलिसांकडून शेतकऱ्यांविरुद्ध विविध प्रकारचे गुन्हे दाखल होतात. आंदोलनादरम्यान दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घेण्यात यावे, असे आदेश शासनाने पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे पोलिसांनी आता शेतकऱ्यांविरुद्ध दाखल गुन्ह्यांची माहिती शासनाकडे पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आयुक्तालयाच्या हद्दीत व जिल्ह्यात २०१७ या वर्षात जवळपास २४ प्रकरणे दाखल झाली असून, त्यामध्ये ४४८ शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल आहेत. 


रास्ता रोको, धरणे, मुख्य मार्गावर टायरची जाळपोळ करणे अशा प्रकारची आंदोलने शेतकऱ्यांकडून अनेकदा केली जातात. यामुळे त्यांच्याविरुद्ध संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल होतात. बहुतांश वेळी दखलपात्र गुन्ह्यांचा समावेश असतो. हे सर्व गुन्हे सरसकट मागे घेण्याचे आदेश शासनाने पोलिस विभागाला दिले आहेत. त्यासाठी शासनाने पोलिसांकडून आंदोलनाचे स्वरूप, कोणते गुन्हे दाखल आहेत, याबाबत सखोल माहिती देऊन सदर गुन्हा मागे घ्यायचा किंवा नाही, याबाबत अभिप्राय देण्यात यावा. सदर अभिप्राय शासकीय अभियोक्ता यांनीही स्वतंत्रपणे सादर करावा, आंदोलनादरम्यान सदर खटला न्यायप्रविष्ट असल्यास ते सुद्धा कळवावे, अशा सविस्तर माहितीचा प्रस्ताव पोलिसांना शासनाकडून मागवण्यात आला . 


सर्वच प्रकारच्या गुन्ह्यांचा समावेश 
आंदोलना दरम्यान मुंबई पोलिस कायदा १३५, रस्ता अडवणे, विनापरवानगी जमाव एकत्र येणे तसेच काही आंदोलन चिघळल्यामुळे त्यामध्ये दंगल घडवणे, दगडफेक, पोलिसांसोबत धक्काबुक्की करणे यासारखे गंभीर गुन्हेही दाखल असल्याची माहिती आहे. 


अहवाल तयार झाला आहे 
 शेतकऱ्याविरुद्ध दाखल असलेले गुन्हे मागे घेण्याबाबत शासनाचे पत्र आले. या संदर्भातील अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे लवकरच पाठवणार आहे. गुन्हे मागे घेण्याचा निर्णय शासन व जिल्हाधिकाऱ्यांचा आहे. एम. एम. मकानदार, अप्पर पोलिस अधीक्षक.


मागील वर्षी जिल्ह्यात झाले काही आंदोलने 
२०१७ या वर्षात जिल्ह्यात व पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत जवळपास २४ आंदोलनांमध्ये गुन्हे दाखल आहेत. यामध्ये २१ गुन्हे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत असून या आंदोलनांमध्ये जवळपास ४२५ आंदोलकांविरुद्ध गुन्हे दाखल झालेले आहेत. 

बातम्या आणखी आहेत...