आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती: निम्मे शेतकऱ्यांवर कर्जाच्या ओझ्याचे भूत अद्याप कायम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- सोयाबीनची नापिकी, संत्र्याच्या गळतीने रिकाम्या झालेल्या बागा कपाशीवरील बोंडअळ्यांनी शेतकऱ्यांचे खिसे फाटकेच ठेवल्याचे भयाण वास्तव आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यात केवळ कर्जमाफी योजनेचे ५३.५३ टक्के शेतकरीच लाभार्थी ठरल्याने उर्वरित शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचे भूत नेमके कधी उतरणार हा प्रश्न आता गावपातळीवर उपस्थित केला जात आहे. 


जिल्ह्यात खरीप हंगामातील प्रमुख पीक सोयाबीन, मूग, उडदाची हवामानातील बदलामुळे दारूण अवस्था झाली. सोयाबीनचे एकरी एक पोते उत्पादन होत असल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीनवरून ट्रॅक्टर फिरवले. मूग उडदाचीही हिच परिस्थिती होती. त्यामुळे कोरडवाहू पट्ट्यात शेतकऱ्यांची आशा कपाशीवर टिकून होती. मात्र बोंडअळीने अखेरच्या क्षणी घात केल्याने नाउमेद झालेल्या शेतकऱ्यांच्या आशा आता तूर हरभऱ्याच्या पिकावर टिकून आहेत. परंतु जिल्ह्यात तुरीचेही पीक समाधानकारक नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे. बागायत पट्ट्यातील प्रमुख नगदी पीक संत्राही गळतीमुळे गारद झाला. त्यामुळे सलग तिसऱ्या वर्षी संत्रा उत्पादकांचे लावलेल्या खर्चाचे मुद्दलही निघू शकले नाही. अशी दयनीय स्थिती खेडोपाडी असताना कर्जमाफीचा तात्पुरत्या दिलाशाचा आशेचा किरण शिल्लक होता. मात्र खरीप हंगाम उलटून रब्बी सुरू झाला, तरी कर्जमाफीचे पुराण संपता संपत नसल्याचा अनुभव शेतकरी घेत आहेत. 


प्रशासकीय पातळीवरील चुका, तांत्रिक घोळ, ऑनलाइन अर्ज आदी सर्कस करूनही जिल्ह्यात केवळ ५३.५३ टक्केच शेतकऱ्यांना कर्जमाफी होऊ शकली. त्यामुळे उर्वरित शेतकऱ्याचे काय, असा प्रश्न निर्माण झाला. कर्जमाफी योजनेत शासनाने विविध सवलती, पुनर्गठीत कर्जाचे हप्ते, कर्ज परतफेडीसाठी मुदतवाढ आदी आकर्षक ‘योजना’ शेतकऱ्यांसाठी जाहीर केल्यात. परंतु पीक उत्पन्नाची स्थिती गंभीर, शेतमालाला मातीमोल भाव या स्थितीत शेतकरी हप्त्यांची परतफेड तरी कशी करणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच कर्जमाफीचा लाभ निम्म्याच शेतकऱ्यांना झाला असून उर्वरित ऑनलाइन अर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या तपासण्या, पुन्हा अर्ज भरणे आदींचे दिव्य पुन्हा पार पाडावे लागणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. तोपर्यंत पुन्हा महिना-दोन महिने या प्रशासकीय कामात जाऊन कर्जमाफी होऊन पुन्हा कर्ज मिळाले तरी त्याची परतफेड शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरणार आहे. कर्जमाफीच्या तात्पुरत्या औषधाच्या मात्रेसाठीही शेतकऱ्यांना जंग जंग पछाडावे लागत असल्याने ग्रामीण भागात सध्या भीषण अवस्था निर्माण झाली असून नेमके लाभार्थी कोण असा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे. 


जिल्ह्यातील एकूण खातेदार - ४,१५,००० 
- जिल्ह्यातील एकूण कर्जदार - ३,३३,०००. 
- कर्जमाफीसाठी अर्ज सादर करणारे शेतकरी - १,९८,०००. 
- हिरव्या यादीत समावेश असलेले शेतकरी - १,४४,०००. 
- कर्जमाफीचे प्रत्यक्ष लाभार्थी शेतकरी - १,०६,०००. 
- वंचित असलेले शेतकरी - ९२ हजार . 


नव्याने तपासणी होण्याची आवश्यकता 
जिल्हामध्यवर्तीबँकेने कर्ज माफी योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना १०९ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले. कर्जमाफीच्या यादीत नाव आहे परंतु लाभ मिळाला नाही, अशा शेतकऱ्यांच्या अर्जाची नव्याने तपासणी होण्याची शक्यता आहे. याबाबत शासनाचे अद्यापपर्यंत कोणतेही निर्देश आलेले नाहीत.
- जे.सी. राठोड, व्यवस्थापक, जिल्हा बँक. 

 

१ लाख ६ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ 
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत कर्जमाफीसाठी जिल्ह्यात लाख ९८ हजार शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज भरले. यापैकी जिल्ह्यातील लाख ४४ हजार शेतकऱ्यांचा ग्रीन लिस्टमध्ये समावेश केला. त्यापैकी लाख हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला असल्याचे शासनाचे म्हणणे आहे.आशेचा किरण दिसतोय कर्जमाफीसाठी जे शेतकरी पात्र होते परंतु ऑनलाइन अर्ज करू शकले नाही अशा शेतक-यांनाही या योजनेत सामावून घेतले जाणार आहे. शेवटच्या पात्र शेतकऱ्यास मदत मिळेपर्यंत ही योजना सुरू ठेवू, असे शासनाचे म्हणणे असल्याने शेतकऱ्यांना तूर्त तात्पुरत्या आशेचा किरण दिसत आहे. परंतु जिल्हा पातळीवर याबाबत कोणतेही दिशानिर्देश आले नसल्याचे चित्र आहे. 

बातम्या आणखी आहेत...