आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जि. प. सीईओंकडून आदर्श आचार संहितेचा झाला भंग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - आचार संहिता लागू झाल्याच्या दुसऱ्या दिवशी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मनिषा खत्री यांनी दोन परिचरांच्या बदल्या केल्याने आचार संहितेचे उल्लंघन झाले आहे. याप्रकरणी जिल्हाधिकारी अर्थात निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित बांगर यांनी सीईओंशी बोलून नंतर कारवाई करणार असे म्हटले आहे. तिकडे शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख सुधीर सूर्यवंशी यांनी आदर्श आचार संहितेत कर्मचाऱ्यांच्या केलेल्या बदल्यांबद्दल जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे आक्षेप नोंदविला आहे. त्यामुळे या प्रकरणी सीईओ खत्री अडचणीत येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. 

 

विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची आदर्श आचार संहिता २० एप्रिल रोजी रात्रीपासून लागू झाल्याची घोषणा जिल्हाधिकाऱ्यांनी केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी २१ एप्रिल रोजी जिल्हा परिषदेच्या सीईओ खत्री यांनी त्यांच्या बंगल्यावरील दोन परिचरांच्या बदल्यांचा आदेश काढला. यात विजय संभलकर यांची प्राथमिक आरोग्य केंद्र धुळघाट रेल्वे, धारणी तर आर.जे. इंगोले यांची प्राथमिक आरोग्य केंद्र हतरु, चिखलदरा येथे बदली केली. बदली आदेशात खत्री यांनी कर्तव्यात कसूर करणाऱ्या या दोन्ही परिचरांना वारंवार मौखिक सुचना दिल्यानंतरही त्यांच्या वर्तनात कोणताही बदल झाला नाही. ते वारंवार रजेवर जातात. त्यामुळे या दोघांचीही बदली करण्यात येत असून त्यांना २१ एप्रिल रोजी मध्यांन्हानंतर या आदेशाद्वारे एकतर्फी कार्यमुक्त करण्यात येत आहे. तरी पदस्थापनेच्या ठिकाणी तात्काळ रुजू व्हावे. आदेशाचे पालन न केल्यास संबंधितांवर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. 
बदली केल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांनी आम्हाला सीईओंच्या घरची कामे करावी लागत होती, असा आरोप केला आहे. खत्री यांनी हा आरोप खोडून काढला आहे. 


एकही परिचर बंगल्यावर ठेऊ नये असा आदेश :अधिकाऱ्याने एकही परिचर बंगल्यावर नियुक्त करून त्याच्याकडून खासगी कामे करून घेऊ नये असा आदेश शासनाने काढला आहे. असे असताना सीईओ खत्री यांनी या आदेशाचे उल्लंघन करून त्यांच्या बंगल्यावर ८ परिचरांनी नियुक्ती केली. मात्र बदलीचा आदेश काढताना दोन्ही कर्मचाऱ्यांची सेवा कक्ष-२ वर वर्गीत केल्याचे म्हटले आहे. त्यामुळेच आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांवर अन्याय झाल्याचे निवेदन दिल्याची माहिती शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख सुधीर सूर्यवंशी यांनी दिली. 


आचारसंहिता भंगाची तक्रार : आचारसंहिता लागू झाल्यानंतर जि.प.सीईओंनी दोन परिचरांच्या बदल्या करून आचार संहितेचे उल्लंघन केले असल्याची तक्रार राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांकडे शिवसेना सहसंपर्क प्रमुख सुधीर सूर्यवंशी यांनी केली आहे. यात त्यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता २० एप्रिलपासून लागू झाल्यानंतरही सीईओ खत्री यांनी दोन परिचरांची बदली केली. यासाठी त्यांनी निवडणूक आयोगाची परवानगीही घेतली नाही, असे म्हटले आहे. याआधीच्या सीईओंना झाला १० हजार दंड 
२०१४ मध्ये आचारसंहिता लागू झाल्यानंतर केलेल्या एका बदली प्रकरणात औद्योगिक न्यायालयाने अमरावती जिल्हा परिषदेच्या तत्कालीन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना १० हजार रुपये दंड आणि बदलीचा आदेश रद्द केला होता. तत्कालीन सीईओ अनिल भंडारी यांनी त्यांच्या बंगल्यावर काम करणारा परिचर रमाकांत नाकाडे यांनी कामास नकार दिल्यामुळे त्याची बदली केली होती. याप्रकरणी त्याने औद्योगिक न्यायालयात दाद मागितली. त्यानंतर ३१ जानेवारी २०१५ रोजी १० हजार रुपये दंड आणि बदली रद्द केली होती. 


आता कायदेशीर कारवाई व्हावी 
परिचर कामात कुचराई करीत असल्याच्या तक्रारी सुमारे एक महिना आधी सीईओंनी माझ्याकडे केल्या आहेत. मात्र आचारसंहितेत त्यांच्या झालेल्या बदली प्रकरणी कायदेशीर कारवाई व्हावी. नितीन गोंडाणे, जिल्हा परिषद, अध्यक्ष. 


सीईओंसोबत बोलून निर्णय घेणार 
या बदली प्रकरणात मला काहीच माहीत नाही. त्यामुळे जि.प.सीईओंशी आधी या संपूर्ण प्रकरणाबाबत बोलून माहिती घेतो. त्यानंतरच काय कारवाई करायची याबाबत िनर्णय घेणार. जिल्हाधिकारी व िनवडणूक िनर्णय अधिकारी,अमरावती. 


अाचार संहितेचे पत्र येण्यापूर्वीच आदेश 
बदल्यांचा आदेश हा आचारसंहितेचे पत्र माझ्याकडे येण्यापूर्वी काढला आहे. २१ रोजी सकाळी बदल्यांचा आदेश काढला. आचारसंहिता लागू झाल्याचे पत्र सायंकाळी ५ वाजता िमळाले. मनिषा खत्री, सीईओ, जि.प. अमरावती

बातम्या आणखी आहेत...