आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर विद्यापीठाच्या नामांतराची घोषणा शिक्षणमंत्र्यांनी ऐकली नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर/सोलापूर- सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याबाबतची घोषणा खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मात्र मुख्यमंत्र्यांच्या या महत्त्वाच्या घोषणेबाबत राज्याचा शिक्षण विभाग आणि सोलापूर विद्यापीठ प्रशासन अद्याप अनभिज्ञ आहेत. त्याचे कारण म्हणजे मुख्यमंत्र्यांनी नामांतराची जाहीर घोषणा केली असताना, जातीय तेढ निर्माण होईल म्हणून सोलापूर विद्यापीठाचे नामांतर करण्याचा कोणताही प्रश्न उद््भवत नाही, असे उत्तर राज्याचे उच्च तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिले. 


काँग्रेसच्या शरद रणपिसे यांनी सोलापूर विद्यापीठाच्या नामांतरासंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. विधान परिषदेत गुरुवारी प्रश्नोत्तराच्या तासात तो पटलावर आला. सोलापूर विद्यापीठाच्या नामांतराबाबत मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केल्याप्रमाणे करावयाची कार्यवाही कुठंवर आली, अशी विचारणा रणपिसे यांनी केली होती. 


त्याला उत्तर देताना तावडे म्हणाले, की सोलापूर विद्यापीठाचे नामांतर केल्यास, तेथे जातीय तेढ निर्माण होईल, विद्यापीठाच्या विकासात अडथळा येईल, त्यामुळे पूर्वीचे नाव कायम ठेवण्यात यावे, असे विद्यापीठाने कळवले अाहे. त्यामुळे विद्यापीठाच्या नामांतराचा प्रश्न उद््भवत नाही. 


सोलापूरचे काळे झेंडेही विसरले... 
सर्वातधक्कादायक म्हणजे शिक्षणमंत्री विनोद तावडे १८ सप्टेंबर रोजी सोलापूरच्या दौऱ्यावर होते. त्या दौऱ्यात त्यांना नामांतर प्रकरणी काळे झेंडे दाखवण्यात आले होते. असे आंदोलन झाले होते काय, अशी विचारणा आमदार रणपिसे यांनी आपल्या प्रश्नात केली आहे. आंदोलनाची बाब वृत्तपत्रातून निदर्शनास आल्याचे विद्यापीठाने कळवले आहे, असे गमतीशीर उत्तर देण्यात आले आहे. 


मुख्यमंत्र्यांच्या घोषणेचा उल्लेख नाही 
पाच नोव्हेंबर रोजी नागपूर येथे धनगर समाजाचा राज्यव्यापी मेळावा झाला. त्या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात येईल, अशी जाहीर घोषणा केली. त्याचा उल्लेख या उत्तरात कोठेही नाही. तारांकित प्रश्नाची उत्तरे एक महिना अगोदर तयार होतात, असे गृहीत धरले तरी मुख्यमंत्र्यांच्या घोषणेला महिन्यापेक्षा अधिक कालावधी उलटला आहे. त्यामुळे या तारांकित प्रश्नाचे दुरुस्त केलेले उत्तर पटलावर ठेवणे अपेक्षित होते.

बातम्या आणखी आहेत...