आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिवाळी अधिवेशन; शेतकरीप्रश्नी ‘हल्लाबाेल’: विरोधक ‘डल्लामारी’चे पुरावे देऊ : मुख्यमंत्री

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर/ मुंबई- नागपुरात विधिमंडळ हिवाळी अधिवेशनास सोमवारपासून प्रारंभ होत आहे. नेहमीप्रमाणे अधिवेशन शेतकरी प्रश्नावर वादळी होण्याची चिन्हे आहेत. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला रविवारी विरोधी पक्ष आणि सरकारचीही पत्रपरिषद झाली. या वेळी विरोधकांनी शेतकरी कर्जमाफी, मंत्र्यांचा भ्रष्टाचार, कायदा आणि सुव्यवस्था अशा सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरलेल्या सरकारला अधिवेशनात जाब विचारणार असल्याचा इशारा देत सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकला. तसेच सरकारविराेधात मंगळवारी ‘हल्लाबाेल’ माेर्चाही शरद पवारांच्या नेतृत्वात विधिमंडळावर धडकणार अाहे.


दुसरीकडे, गेल्या १५ वर्षांत ज्यांनी भ्रष्टाचार व अनागोंदीचा कारभार केला, शेतकऱ्यांना ज्यांनी नागवले तेच आता हल्लाबोल मोर्चा काढून ही परिस्थिती का ओढवली, असा प्रश्न विचारत आहेत. मात्र आपण ‘हल्लाबोल’ करणाऱ्यांच्या ‘डल्लामारी’चे पुरावे सादर करू, असा इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांना दिला. 

 

आॅनलाइनने भ्रष्टाचाराला आळा
विरोधकांचे सर्व आरोप खोडून काढत त्यांच्या खोटारडेपणाचे पुरावे एकेक करीत उघड करणार आहोत. आघाडी सरकारमध्ये ५ हजार कोटींचा शिष्यवृत्ती घोटाळा झाला. त्यांच्या काळातील पैसे आम्ही दिले. सर्व गोष्टी आॅनलाइन करून भ्रष्टाचाराला पायबंध घातला. िवदर्भ, मराठवाडा व प. महाराष्ट्रातील  १०८ सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली आहे. ते येत्या दोन वर्षांत पूर्ण होतील. 
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

 

पारदर्शकताच वेडी झाली
सरकारच्या राजवटीत पारदर्शकताच वेडी झाली आहे. शिवाजी महाराजांच्या नावावर सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी ठरली. बीटी कापसावर बोंडअळीमुळे शेतकऱ्यांचे हजारो कोटींचे नुकसान झाले. उद्धव ठाकरे यांनी आजवर ९३ वेळा सत्तेबाहेर पडण्याचे इशारे दिलेत. आता ते लवकरच इशाऱ्यांची शंभरी गाठतील,’ 
- राधाकृष्ण विखे पाटील, विधानसभेतील विरोधी पक्षनेते

 

या मुद्द्यांवर विरोधक सरकारला घेरणार

१. शेतकरी कर्जमाफी  घोषणा होऊन तीन महिने झाल्यानंतरही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालेला नाही. ऑनलाइन घोळाने शेतकऱ्यांचा त्रासले.
२. फवारणी बळी 
हे मृत्यू कीटकनाशकाने झाले नसल्याचा अहवाल आधी दिला. वारसांना सरकारने जाहीर केलेली मदत अद्याप मिळालेली नाही.
३. बाेंडअळीचा उद्रेक 
कापसाचे पीक नष्ट झाल्याने राज्यातील शेतकरी हवालदिल आहेत. सरकार अद्याप शेतकऱ्यांना भरपाई देऊ शकलेले नाही. 
४.शेतकरी आत्महत्या कर्जमाफी जाहीर करूनही राज्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबलेले नाही. उलट त्यात वाढच झाल्याचे चित्र आहे. 

 

या मुद्द्यांवरही घेरणार

मुंबई विद्यापीठाचे रखडलेले निकाल, ऑनलाइन शिष्यवृत्ती योजनेचा फज्जा, बिघडत चाललेली कायदा व सुव्यवस्था, अनेक गुन्हेगारांचे मंत्र्यांशी संबंध, महिलांची सुरक्षा.

बातम्या आणखी आहेत...