आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानागपूर- विश्व हिंदू परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी आपल्या जिवाला धोका असल्याच्या गौप्यस्फोट करून थेट पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्याकडेच अंगुलिनिर्देश केल्यामुळे संघ परिवारात खळबळ उडाली अाहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण विश्व हिंदू परिषद तोगडिया यांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचे चित्र दिसत आहे. परिवाराचा प्रमुख या नात्याने संघाने या वादात पडून तोडगा काढावा, अशी अपेक्षा विहिंपच्या राष्ट्रीय नेत्यांकडून व्यक्त होत आहे.
अहमदाबादमधून बेपत्ता झाल्यावर अचानक रुग्णालयात पोहोचलेल्या तोगडिया यांनी आपले एन्काउंटर करण्याचा प्रयत्न होत असल्याचा गौप्यस्फोट केला हाेता. तोगडिया यांनी कुणाचेही नाव घेतले नसले तरी त्यांचा माेदींकडेच अंगुलीनिर्देश असल्याचे लपून राहिलेले नाही. त्यामुळे या गौप्यस्फोटाने संघ परिवारात प्रचंड खळबळ माजली आहे. नागपूरसह देशभरात अनेक ठिकाणी तोगडिया समर्थकांकडून निदर्शनेही सुरू आहेत. या संपूर्ण परिस्थितीत संपूर्ण विश्व हिंदू परिषद तोगडिया यांच्या पाठीशी असल्याचे चित्र आहे. विहिंपचे ज्येष्ठ नेते हेमंत जांभेकर म्हणाले, या प्रकरणानंतर आम्ही सारेच गोंधळलेलो आहोत. तोगडिया यांच्या म्हणण्याला निश्चितपणे काही आधार आहे. त्याशिवाय ते कधीही असे वक्तव्य करणार नाहीत. त्यामुळे या प्रकरणाचा छडा लावण्याची गरज आहे. संपूर्ण विश्व हिंदू परिषद या प्रकरणात तोगडिया यांच्या पाठीशी अाहे.
विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते व सहमहासचिव सुरेंद्र जैन यांनी या प्रकरणावर बोलण्यास नकार दिला. ‘तोगडिया यांच्याशी संबंधित वादावर आम्ही कुठलेही भाष्य करणार नाही. विहिंपमध्ये तशी परंपराच अाहे,’ असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, विहिंप तोगडिया यांच्या पाठीशी असल्याचे संकेत मात्र त्यांनी दिले अाहेत.
संघ हस्तक्षेप करणार
प्रवीण तोगडिया प्रकरणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. तोगडिया यांनी गेल्या वर्षी आपल्या नागपूर दौऱ्यात संघ नेतृत्वाची भेट घेऊन आपल्याला डावलण्याचे प्रयत्न होत असल्याची तक्रार केली होती. तथापि, त्यांच्या तक्रारीवर संघ नेत्यांकडून तेव्हा फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. मात्र, आता हा वाद विकोपाला गेल्याने विहिंपमध्ये खदखदत असलेला असंतोष शमवण्यासाठी संघाचे नेते पुढाकार घेऊ शकतात, अशी शक्यता नागपुरातील संघ नेत्यांमधून व्यक्त केली जात अाहे.
वादाचे कारण काय?
डाॅ. तोगडिया हे विहिंपचे फायरब्रँड नेते मानले जातात. मात्र, अाता त्यांच्याकडे या संघटनेची जबाबदारी राहू नये यासाठी काही लोक सातत्याने प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच त्यांना डावलण्याचेही प्रकार हाेत अाहेत. त्यातूनच हा प्रकार उद््भवल्याचे मत विहिंपच्या राष्ट्रीय नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केले. ताेगडियांनी पाणावलेल्या डाेळ्यांनी अापली व्यथा मांडल्यानंतर विहिंपत त्यांच्याविषयी सहानुभूती वाढली अाहे. याबाबत अाता संघ परिवाराने प्रमुख म्हणून भूमिका घेतली पाहिजे. या वादावर तोडगा काढला पाहिजे, असेही मत या नेत्याने व्यक्त केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.