आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दोन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पुढील आठवड्यात सुरू होणार बस फेऱ्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - राजापेठ उड्डाण पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यामुळे दोन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर राजापेठ बस स्थानक सुरू होणार असून येथून पुढील आठवड्यात नियमित बस फेऱ्यांना सुरुवात होईल, अशी माहिती विभागीय वाहतुक अधिकारी अरुण सिया यांनी दिली. 


राजापेठ बस स्थानक सुरू झाल्यानंतर मुख्य बस स्थानकावरील सुमारे ४० टक्के प्रवाशांची गर्दी कमी होईल. त्यामुळे प्रवाशांसह एसटी कर्मचाऱ्यांची गैरसोयही दूर होणार असून राजापेठ येथून दररोज १०० ते १२५ बस फेऱ्या सुरू होतील. अकोला, यवतमाळ, वाशीम, बुलडाणा आणि कारंजा येथून येणाऱ्या बसेसचा अंतिम थांबा तसेच या दिशेने निघणाऱ्या बसेसचा प्रथम थांबा हा राजापेठ स्थानकच असेल. या शहरांकडे जाणाऱ्या प्रवाशांना राजापेठ येथूनच बसमध्ये चढावे व उतरावे लागेल. केवळ लांब पल्ल्याच्या शिवशाही बसेस जसे अमरावती-पुणे व अमरावती-औरंगाबाद या मुख्य स्थानकावरून निघतील. नंतर त्या राजापेठ बस स्थानकावरही काहीवेळ थांबा घेतील, अशी माहितीही विभागीय एसटी कार्यालयाने दिली आहे. 


दोन वर्षांपूर्वी १८ एप्रिल २०१६ रोजी राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते राजापेठ बस स्थानकाचे उद्घाटन झाले होते. मात्र यादरम्यानच राजापेठ उड्डाण पुलाच्या निर्मितीसाठी कामाला सुरुवात झाल्यामुळे येथे वाहतुकीची कोंडी व्हायला लागली. त्यामुळे शहर वाहतूक पोलीसांनी २७ एप्रिल २०१६ रोजी विभागीय एसटी कार्यालयाला जोवर पुलाचे काम पुर्ण होत नाही तोवर राजापेठ बस स्थानक बंद ठेवण्यास सुचविले. तेव्हापासून हे स्थानक बंद आहे. आता राजापेठ पुलाचे काम पूर्ण झाल्यामुळे एसटी कार्यालयाने काही दिवसांपूर्वी 
येथून बस सेवा सुरू करण्याची परवानगी मागितली होती. त्यानंतर शहर वाहतूक पोलिसांनी १६ मार्च २०१८ रोजी एसटी अधिकाऱ्यांसह संयुक्तपणे पाहणी केली व राजापेठ बस स्थानकावरून पुन्हा बस फेऱ्या सुरू करण्यास अडचण नसल्याचे पत्र २ एप्रिल रोजी विभागीय एसटी कार्यालयाला पाठवले. त्यामुळे बस स्थानकावरून वाहतूक व फेऱ्या सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 


प्रवासी, चालक, वाहकांचा त्रास होणार कमी : अमरावती मुख्य बस स्थानकावर सध्या बसेस आणि प्रवाशांची चांगलीच गर्दी वाढली आहे. सुटीच्या मोसमात उन्हाळी स्पेशल सुरू झाल्यामुळे तर बस स्थानकावर बसेस उभ्या करण्यासाठी १० ते १५ मिनिटे वाट बघावी लागत आहे. त्यात शिवशाहीचा आकारही सामान्य बसपेक्षा मोठा आहे. त्या वळवताना इतर बसेसलाही कधी धक्का लागतो. अशात चालक-वाहकांमध्ये वाद होतात. प्रवाशांनाही बसमध्येच अडकून पडावे लागते. मात्र राजापेठ स्थानक सुरू झाल्यानंतर प्रवाशांची गर्दी कमी होऊन बस वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल. ट्रॅफिक कंट्रोलर नियुक्त करणार 
शहर वाहतूक पोलीसांच्या सुचनेनुसार आम्ही राजापेठ स्थानकावर सध्या किमान दोन वाहतूक नियंत्रक (स्वयंसेवक) नियुक्त करणार असल्यामुळे येथे वाहतुकीची कोंडी होणार नाही. बडनेरा मार्गाने येणाऱ्या व पुन्हा जाणाऱ्या बसेससह वाहतुकीलाही अडथळा होऊ नये हाच आमचा प्रयत्न राहणार आहे, हे नियंत्रक वाहतूक सुरळीत ठेवण्याचे काम करतील, असेही एसटीच्या

अधिकाऱ्यांनी सांगितले. 


मध्यवर्ती बसस्थानकावरील ४० टक्के भार होणार कमी, वाहतुकीची कोंडी सुटणार 
अकोला, यवतमाळ, वाशीम, बुलडाणा, कारंजा येथे जाणाऱ्या बसेस पुढच्या आठवड्यापासून राजापेठ बस स्थानकावरून सुटणार असल्यामुळे मुख्य बसस्थानकावरील प्रवाशांची ४० टक्के गर्दी कमी होणार आहे. अरुण सिया, विभागीय वाहतूक अधिकारी 


नागपूरसाठी सध्याच फेऱ्या नाही 
अद्याप शहरातील वाहतुकीचा प्रश्न पूर्णपणे सुटला नसल्यामुळे नागपूरसाठी सध्याच राजापेठ बस स्थानकावरून फेऱ्या सुरू होणार नाहीत. यावेळी वाहतुक सुरळीत होईल त्यानंतरच नागपूरसाठी बस फेऱ्या ठेवल्या जातील, त्यामुळे मुख्य स्थानकावरील गर्दी आणखी कमी होईल, अशी माहिती विभागीय राज्य परिवहन कार्यालयाने दली आहे. 

बातम्या आणखी आहेत...