आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक आमदारांची भूमिका विद्यार्थीविरोधी असल्याचा शिक्षण मंत्री विनोद तावडेंचा आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- १३०० शाळा बंद नव्हे, स्थलांतरित  केल्या आहेत. ३ किमीच्या प्रत्येक विद्यार्थ्याला शाळा असणारच आहे. आरटीई कायद्याचा कुठेही भंग होत नाही, असे असूनही तुम्ही उगीच ओरडता. विद्यार्थ्यांची वाट लागली तरी चालेल, पण शिक्षकाची नोकरी टिकली पाहिजे एवढीच तुमची भूमिका आहे, असे खडे बोल सुनावत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी शिक्षक आमदारांची विधान परिषदेत जोरदार कानउघाडणी केली.


 शिक्षकांच्या प्रश्नावर तावडे आणि शिक्षक आमदारांत जोरदार खडाजंगी झाली. सर्व शिक्षक आमदारांनी तावडेंच्या निषेधार्थ सभात्यागही केला. जनता दल युनायटेडचे शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी शिक्षकप्रश्नी शून्य प्रहरात स्थगन प्रस्ताव दिला होता. तो प्रस्ताव सभापतींनी फेटाळला, मात्र, त्यावर पाटील यांना बोलण्यास अनुमती दिली.  राज्यातील १३ हजार शाळा बंद करायला सरकार निघाले आहे. त्यामुळे गोरगरिबांची मुले शिक्षणापासून वंचित राहतील, शिक्षण संस्थांचे अनुदान दिले नसल्याने शिक्षकांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे, असे आरोप पाटील यांनी केले. हे सर्व आरोप फेटाळून लावत शिक्षक आमदार दुटप्पी असल्याचा पलटवार तावडंेनी केला. गेली २५ वर्षे शालाबाह्य कामे शिक्षक करतच आहेत, परंतु यांनी कधी आवाज उठवला नाही. आॅनलाइनचा शिक्षकांना त्रास आहे, तो कमी करण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न चालू आहे. ज्योतिबा फुले, कर्मवीर भाऊराव यांचा हे वारसा सांगतात...मग विद्यार्थ्यांची वाट लागली तरी चालेल, पण शिक्षक टिकला पाहिजे, असे फुले-कर्मवीरांनी सांगितले होते काय ? सगळे शिक्षक आमदार दुटप्पी आहेत. शिक्षण विभागाने चांगले निर्णय घेतले तरी अभिनंदनाचा शब्द यांच्या तोंडून निघत नाही. असले समाजवादी ठुमके काय कामाचे? अशा शब्दात तावडे यांनी शिक्षक आमदारांवर टीका केली.  

 

विनोद तावडे यांच्या घोषणा  

> जुलै १ व २ २०१६ रोजी अनुदानास पात्र शाळांना २० टक्के अनुदानाचा टप्पा मंजूर करण्याबाबत कार्यवाही सुरू आहे.   

> मूल्यांकन झालेल्या कनिष्ठ महाविद्यालयांचे अनुदान वितरित करण्याबाबत सर्व प्रक्रिया पूर्ण मात्र संस्थाचालक शिक्षकांना पैसे मागतात म्हणून त्या प्रसिद्ध केल्या नाहीत.   
> २००५ पूर्वीच्या ३ हजार ९६७ शिक्षकांचे भविष्य निर्वाह निधीचे पैसे कापणे राहून गेले होते. त्यामुळे त्यांची पीएफची खाती बंद आहेत. हायकोर्ट निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येईल.  
> सावित्रीबाई फुले-फातिमा शेख आरोग्य कुटुंब योजनेचे अॅप तयार. १ एप्रिलपासून शिक्षण विभाग कर्मचाऱ्यांची मेडिक्लेम योजना कॅशलेस पद्धतीने होईल..  
> अपंग समावेशित शिक्षण योजनाअंतर्गत कार्यरत १ हजार १८५ विशेष शिक्षकांना शिक्षक भरतीत समाविष्ट केले जाईल.  
> मुंबईतील शिक्षिका जयश्री ढोरे यांचे ८०० किमी दूर नागपूर येथील समायोजन रद्द.  
> कोल्हापूर जिल्ह्यातील  विद्यार्थिनीला उठाबशा काढण्याची शिक्षा देणाऱ्या मुख्याध्यापिकेवर पोलिस गुन्हा दाखल करण्यात येईल.  
बातम्या आणखी आहेत...