आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आरएफओ, वनरक्षक, निवृत्त तहसीलदार, नायब तहसीलदारांसह नऊ जण गजाआड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धारणी- धारणी वनपरिक्षेत्रातील धुळघाट रेल्वे येथे 'मग्रारोहयो'च्या कामावर मृत आणि गैरहजर असलेल्या मजुरांची नावे हजेरीपटावर दाखवून त्यांच्या नावाने पैसे उचलल्याचा घोटाळा मेळघाटात उघडकीस आला असून याप्रकरणी बड्या अधिकाऱ्यांसह ९ कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली. यात वन क्षेत्राधिकारी (अारएफओ) दिपाली चव्हाण, वनरक्षक सविता बेठेकर, आरएफओचा सहायक रत्नदीप गायकवाड, दोन महिन्यांपूर्वीच सेवानिवृत्त झालेले तहसीलदार ए.जी.देवकर, नायब तहसीलदार पी.एम.शिंगाडे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी शरद भाकरे, ज्ञानदेव येवले, अव्वल कारकून ए. एस.चक्रे, ग्रामीण डाकसेवक सखाराम मावस्कर या नऊ कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे. 


आश्चर्यजनक बाब म्हणजे १ जाने. ते ३१ मार्च २०१७ पासूनच्या 'मग्रारोहयो'च्या कामांच्या ज्या घोटाळ्यात एवढ्या मोठ्या अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली घोटाळ्याची व्याप्ती १४ हजार रुपये दर्शवण्यात आली आहे. मात्र हा घोटाळा प्रत्यक्षात कोट्यावधी रुपयांचा असल्याची चर्चा धुळघाट रेल्वे येथील गावकऱ्यांमध्ये सुरू आहे. 


आदिवासी भागात 'मग्रारोहयो' अंतर्गत गेल्या चार वर्षांत अतिशय गोपनीय पद्धतीने कामे होत आहेत. वनविभाग वर्षभरापूर्वी समपातळी चर, चर दुरुस्ती अशा जलसंधारण कामांची मांडणी कागदावर नोंदवून मजुरांची मजुरी हडपण्यात आल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते एस.के.तायडे यांनी थेट धारणी पोलिसांत केली होती. मेळघाटात 'मग्रारोहयो'सह आदिवासींच्या रोजगारात होत असलेला भ्रष्टाचार साखळी पद्धतीने चालतो. या भ्रष्टाचाराची पाळेमुळे अगदी वरपर्यंत रुजली आहेत. त्यामुळे आदिवासींच्या तक्रारींची दखलच घेतली जात नाही. मात्र यावेळी उपविभागीय अधिकारी, धारणी डाॅ. विजय राठोड यांच्यासह विभागीय आयुक्तांच्या चौकशी पथकाने धुळघाट येथील 'मग्रारोहयो' योजनेच्या मजुरीत झालेल्या गैरप्रकाराची सखोल चौकशी केली. यात नऊ अधिकारी-कर्मचारी दोषी आढळले. गेल्या एका वर्षापासून ही चौकशी प्रक्रिया सुरू होती. एकीकडे मजुरांच्या उपस्थितीची आकडेवारी फुगवून दाखविली जात होती तर दुसरीकडे मेळघाटातील बहुतांश आदिवासी खेडे मजुरांविना ओस पडून होती. होळी सणाला पाच िदवस आदिवासी कोणतेही काम करीत नाही. हा त्यांचा मोठा सण असतो. तरीही पंचमीच्या िदवशी पाच मजुरांनी कामे केल्याची 'मग्रारोहयो' हजेरीपटावर नोंद दाखवण्यात आली. 


धुळघाट रेल्वे येथील हे गैरव्यवहार प्रकरण पुढे आल्याने इतर सरकारी विभागांचेही धाबे दणाणले आहे. मनरेगाचे हजेरीपत्रक ग्रामसभेपुढे उघड करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होती. मात्र त्याकडे गंभीरपणे बघितले गेले नसल्यामुळे 'मग्रारोहयो'त गोरखधंदे सुरू असल्याचा ठपका एस.के.तायडे यांनी ठेवला आहे. 


अपहार प्रकरणातील नऊ कर्मचाऱ्यांवर सकाळी ७ ते ८ वाजतादरम्यान पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत १४ हजार रुपयांची अफरातफर झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी तपास उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल नेहुल, फौजदार एल.के.मोहनधुले करीत आहेत. 


तीन सदस्यीय समितीने तयार केला चौकशी अहवाल

धुळघाट रेल्वे येथील आर्थिक अपहार प्रकरणी रोहयो उपायुक्तांनी १ जाने. ते ३१ मार्च २०१७ या कालावधीतील कामांचे रेकाॅर्ड तपासण्याची धुरा कार्यकारी अभियंता ए.एच.खान, लेखाधिकारी एस.एस.सुपासे, सहायक लेखाधिकारी आर.जी.रायकवार यांच्याकडे सोपवली. या तीन सदस्यीय चौकशी समितीने चौकशीचा वस्तुनिष्ठ अहवाल रोहयो उपायुक्तांकडे ९ जानेवारी २०१८ रोजी सादर केला. आर्थिक अनियमिततेचे प्रकरण असल्याने धारणीच्या तहसीलदारांकडे याप्रकरणी पोलिसांत तक्रार, संबंधित दोषींवर गुन्हे नोंदविण्याची जबाबदारी प्रशासनाने सोपविली. त्यानुसार धारणीच्या तहसीलदारांनी धुळघाटच्या आरएफओ, वनरक्षकांवर गुन्हे दाखल करण्यासाठी पोलिसांना पत्र पाठविले. 


दरम्यान, या प्रकरणामध्ये इतर जबाबदार सहाय्यक कार्यक्रम अधिकाऱ्यांनी आर्थिक अपहारास सहाय्य केले. ते शहानिशा न करताच अर्ज पुढे सरकवत होते. तर अव्वल कारकून चक्रे हजेरी पत्रकाची सत्यता न पाहता वरिष्ठांकडे स्वाक्षरीसाठी अर्ज पाठवत होता, हे तपासात उघड झाले आहे. 


मृतकांनाही दाखविले कामावर हजर 
या 'मग्रारोहयो' च्या घोटाळ्यात मृतक, हजर नसलेले तसेच काल्पनिक नावे हजेरीपटावर दाखवून त्यांच्या नावे टपाल खात्यातून रक्कम काढण्यात आली. आरएफओंचा सहायक रत्नदीप गायकवाड हा मजुरांच्या नावाच्या खोट्या स्लिप भरून त्यांच्या नावावर टपाल कार्यालयात आलेले मजुरीचे पैसे काढून घेत ही रक्कम आरएफओला द्यायचा. यात वनरक्षक सविता बेठेकर स्वत:च्या स्वाक्षरीने मजुरांच्या सह्या नसलेला नमुना ४ अर्ज तहसील कार्यालयात जमा करायची, रोजगार सेवकाची सही नसतानाही स्वत:ची स्वाक्षरी रजिस्टरवर करून शासकीय आदेशाचे उल्लंघन करायची, डाकसेवक सखाराम मावस्कर कोणतीही खात्री न करता पासबुकशिवाय मजुरीची रक्कम रत्नदीप गायकवाडला द्यायचे. 


पोलिस अधीक्षकांच्या आदेशानुसार गुन्हा दाखल 
या प्रकरणाच्या चौकशी अहवालावरून नऊही जबाबदार कर्मचाऱ्यांवर पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या आदेशानंतर भांदविच्या कलम ४०६, ४०९, ४२०, ४६८, ४६७, ४७१, ४७७ (अ) आणि ३४ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. आर्थिक अपहार, फौजदारीपात्र न्यासभंग, शासनाची फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे, खोटे हिशेब तयार करणे असे गंभीर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. 

बातम्या आणखी आहेत...