आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'नापास'च्या भीतीपोटी आयटीआय विद्यार्थ्यांचा 'ऑनलाइन'ला विरोध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- संगणकाच्या भीतीपोटी आयटीआयच्या विद्यार्थ्यांनी आज ऑनलाइन परीक्षेला विरोध केला. २७ पैकी १९ ट्रेडची ऑनलाइन, तर ८ ट्रेडची परीक्षा ऑफलाइन घोषित करण्यात आल्यानंतर विद्यार्थ्यांनी शासकीय आयटीआयमध्ये सोमवार, ५ फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास अचानक आंदोलन केले. पूर्वसूचना न देता परीक्षा ऑनलाइन घेण्यास विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला, तर ऑनलाइन परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना सूचना देत सराव देखील घेण्यात आल्याचा दावा आयटीआय प्रशासनाने केला. 

 

मोर्शी रोडवरील शासकीय आैद्याेगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) विद्यार्थ्यांची परीक्षेस आजपासून सुरुवात झाली. शासकीय सह एकूण चार आयटीआय मधील ८५० ते ९०० विद्यार्थी या परीक्षेला प्रविष्ठ झाले. दोन सत्रात असलेल्या पैकी पहिल्या टप्प्यातील परीक्षेसाठी सकाळी ९ वाजता विद्यार्थी आयटीआयमध्ये दाखल झाले. मात्र, अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या ट्रेडची परीक्षा ही ऑनलाइन होणार असल्याची माहिती मिळाली. ऑनलाइन परीक्षेमुळे अनुत्तीर्ण होण्याच्या भीतीने अनेक विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. वेळ झाली असताना परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थी येण्यास तयार झाले नाही. यानंतर एकत्र आलेल्या विद्यार्थ्यांनी प्राचार्यांचे कार्यालय असलेल्या इमारतीकडे धाव घेतली. विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता सुरक्षा रक्षकांनी तातडीने चॅनल गेट बंद केले. बराच वेळ विद्यार्थ्यांचा शासकीय आयटीआयमध्ये गोंधळ सुरू होता. मात्र कारवाई करण्याचा इशारा देण्यात आल्याने विद्यार्थी नरमले. प्राचार्य सचिन धुमाळ यांच्यासह विद्यार्थी तंत्र सहसंचालक पी. टी. देवतळे यांच्याकडे पोहोचले. त्यांनी कक्षाबाहेर येत विद्यार्थ्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र एेकून घेण्यास तयार नव्हते. सकाळी ९ वाजता सुरू झालेले आंदोलन दुपारी २ ते ३ वाजेपर्यंत सुरू होते. 


चार आयटीआयचे ९०० विद्यार्थी
शहरातील शासकीय आयटीआय, रहाटगाव आयटीआय, नालंदा आयटीआय तसेच एसएल आयटीआय आदी चार आयटीआय मधील विद्यार्थ्यांची परीक्षा मोर्शी रोडवरील शासकीय आयटीआयमध्ये आयोजित केली आहे. चार ही आयटीआय मधील एकूण ८५० ते ९०० विद्यार्थी प्रथम सत्रात, तर ६०० ते ७०० विद्यार्थी प्रविष्ठ होणार असल्याची माहिती अाहे. 


प्रथमच निगेटिव्ह मार्किंग बंद
आयटीआयच्या परीक्षा यापूर्वी ओएमआरच्या साहाय्याने घेण्यात येत होत्या. प्रथमच ऑनलाइन परीक्षांचे आयोजन केले जात आहे. या माध्यमातून होणाऱ्या परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग नसल्याची माहिती प्राचार्य सचिन धुमाळ यांनी दिली. 
१९ ट्रेड ऑनलाइन, तर ८ ट्रेडची ऑफलाइन परीक्षा, पूर्वसूचना न देता परीक्षा ऑनलाइन घेण्यास आक्षेप 


दहावी ऑफलाइन, आठवी ऑनलाइन
प्रवेशासाठी दहावी उत्तीर्ण अनिवार्य असलेल्या ट्रेडच्या परीक्षा ऑफलाइन घेण्यात आली. प्रवेशासाठी आठवी उत्तीर्ण अनिवार्य असलेल्या ट्रेडच्या परीक्षा ऑनलाइन घेण्यात येत असल्याने अनेक विद्यार्थ्यांनी आंदोलनादरम्यान आश्चर्य व्यक्त केले. 


ऑनलाइन परीक्षेबाबत सराव घेतला 
ऑनलाइन परीक्षा होणार असलेल्या संबंधित ट्रेडच्या विद्यार्थ्यांना सूचना दिली होती. शिवाय सराव देखील घेण्यात आला होता. यापूर्वी परीक्षा ओएमआर सीटच्या मदतीने होत होती. प्रथमच ऑनलाइन प्रणालीद्वारे परीक्षा होत असून विद्यार्थ्यांना प्रश्नांच्या केवळ बहुपर्यायी उत्तरावर क्लिक करावे लागणार आहे. विद्यार्थ्यांचे समुपदेशन केले असून ऑनलाइन परीक्षेकरिता विद्यार्थी समाधानी आहेत.
- पी. टी. देवतळे, सहसंचालक. 

बातम्या आणखी आहेत...