आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पक्ष्यांच्या संवर्धनासाठी लोकसहभाग महत्त्वाचा; मुकुंद धुर्वेंचे प्रतिपादन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळ- पक्षी संवर्धनाची चळवळ गतिमान होण्यासाठी वन विभाग, वन्यजीव विभाग, सामाजिक वनीकरण जैव विविधता मंडळांनी पक्षी मित्रांसह एकत्र येण्याची आवश्यकता आहे. जिल्हास्तरावर वर्षातून एकदा तरी सर्वांनी एकत्र येऊन चळवळीत काम करणाऱ्या प्रत्येकाला त्याचे म्हणणे मांडण्याची संधी दिली पाहिजे. प्रत्येकाच्या अनुभवाच्या नोंदी तयार करून त्याप्रमाणे पक्ष्यांच्या अधिवासांच्या संरक्षण, संवर्धन कामात लोकसहभाग करून घ्यावा, असे आवाहन यवतमाळातील १८ व्या विदर्भ पक्षी मित्र संमेलनाचे अध्यक्ष मुकुंद धुर्वे यांनी केले. 


यवतमाळच्या नेहरू स्टेडियमवर १० डिसेंबर रोजी आयोजित संमेलनात ते बोलत होते. महाराष्ट्र पक्षी मित्र द्वारा आयोजित कोब्रा अॅडव्हेंचर्स नेचर क्लब तथा वनविभाग यवतमाळ द्वारा आयोजित या पक्षी मित्र संमेलनाचे उद््घाटन यवतमाळचे उपवन संरक्षक भानुदास पिंगळे यांच्या हस्ते झाले. यावेळी मंचावर नगराध्यक्ष कांचन चौधरी, स्वागत समितीचे अध्यक्ष गोविंद बजाज, महाराष्ट्र पक्षी मित्र संघटनेचे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर, पक्षी तज्ज्ञ डॉ. अनिल पिंपळापुरे, माजी संमेलनाध्यक्षांचे प्रतिनिधी डॉ. गजानन वाघ, उद्योजक चंद्रशेखर मोर, विजय गाडगे, देविदास गोपलानी, डॉ. दीपक दाभेरे डॉ. प्रवीण जोशी प्रामुख्याने उपस्थित होते. संमेलनास उपस्थित पक्षी मित्रांना संबोधित करताना मुकुंद धुर्वे यांनी पक्षी मित्रांनी पक्षी निरीक्षण करताना, त्यांचे फोटो घेताना तसेच अधिवासात फिरताना पक्षांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी असे म्हटले. त्यासाठी स्वत:वर काही बंधने घालून घ्यावीत असेही आवाहन केले. शासन राबवत असलेल्या जलयुक्त शिवार अभियानातही पक्षांचे नैसर्गिक अधिवास धोक्यात येणार नाही याची दक्षता घ्यावी असे ते म्हणाले. 


संमेलनाचे उद्घाटक यवतमाळ वनविभागाचे उपवन संरक्षक भानुदास पिंगळे यांनी यावेळी शासनस्तरावर सुरू असलेल्या वन्यजीव रक्षणासंबंधी माहिती देऊन यवतमाळातील ‘कोब्रा’सह पक्षीमित्र करीत असलेल्या कामांबद्दल गौरवोद्गार काढले. तत्पूर्वी संमेलनस्थळी आयोजित छायाचित्र प्रदर्शनाचे उद््घाटन यवतमाळच्या नगराध्यक्ष कांचन चौधरी यांनी केले. ही छायाचित्रे यवतमाळातील प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. दीपक दाभेरे आणि प्रा. डॉ. प्रवीण जोशी यांनी काढली आहेत. आपल्या भाषणात त्यांनी पक्षी संवर्धनासाठी झाडे वाचविणे गरजेचे असल्याचे सांगून विकासकामांसाठी होत असलेल्या वृक्षकटाईवर चिंता व्यक्त केली. प्रास्ताविक भाषणात कोब्रा अॅडव्हेंचर्स क्लबचे सचिव श्याम जोशी यांनी सर्पमित्र म्हणून सुरू झालेल्या ‘कोब्रा’ने निसर्गातील विविध घटकांसाठी योगदान देणे कसे सुरू केले त्याबाबत माहिती दिली. डॉ. गजानन वाघ आणि डॉ. जयंत वडतकर यांनीही यावेळी संबोधित करताना पक्षीसंवर्धन चळवळीविषयी माहिती दिली. 


यावेळी ‘विहंग विश्व’ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. प्रारंभी विदर्भातील ज्येष्ठ पक्षीतज्ज्ञ स्व. रमेश लाडखेडकर तसेच ख्यातनाम पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. अमोल वगारे यांनी ड्रोनच्या सहाय्याने अतिथींचे अभिनव स्वागत केले. अतिथींचा सत्कार पक्ष्यांचे घरटे स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला. राजन टोंगो, मदनलाल कश्यप, शिवकुमार मोर, प्रा. राजेंद्र उमरे, रूपेश भुते मनीष मगरे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. दिवाकर तिरमारे, अनुराधा तिरमारे, आकाश पसले, विशाल बावणे, संजय दाणी, नीलेश पसले, प्रमोद जिरापुरे, गौरव सपाटे, वैभव वंजारी, गोपाल भोयर, सनी गुप्ता यांनी पाहुण्यांचा सन्मान केला. संमेलनाच्या मंचासमोर अरुण लोणारकर यांनी चितारलेली रांगोळी लक्ष वेधून घेत होती. उद्घाटन संचालन विवेक कवठेकर यांनी तर आभार अनंत पांडे यांनी मानले. 

बातम्या आणखी आहेत...