आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘विदर्भ बंद’ला गालबोट; टायरची जाळपोळ, बसच्या काचा फोडल्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रतिनिधी/नागपूर- वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी नागपूरसह अमरावती जिल्ह्यातील वरुड, चांदूर रेल्वे, परतवाडा येथे बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यात विदर्भ राज्य आंदोलन समिती समविचारी विदर्भवादी संघटना शेतकरी संघटनेने नांदगाव खंडेश्वर-लोणी टाकळी या द्रृतगती मार्गावर हरताळ आंदोलन केलेे. याशिवाय जिल्ह्यात वरुड, मोर्शी, नांदगाव, खंडेश्वर, तिवसा, धामणगाव रेल्वेसह अन्य तालुक्यांमध्येही बंदचे आवाहन करण्यात आले होते.बुलडाणा जिल्ह्यात देऊळगाव मही येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. 


दरम्यान वेगळ्या विदर्भासाठी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पुकारण्यात आलेल्या विदर्भ बंदला हिंसचे गालबोट लागले. भाजपाने विदर्भाच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप करीत विदर्भ राज्य आंदोलन समितीने बंदची हाक दिली. वेगळ्या विदर्भाच्या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जगनाडे चौकात एस. टी. बसच्या काचा फोडल्या तर गंगाबाई घाट चौकासह काही ठिकाणी टायर जाळून मार्ग रोखण्याचा प्रयत्न केला. विदर्भ राज्य आघाडी, विदर्भ कनेक्ट, विदर्भ माझा, जनमंच, जनसुराज्य पार्टी, तसेच आठवले, खोब्रागडे, गवई तसेच पी. रिपाईचे जोगेंद्र कवाडे यांचा गटही आंदोलनात सहभागी झाल्याचा दावा आयोजकांनी केला. 


नागपुरातील व्हेरायटी चौकात विदर्भवादी नेते आणि कार्यकर्त्यांनी धरणे धरले. यावेळी कार्यकर्त्यांनी वेगळ्या विदर्भाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. सोमवारी सकाळी मोठ्या संख्येने विदर्भवादी नेते आणि कार्यकर्त्यांनी व्हेरायटी चौक परिसरात एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली. विदर्भवादी नेत्यांनी हा बंद यशस्वी करण्यासाठी काळापासूनच मोर्चे बांधणी सुरु केली होती. कार्यकर्ते फिरून बंदचे आवाहन करीत होते. मात्र व्यापारी तसेच व्यापारी प्रतिष्ठानांनी आवाहनाला फारसा प्रतिसाद दिला नाही. विदर्भवाद्यांची पाठ फिरताच दुकाने सुरू होत होती. चंद्रपूर येथे बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला. तर गोंदिया जिल्ह्यात मात्र विदर्भ बंद फसला असून जिल्ह्यात सर्वत्र व्यवहार आणि वाहतुक सुरळीत सुरु आहे. 


अमरावतीजिल्ह्यात विदर्भ बंद ला मिळाला किरकोळ प्रतिसाद 
अमरावती: स्वतंत्रविदर्भासह शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सोमवारी (दि. ११) विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने विदर्भ बंदची हाक देण्यात आली होती. वेगळ्या विदर्भाच्या मागणीसह शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणे, भारनियमन बंद करणे, पुर्ण वेळ पुर्ण दाबाची वीज देणे, वेगळा राज्य निर्माण करणे, विजेचे दर निम्मे करणे, लाख कृषी पंपाच्या जोडण्या मंजूर करणे, आदी मागण्या करण्यात आल्या. यासाठी नांदगाव खंडेश्वर-लोणी टाकळी मार्गावर काही काळ हरताळ केला होता. मात्र विदर्भवादी संघटनांच्या वतीने आवाहन कलेल्या बंदला जिल्ह्यात किरकोळ प्रतिसाद मिळाला. 


दर्यापूर, वरुड, धामणगाव रेल्वे, धारणी, परतवाडा, नांदगाव खंडेश्वर, अंजनगाव सुर्जी तालुक्यात बंदबाबत व्यावसायिकांमध्ये अास्था दिसून आली नाही. तिवसा येथे सोमवारी बाजारपेठ बंद राहत असल्याने बंदचा येथे परिणाम दिसून आला नाही. विदर्भवाद्यांनी नांदगाव खंडेश्वर-लोणी टाकळी या मार्गावर काही काळ आंदोलन केले. संपूर्ण जिल्ह्यात बंदला किरकोळ प्रतिसाद मिळाला. 


‘विदर्भबंद’ला यवतमाळ जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद 
यवतमाळ: स्वतंत्रविदर्भाच्या मागणीसाठी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सोमवारी विदर्भवाद्यांनी विदर्भ बंदची हाक दिली होती. या विदर्भ बंदच्या हाकेला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील उमरखेड, यवतमाळ, वणी या ठिकाणी शहरातील बाजारपेठा काही काळ बंद ठेवण्यात आल्या होत्या. वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या विदर्भ बंदमध्ये तरुणांनी सहभाग दर्शवला होता. या आंदोलनासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे जिल्हाध्यक्ष कृष्णराव भोंगाडे, अॅड. अजय चमेडिया, विजय चाफले, अशोक कपिले, विजय निवल, किशोर पाटील आदींनी पुढाकार घेतला. विदर्भ बंद दरम्यान अनुचित घटना घडू नये,यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. 


देऊळगावमही येथे रास्ता रोको 
देऊळगावमही: विदर्भराज्याची निर्मिती करण्यात यावी, या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने खामगाव- जालना महामार्गावर देऊळगाव मही येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व समितीचे जिल्हा समन्वयक तेजराव मुंढे यांनी केले. देऊळगावमही येथील डिग्रेस चौकात झालेल्या या आंदोलनामुळे देऊळगावराजा ते चिखली या महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प होती. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना स्थान बध्द करून नंतर त्यांना सोडून देण्यात आले. 

बातम्या आणखी आहेत...