आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैसे न दिल्याने तृतीयपंथीयांची रेल्वेत प्रवाशाला बेदम मारहाण; बडनेराजवळील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- अकोल्याहून बडनेराच्या दिशेने निघालेल्या राजकोट - संत्रागाछी एक्स्प्रेसमध्ये शनिवारी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास प्रवासी आणि तृतीयपंथीयांमध्ये पैसे मागण्यावरून वाद झाला. त्यानंतर एका तृतीयपंथीयाने रागातच धावत्या रेल्वेतून उडी घेतली. त्यामुळे संतप्त झालेल्या इतर आठ ते दहा तृतीयपंथीयांनी एका प्रवाशाला बेदम मारहाण करत रेल्वेवर दगडफेक केली. यात जखमी झालेल्या प्रवाशासह रेल्वेतून उडी मारणाऱ्या तृतीयपंथीयावर उपचार सुरू अाहेत. या प्रकरणी नऊ तृतीयपंथीयांना पाेलिसांनी ताब्यात घेतले अाहे.  


हनुमानसिंग जगन्नाथसिंग (२५, रा. उत्तर प्रदेश) असे गंभीर जखमी प्रवाशाचे, तर मंगला असे रेल्वेतून उडी मारल्यामुळे जखमी झालेल्या तृतीयपंथीयाचे नाव आहे. सकाळी सातच्या सुमारास राजकोट-संत्रागाछी ही रेल्वे बडनेराकडे निघाली. सर्वसाधारण डब्यात हनुमानसिंग प्रवास करत होता. रेल्वे काटेपूर्णाजवळ असतानाच काही तृतीयपंथी या डब्यात आले व त्यांनी प्रवाशांना पैसे मागण्यास सुरुवात केली. त्या वेळी हनुमानसिंग व इतर प्रवाशांनी त्यांना पैसे देण्यास विरोध केला. या वेळी त्यांच्यात बाचाबाची झाली. तोपर्यंत रेल्वे माना स्थानकाच्या जवळपास पोहोचली होती. त्याच वेळी मंगलाने धावत्या रेल्वेतून उडी मारली. हा प्रकार इतर तृतीयपंथीयांच्या लक्षात येताच त्यांनी ‘चेन’ ओढल्याने रेल्वे थांबली. त्यानंतर आठ ते दहा तृतीयपंथीयांनी हनुमानसिंगला रेल्वेतून खाली काढले व बेदम मारहाण केली. यामध्ये हनुमानसिंग बेशुद्ध झाला. त्यानंतर तृतीयपंथीयांनी रेल्वेवर दगडफेक सुरू केली. या दगडफेकीत रेल्वेच्या काचा फुटल्या. काही वेळासाठी रेल्वेतील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले होते. मात्र वातावरण चिघळल्याचे पाहून रेल्वे त्या ठिकाणाहून पुढे काढण्यात आली. घटनेची माहिती जीआरपी बडनेरा पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. त्यांनी बेशुद्ध हनुमानसिंगला तातडीने रुग्णालयात दाखल केले.

बातम्या आणखी आहेत...