आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेळघाटातील पुनर्वसित आदिवासींचा पुन्हा एल्गार; तीन महिन्यांच्या खंडानंतर पुन्हा पोपटखेड गेटवर धडक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोट- शासनप्रशासना विरुद्ध तीव्र असंतोष असलेल्या मेळघाटातील पुनर्वसित आदिवासी नागरिकांनी तीन महिन्यांच्या खंडानंतर पुन्हा मेळघाटातील आपल्या मुळगावी परत जाण्यासाठी पोपटखेड गेटवर धडक दिली. त्यांना समजवताना प्रशासन हैराण झाले होते. दहा कोटी मंजूर होऊनही पुनर्वसित आदिवासी गावांमध्ये मुलभूत सोयी सुविधा पुरवण्यात आल्यामुळे त्यांनी पुन्हा पवित्रा घेतल्याचे दिसून आले. वृत्त लिहेपर्यंत आदिवासींना रोखण्यात प्रशासनाला यश आले. 


मेळघाटामधून अकोट तालुक्यात पुनर्वसित झालेल्या आठ गावांतील ग्रामस्थांनी पुन्हा मेळघाटातील जुन्या गावात परतण्याचा निर्धार केला. मेळघाट मार्गावर असलेल्या केलपाणी या गावात डिसेंबर रोजी सकाळपासून सर्व ग्रामस्थ एकत्र आले. या ग्रामस्थांच्या मनधरणीकरिता पोलिस, वनविभाग महसूल विभागाचा मोठा ताफा पोपटखेड गेटवर तैनात केला. नागपूर हिवाळी अधिवेशन पार्श्वभूमीवर पुनर्वसित ग्रामस्थांनी मेळघाटात पुन्हा परतण्याचे हत्यार उपसल्याने अधिवेशनात पुनर्वसित गावांचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. 


मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गाभाक्षेत्रातील अमोना, बारूखेडा, धारगड, सोमठाणा खुर्द, गुल्लरघाट, नागरतास, केलपाणी, सोमठाणा बु. या गावातील ग्रामस्थांनी जमीन, रोजगार,सोयी-सुविधा आरोग्य यंत्रणामुळे होणाऱ्या ग्रामस्थांच्या मृत्युचा मुद्दा पुढे करत इतर मागण्यांकरिता सप्टेंबर रोजी मुलाबाळासह प्रशासनाचे बंदी आदेश झुगारत खटकालीचे गेट तोडून मेळघाटात पोहचले होते. त्यावेळी आयुक्त पियुषसिंह, मुख्य उपवनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी,अकोला जिल्हाधिकारी आस्तिक पाण्डेय, अमरावती जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी मेळघाटात ग्रामस्थांची १५ तास मनधरणी करून मागण्यांची पुर्तता करण्याचे आश्वासन दिल्याने ग्रामस्थ परतले होते. मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल आमदार बच्चू कडू यांनी प्रशासनाला अल्टिमेटम देऊन ग्रामस्थांच्या पाठीशी उभे राहिले. 


आंदोलनाची दखल घेत पुनर्वसित ग्रामस्थाचे प्रश्न मार्गी लावण्याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्य सचिव डॉ. प्रवीण परदेशी सोबत बैठक पार पडली. शासनाने मुलभूत सुविधाकरिता तातडीने १० कोटींच्यावर निधी मंजुर केला. परंतु, तीन महिने उलटुनही असुविधा जैसे थे असल्याचे पाहता. ग्रामस्थांनी मालकीची शेतजमीन उदरनिर्वाहाच्या प्रश्नाने त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी पुन्हा दिलेल्या अल्टिमेटमनुसार मेळघाटात परतण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मुलंबाळ घर साहित्यासह ग्रामस्थ केलपाणीत एकत्र झाले. 


आतापर्यंत एक हजाराच्यावर आदिवासी बांधव, ग्रामस्थ केलपाणीत पोहोचले आहेत. या ठिकाणी उपविभागीय अधिकारी उदय राजपूत, उपवनसंरक्षक गुरूप्रसाद, उपविभागीय पोलीस अधिकारी गावित, तहसीलदार विश्वनाथ घुगे,अचलपूर एसडीओ व्यकंट राठोड, धारणी एसडीओ विजय राठोड, चिखलदरा तहसीलदार विजय पवार, अचलपूर तहसीलदार निर्भय जैन, अकोट ग्रामीण पोलिस निरीक्षक मिलिंद बाहाकर अकोला अमरावती जिल्ह्यातील पोलिस अधिकारी, पोलिस कर्मचारी,वन महसूल विभागाचा ताफा हजर होता. 


राजकीय रंग असल्याची चर्चा 
दरम्यान,या प्रकरणात राजकीय रंग असल्याचे बोलल्या जात आहे. आगामी विधानसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेवून काही राजकीय मंडळी या आदिवासींना पुढे करून आपला हेतू साध्य करायच्या बेतात असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. भरपूर आर्थिक मोबदला दिल्यावरही हे आदिवासी कोणत्या कायद्याने मूळ गावी परत जाऊ शकतात, अशी विचारणा केल्या जात आहे. आदिवासींचा वापर राजकारणासाठी होत असल्याची चर्चा आहे. 

 

सोमवार ११ डिसेबरपर्यंत आंदोलन केले स्थगित 
प्रशासनानेमध्यस्थी केल्यामुळेे सोमवारी ११ डिसेंबरला आमदार बच्चू कडू हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असून, त्यानंतर आंदोलनाचा पुढचा पवित्रा घेतला जाईल. त्यामुळे आजचे आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले आहे,अशी माहिती कळवण्यात आली आहे. 

बातम्या आणखी आहेत...