आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जवळच्याच व्यक्तीने केली शैलजा निलंगे यांची हत्या, हत्येला आर्थिक किनार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरातील जलाराम नगरमध्ये राहणाऱ्या शैलजा निलंगे (६१) या निवृत्त शिक्षिकेची हत्या जवळच्याच व्यक्तीने केल्याचे पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासात परिस्थितीजन्य निरीक्षणावरून समोर आले. त्यामुळे या प्रकरणाचा मारेकरी शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. दरम्यान, गुरुवारी रात्रीपर्यंत पोलिसांच्या हातात आरोपीबाबत ठोस माहिती आली नव्हती. तसेच निलंगे यांच्या हत्येला आर्थिक कारणांची किनार असल्याचाही अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

 

शैलजा निलंगे या जलाराम नगरमध्ये असलेल्या घरात एकट्याच राहत होत्या. ३१ डिसेंबरला सकाळी घरात त्या मृतावस्थेत आढळून आल्या. त्यांची हत्या झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान मारेकरी हा मुख्य दरवाजातूनच घरात गेला व हत्या केल्यानंतर मागील बाजूने असलेल्या दरवाजातून बाहेर पडला. कारण घराचे दोन्ही दरवाजे शाबूत आहे. यावरून जो कुणी मारेकरी आहे, त्याला शैलजा या चांगल्या पद्धतीने ओळखत होत्या हे सिद्ध होते. शैलजा घरात एकट्याच राहायच्या, त्या जेवण करण्यासाठी नेहमी मोठे ताट घ्यायच्या. जेवण झाल्यानंतर ताट स्वयंपाक खोलीजवळ असलेल्या दरवाजाजवळ ठेवायच्या, अशीही माहिती त्यांच्या निकटवर्तींयाकडून पोलिसांना मिळाली आहे.


असे असले तरी बुधवारी सकाळी मोठ्या ताटा व्यतिरीक्त घरात आणखी प्लेट होती, ती सुद्धा टीव्हीजवळ ठेवली होती. याचा अर्थ मारेकऱ्याने घरात आल्यावर शैलजा यांच्यासोबतच कदाचित जेवण केले. त्यानंतर त्याने टिव्हीचा आवाज मोठा केला व शैलजा यांचा गळा दाबून हत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याने गळा दाबला, त्यावेळी शैलजा यांनी प्रतिकार केला. यादरम्यान झालेल्या झटापटीत शैलजा यांचा एक दातही त्याच ठिकाणी पडून असल्याचे आढळले. पोलिसांनी तो जप्त केला. शवविच्छेदनाअंती पोलिसांना प्राथमिक अहवाल प्राप्त झाला असून, त्यामध्ये मानेचे हाड मोडल्याचे पुढे आले आहे. यावरून मारेकऱ्याने किती क्रूरपणे त्यांची मान फिरवली हे दिसून येते.

 

शैलजा यांचे दस्तूर नगरच्या एसबीआयमध्ये बँक खाते आहे. याच ठिकाणी त्यांची जवळपास २५ ते ३० लाख रुपयांची एफडी (फिक्स डिपॉझिट) आहे. दरम्यान याच बँकेत जाऊन आठ दिवसांपूर्वी दोन व्यक्तींनी निलंगे यांच्या बँक खात्याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र बँकेकडून त्यांना माहिती देण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. यावरून त्यांच्या हत्येचा कट पूर्वनियोजित असण्यासोबतच त्याला आर्थिक किनार असल्याच्या निष्कर्षापर्यंत पोलिस पोहोचले आहे. तसेच आठ दिवसांपूर्वी शैलजा यांच्या घरी कौटुंबिक वाद झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. पोलिसांनी निलंगे यांच्या घराशेजारी भाड्याने राहणाऱ्या पाच व निलंगे यांच्या घरात भाड्याने राहणाऱ्या एका अशा सहा मुलांना चौकशीसाठी ठाण्यात बोलावले. त्यांचीही पोलिस चौकशी करत आहे.
पोलिसांनी मुलाचा जबाब नोंदवला : शैलजा या शहरातीलच समर्थ हायस्कूलमध्ये शिक्षिका होत्या. त्यांनी २००७ मध्ये स्वेच्छा निवृत्ती घेतली होती. त्यांना अक्षय नावाचा मुलगा व दोन विवाहित मुली आहेत. अक्षय पत्नीसह सद्या शहरातच भाड्याने राहतो. तो महापालिकेत लिपिक आहे. अक्षयने नुकताच एक फ्लॅट खरेदी केला अाहे. मात्र अद्याप तो फ्लॅटमध्ये राहण्यासाठी गेला नसल्याचेही पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात फ्रेजरपुरा पोलिसांनी अक्षयचा जबाब बुधवारी रात्री नोंदवला आहे.

 

मारेकऱ्यांचा शोध
आम्ही घटना स्थळाची पाहणी केली. परिस्थितीजन्य निरीक्षणावरून या प्रकरणातील मारेकरी हा शैलजा निलंगे यांच्या ओळखीतील तसेच जवळचा असावा. तसेच त्यांच्या बँक खात्याची माहिती घेण्याचा झालेला प्रयत्न यावरून आर्थिक कारणासाठी ही हत्या झाली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. आम्ही मारेकऱ्यांचा कसून शोध घेत आहोत. दत्तात्रय मंडलिक, पोलिस आयुक्त.
 

 

बातम्या आणखी आहेत...