आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nagpur
  • RSS Valedictory Function At Nagpur Update संघाच्या कार्यक्रमात प्रणवदांचे भाषण

असहिष्णुता, द्वेष, गैरसमजातून राष्ट्रीयतेची ओळख गमावून बसण्याचा धोका : मुखर्जी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संघाच्या व्यासपीठावर प्रणव मुखर्जी आणि मोहन भागवत. - Divya Marathi
संघाच्या व्यासपीठावर प्रणव मुखर्जी आणि मोहन भागवत.

नागपूर - अनेक संस्कृतींचा संगम, त्यांची एकरूपता आणि सहअस्तिव हीच आमची खरी राष्ट्रीय ओळख आहे. सांस्कृतिक, धार्मिक विश्वास आणि भाषांमधील बहुविविधता ही तर भारताची विशेष ओळख आहे. सहिष्णुतेतून आम्हाला शक्ती मिळते. आम्ही बहुवाद मान्य करून त्याचा आदर करतो. त्यामुळे गैरसमज, धर्म आणि क्षेत्राची ओळख, द्वेष आणि असहिष्णुतेच्या आधारे राष्ट्रीयतेची व्याख्या करून आम्ही आमची राष्ट्रीयतेची खरी ओळखच गमावून बसण्याची शक्यता आहे, या शब्दांत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी संघाच्या व्यासपीठावरून संघाला कानपिचक्या दिल्या. त्याच वेळी लोकशाहीत सर्व महत्त्वाच्या विषयांवर, किचकट समस्यांवर संवाद होणे आवश्यक असून त्यातूनच  अशा समस्यांचे समाधान शोधू शकतो, असा अप्रत्यक्ष सल्ला त्यांनी आपल्या स्वपक्षालाही दिला.


माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी संघाचे निमंत्रण स्वीकारण्यावरून वादळ उठले.त्या पार्श्वभूमीवर संघाच्या व्यासपीठावरून मुखर्जी काय संदेश देतात याकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले होते. अपेक्षेप्रमाणे मुखर्जी यांनी आपल्या भाषणात सौहार्द, सहअस्तित्व व बहुविविधतेवर भर देतानाच संवाद प्रक्रियेवरही भर दिला.राष्ट्रीयतेची व्याख्या मांडताना मुखर्जी यांनी माजी पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथातील दाखले दिले.

 

देशातील हिंदू, मुस्लिम, शीख आणि अन्य समूहांच्या आदर्श संयोगातूनच खरी राष्ट्रीयता प्रवाहित होऊ शकते. मात्र, त्यामुळे एखादी संस्कृती विलुप्त होईल असा याचा अर्थ नाही, या शब्दात मुखर्जी यांनी संघाचे कान टोचले.  गांधीजींनीही राष्ट्रीयता ही विध्वसंक नव्हे तर सर्वसमावेश असावी, असे मत व्यक्त केले होते याकडे मुखर्जी यांनी लक्ष वेधले.


आर्थिक क्षेत्रात आमच्या देशाने मोठी प्रगती केली. तथापि, आनंदाच्या निर्देशांकात (हॅपीनेस इंडेक्स) १५६ देशांमध्ये आमचे स्थान १३३ वे आहे, असा अलिकडचा वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट सांगतो. लोकांच्या आनंदातच राजाचाही आनंद असतो. लोकांचे कल्याण हे त्याचेही असते. त्यामुळे त्याने लोकांच्याच कल्याणात आपला आनंद मानला पाहिजे, असा सल्लाही मुखर्जी यांनी यावेळी दिला.
कुठल्याही सरकारच्या दृष्टीने या देशातील सर्वसामान्य जनताच केंद्रस्थानी असली पाहिजे. त्यामुळे लोकांमध्ये विभाजन करून त्यांच्यात शत्रुत्व निर्माण करण्याची कुठलीही कृती होता कामा नये. गरिबी, आजार आणि अन्य चुकीच्या प्रवृत्तींविरुद्ध विरुद्ध लढण्याची शक्ती लोकांना प्रदान करण्याची सरकाराची भूमिका असली पाहिजे,  असे परखड मत  मुखर्जी यांनी व्यक्त केले.  


शांतता, सौहार्द आणि आनंद हेच आमच्या सार्वजनिक धोरणाचे खरे घटक असावे आणि असले पाहिजेत. त्यातूनच आम्हाला आनंदी देशाची निर्मिती शक्य होणार असून राष्ट्रीयता त्यातून आपोआपच बहरू लागेल, असे मतही मुखर्जी यांनी व्यक्त केले.

 

हेडगेवार भारतमातेचे महान सुपुत्र : मुखर्जी
संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार हे भारतमातेचे महान सुपुत्र असल्याचे प्रणव मुखर्जी यांनी म्हटले आहे. संघाच्या तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाच्या समारोप समारंभात सहभागी होण्यापूर्वी मुखर्जी यांनी संघ मुख्यालयाच्या अभ्यागत पुस्तिकेत ही नोंद केली. ‘मी आज भारतमातेच्या एका महान सुपुत्राबद्दल सन्मान व्यक्त करण्यासाठी व श्रद्धांजली वाहण्यासाठी आलोय...’, असे मुखर्जी यांनी नमूद केले.

 

मोहन भागवत म्हणाले, संघ संस्थापक डॉ. हेडगेवार हेसुद्धा काँग्रेसीच होते 
सरसंघचालक मोहन भागवत आपल्या भाषणात म्हणाले की, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना आमंत्रण दिल्याची चर्चा पक्ष आणि विरोधी पक्षात आहे. पण आपण सर्व एक आहोत हे कोणाला कसे समजत नाही? डॉ. हेडगेवारही काँग्रेसच्या आंदोलनात तुरुंगात गेले. याआधी प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात डॉ. केशवराव बळीराम हेडगेवार यांना श्रद्धांजली अर्पण केली. 

 

काँग्रेसची काेलांटउडी आधी अकांडतांडव, नंतर मुखर्जींची स्तुती
मुखर्जी संघाच्या कार्यक्रमास गेल्यावरून काँग्रेसच्या नेत्यांनी दिवसभर अकांडतांडव केले, मात्र मुखर्जींचे भाषण संपल्याच्या काही वेळेतच संघाला आरसा दाखवून दिल्याबद्दल काँग्रेसने त्यांची स्तुती केली. रणदीप सुरजेवाला म्हणाले, प्रणव यांनी मोदींना राजधर्माची आठवण करून दिली. तथापि मुखर्जींनी हेडगेवार यांना भारताचे महान सुपुत्र संबोधल्यावरील प्रश्नावर सुरजेवाला म्हणाले, मुखर्जींच्याा भाषणावर चर्चा व्हावी, अनावश्यक अाैपचारिकतांवर नाही. याआधी चिदंबरम, जयराम रमेश, सी.के. जाफर शरीफ यांच्यासह ३० पेक्षा अधिक काँग्रेस नेत्यांनी मुखर्जींना न जाण्याचे आवाहन केले होते.

 

या आणि संघाचे कार्य पाहा, पटले तर आमचे सहयोगी व्हा

 या आणि संघाचे कार्य प्रत्यक्ष पाहा. ते नीट पडताळून पाहा. संघाचा आंतरिक अभ्यास करा. आम्ही जसे आहोत तसेच दिसतो आणि जे दिसते तेच आम्ही करतो. हे सर्व पडताळून पाहिल्यावर पटले तर आमचे सहयोगी व्हा, असे प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. ते म्हणाले, सरकारे खूप काही करू शकतात; परंतु सरकारे सर्व काही करू शकत नाहीत. देशाचे भाग्य कुणी एक व्यक्ती, समाज वा संस्था घडवू शकत नाही. सर्व मिळून देशाचे भाग्य घडते. आम्ही सर्व एक आहोत, हीच आमची दृष्टी आहे. काहींना ते लक्षात येत नाही.

 

संघाला कुणीच परका नाही 
भागवत म्हणाले, संघकार्य जवळून पाहण्यासाठी भिन्न विचारांचे विद्वान, राजकीय कार्यकर्ते-नेते येतात. तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्ग दरवर्षीच होतो. तसा तो यंदाही झाला. त्यात भिन्न विचारसरणीच्या लोकांनी येणेही नवीन नाही, परंतु या वर्षी याची खूप चर्चा झाली. संघाला संपूर्ण समाज संघटित करायचा आहे. त्यामुळे संघाला कोणी परका नाही.  

बातम्या आणखी आहेत...