आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बीटी बियाण्यांच्या विक्रीआधीच नमुने जमा करा, कंपन्यांना अादेश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- बियाणे कंपन्यांकडून बियाणे खरेदी करून व वेगवेगळ्या नावांची लेबले लावून त्यांची विक्री करणाऱ्या राज्यातील २४८ बियाणे कंपन्यांच्या 'को मार्केटिंग' नामक गोरखधंद्याला चाप लावण्यात आला अाहे. मूळ बियाणे कंपन्यांनी बीटी कपाशीचे बियाणे बाजारात आणण्यापूर्वी त्या बियाण्यांचे नमुने कृषी विभागाकडे जमा करण्याची अट यंदा प्रथमच घालण्यात आली आहे. कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विजयकुमार यांनी 'दिव्य मराठी'शी बोलताना ही माहिती दिली. 


'बनावट बीटी बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. दर्जेदार बियाण्यांच्या नावावर शेतकऱ्यांच्या हाती दुसरेच बियाणे थाेपवून त्यांची फसवणूक केली जाते. गेल्या वर्षी त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला. त्यामुळे येत्या हंगामात शेतकऱ्यांना किमान बनावट बियाणे मिळू नये यासाठी कृषी विभागाकडून काळजी घेतली जात आहे,' असे विजयकुमार म्हणाले. बियाणे उद्योगातही को मार्केटिंगचा गोरखधंदा सुरू आहे. बियाणे उत्पादकांकडून मोठ्या प्रमाणात बियाणे खरेदी करून ती विविध नावांची लेबले लावून त्याची सर्रास विक्री केली जाते. हे बियाणे अपयशी ठरल्यावर त्याची निर्मिती नेमकी कोणी केली याचा नंतर शेतकऱ्यांना पत्ताच लागत नाही. त्यामुळे कंपनीवर जबाबदारी निश्चित करण्यात अडचणी येत होत्या. राज्यभरात आतापर्यंत अशा २४८ कंपन्या आढळून आल्या आहेत. या कंपन्यांना यापुढे अशा पद्धतीने बियाणे विकता येणार नाही. त्यांना मूळ कंपनीचे वितरक म्हणून बियाणे विकता येतील. मात्र, को-मार्केटिंगचा प्रकार आढळल्यास थेट गुन्हे दाखल होऊन कारवाई होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या कंपन्या प्रामुख्याने गुजरातच्या असल्याचे विजयकुमार यांनी सांगितले. 


शेतकऱ्यांनीही घ्यावी काळजी

बियाणे निर्मिती करणाऱ्या मूळ कंपन्यांनी बियाणे बाजारात आणण्यापूर्वी त्यांचे नमुने त्या त्या नावासह कृषी विभागाकडे जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या उपायांमुळे बनावट बियाणे बाजारात येण्यावर निश्चितपणे बऱ्याच प्रमाणात अंकुश लागू शकेल. अशा मुख्य कंपन्यांची संख्या राज्यात ६५ च्या आसपास आहे व त्यांच्याकडून सहकार्य मिळत असल्याचे विजयकुमार यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...