आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विरोधकांनाही मंत्रिपद देणारी आदर्श राजकीय व्यवस्था देशात यावी- खा. वरुण गांधी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- कुठलाही लोकप्रतिनिधी हा शंभर टक्के जनतेची मते घेउन निवडून येत नाही. मतदानातील काही टक्के मते त्याला मिळाली असतात. त्यामुळे विरोधी बाकावर बसणाºया तज्ज्ञ प्रतिनिधींचाही सन्मान व्हायला हवा. विरोधी पक्षातील एखादा प्रतिनिधी हा विशिष्ट क्षेत्रातील तज्ज्ञ असेल तर त्यालाही मंत्रिपद देता येईल का, याचाही विचार राजकीय व्यवस्थेत व्हायला हवा, असे धक्कादायक मत भाजपचे युवा खासदार वरुण गांधी यांनी नागपुरात बोलताना व्यक्त केले. 


नागपुरात आयोजित युवा परिषदेत वरुण गांधी बोलत होते. युवा मुक्ती अभियानाच्या वतीने ही परिषद आयोजित करण्यात आली होती. वरुण गांधी यांनी अतिशय परखडपणे परिषदेत आपली मते मांडली. विरोधकांमधील सक्षम नेत्यालाही मंत्रीपद देता येईल का? याचा विचार व्हावा, असे मत व्यक्त करताना वरुण गांधी यांनी येत्या काळात अशा आदर्श राजकीय व्यवस्थेचे मी स्वप्न बघत असल्याचे सांगितले. 


विरोधकांचाही सन्मान व्हायला हवा, असे सांगताना वरुण गांधी यांनी आपल्या पक्षालाही एकप्रकारे घरचा अहेर दिल्याचे मानले जात आहे. राजकारण हे युद्धाचे मैदान नाही. ती लढाई नसून समाजाच्या व पर्यायाने देशाच्या सेवेचे माध्यम आहे, असेही त्यांनी सांगितले. आपण आजपर्यंत एक रुपया देखील वेतन घेतलेले नाही, असेही त्यांनी सांगितले. बटन दाबून लोकप्रतिनिधी निवडून आणा आणि पाच वर्षांसाठी त्याची गुलामी करा, ही राजकीय व्यवस्थाच देशासाठी घातक असल्याचे ते म्हणाले. युवा वर्गासाठी आज पैसा हा फार मोठा विषय झाला आहे. मात्र, पैसा कमविण्यासह आपल्या बाजूच्या व्यक्तीचे दु:खही आम्हाला दूर करता आले तर आम्ही आपल्या स्वप्नातील भारत उभा करू शकू,असेही वरुण गांधी म्हणाले. यावेळी व्यासपीठावर डॉ. आंबेडकर विचारधारा विभागाचे अशोककुमार भारती, राजकुमार तिरपुडे, प्रा. केशव वाळके उपस्थित होते. 


देशासाठी काळा दिवस 
किमान दोनशे खासदार सरासरी २० कोटीहून अधिक संपत्तीचे मालक आहेत. या खासदारांनी त्यांचे मानधन समाजकार्यासाठी दान करण्याचा प्रस्ताव मी लोकसभाध्यक्षांना दिला होता. खासदारांच्या वेतनवाढीचा विरोध मी एकट्याने केला होता. मात्र, स्वतःचे वेतन वाढविण्यासाठी खासदारच संसदेेत गोंधळ घालणार असतील तर तो देशासाठी काळा दिवसच ठरतो, अशी टीकाही त्यांनी यावेळी बोलताना केली. 


बलात्कारीचे वय नसते, त्यास कठोर शिक्षा हवी 
बलात्कार करणारा व्यक्ती हा गुन्हेगाराच असतो. तो कुठल्या वयाचा आहे, यावर चर्चा होणे चुकीचे आहे. बलात्कारीला वयच नसते. तो बलात्कारीच असतो. अत्याचार करणाऱ्या व्यक्तीच्या वयाचा विचार आपण का करावा. असा प्रश्न उपस्थित करून त्याला कठोर शिक्षा व्हायला हवी, असे मतही खासदार वरुण गांधी यांनी व्यक्त केले. 

बातम्या आणखी आहेत...