आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती: जिल्ह्यात पावसाची हजेरी, मात्र बियाण्यांंच्या बाजार तूर्त थंडच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - शासकीय खरेदीचे रखडलेले चुकारे, कर्जवाटप, शेतमालाला मिळणारे मातीमोल भाव आदींचा गंभीर परिणाम कृषी बाजारपेठेवर दिसून येत अाहे. बुधवारी रात्री जिल्ह्यात मध्यमस्वरुपाचा पाऊस झाल्यानंतरही एरव्ही पावसापूर्वीच गजबजणाऱ्या बाजारपेठेत मात्र गुरूवारी मरगळ दिसून आली. 

 

जिल्ह्यात बुधवारी रात्री सर्वदूर मध्यम स्वरुपाच्या पावसाने हजरी लावली. दरवर्षी पाऊस येण्यापूर्वी साधारणत: पंधरा दिवसांपूर्वी खते व बियाणे खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी दिसून येते. परंतु संपलेल्या वर्षात शेतमालाला मिळालेले मातीमोल भाव, कर्ज वाटपाचा रुतलेला गाडा, शासकीय खरेदी योजनेचे रखडलेले चुकारे आदिंचा गंभीर परिणाम बाजारपेठेवर दिसून येत आहे. त्यातच मागील तीन वर्षांपासून जिल्ह्यातील प्रमुख सोयाबीनचे पीक दगाबाजी करणारे ठरले आहे. यावर्षी भरवशाच्या कपाशीवरील बोंडअळीने संभ्रमावस्था निर्माण करून ठेवली आहे. कापसासह मूग, उडीद, हरभरा, तुरीचे दर हंगामापासून साधारणत: तीन हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत घसरले आहेत. त्यामुळे तूर व हरभऱ्याचे उत्पादन होऊनही बाजारात मातीमोल भाव मिळाल्याने उत्पन्नात वाढ होऊ शकली नाही. 


त्यातही डिझेलचे दर वाढल्याने ट्रॅक्टरच्या मजुरीतही वाढ झाली आहे. अशा अवस्थेत अद्यापही कर्ज वितरण व शासकीय खरेदी योजनेच्या चुकाऱ्यात गती येऊ शकली नाही. त्यातच सोयाबीन, मूग, उडीद, कपाशी बेभरवशाचे ठरल्याने शेतकऱ्यांसमोर पेरणीचा मोठाच पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांजवळ पैसाच नसल्याने त्याचा परिणाम जिल्ह्यातील बाजारात दिसून येत आहे. शहरासह तालुक्याच्या ठिकाणची कृषी केंद्रांची दुकाने सध्या ओस पडली आहे. पाऊस येऊनही ग्राहक येत नसल्यामुळे कृषी बाजारपेठेवर मरगळ आल्याचे चित्र दिसून येत आहे. दरम्यान, नेमके यावर्षी काय पेरावे, याबाबत कमालीचा संभ्रम कायम असल्याने स्वस्तात पेरणी कशी होईल याकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे. बाजारातील महागडे बियाणे खरेदी करण्यासाठी पैशाची तजवीज होऊ शकत नसल्याने शेतकऱ्यांचा कल गावातीलच बियाणे खरेदीवर दिसून येत आहे. 

बातम्या आणखी आहेत...