आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सक्षम’ उपक्रमाची आता राज्यभर होणार अंमलबजावणी; अभ्यासक्रमात २१ कौशल्यांचा अंतर्भाव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या कल्पकतेतून साकार झालेल्या “सक्षम’ उपक्रमाची राज्यात अंमलबजावणी होणार आहे. िवद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानातून बाहेर काढून त्यांच्या कौशल्य विकासावर भर देणाऱ्या या अभ्यासक्रमाची भुरळ राज्याचे कौशल्य विकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनीही पडली. भंडाऱ्याला दिलेल्या भेटीत या अभ्यासक्रमाची संपूर्ण माहिती घेऊन पाटील यांनी राज्यात अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले. जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी काही शाळांना दिलेल्या भेटीत कौशल्याअभावी हुशार विद्यार्थीही मागे राहत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यातून हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला. स्पर्धा परीक्षांमध्ये ग्रामीण भागातील मुले मागे राहू नयेत अशा पद्धतीने अभ्यासक्रमाची रचना करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी सांगितले. 


कोअर कमिटी ठेवणार देखरेख

या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कोअर कमिटी तयार करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे २५ शिक्षकांची समिती सुद्धा कार्यरत असणार आहे. सक्षममध्ये विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची सवय, संवादाचे कौशल्य, अभिव्यक्तीचे कौशल्य आत्मसात करण्यावर भर देण्यात येणार आहे. विविध संस्थांनी “सक्षम’साठी पुढाकार घेण्याचे मान्य केले आहे.


१३५ शाळांत उपक्रम सुरू    
सक्षमच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रचलित अभ्यासक्रमासोबतच सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शन करणे अपेक्षित आहे. सुरुवातीला हा कार्यक्रम जिल्ह्यातील १३५ शाळांमध्ये राबवला जाणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्याने हा उपक्रम जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये राबवण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी सांगितले. यासाठी शिक्षक स्वत:हून तयार झाले आहे.


असा आहे अभ्यासक्रम   
प्रचलित अभ्यासक्रमासोबत २१ कौशल्य व  १० मूल्ये असलेला सक्षम उपक्रम जिल्हा प्रशासनाने नुकताच तयार केला आहे.  स्वच्छता व नीटनेटकेपणा, वक्तशीरपणा, संवेदनशीलता, वैज्ञानिक दृष्टिकोन, श्रमप्रतिष्ठा, सौजन्यशीलता, सर्वधर्म सहिष्णुता, स्त्री-पुरुष समानता, राष्ट्रीय एकात्मता व राष्ट्रभक्ती ही १० मूल्ये या उपक्रमात आहेत. वाटाघाटी, उत्कृष्टता, संघर्ष व्यवस्थापन, निर्णयक्षमता, ताणतणावाचे व्यवस्थापन, डिजिटल नागरिकत्व, उद्योजकता, जिज्ञासा, दृश्यक्षमता, नेतृत्व पुढाकार, कल्पना निर्मिती, समस्या निराकरण, चिकित्सक विचारप्रणाली, प्रणाली विचार, माहिती साक्षरता, पार्श्विक विचार, नवनिर्मिती, समानुभूती, लवचिकता, स्वचा विकास, अनुकूलता अशा २१ कौशल्याचा अंतर्भाव सक्षम उपक्रमात आहे.  

बातम्या आणखी आहेत...