आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानागपूर- इंटरनेटच्या मायाजालातून विद्यार्थ्यांना एका क्लिकवर पाहिजे ती माहिती मिळते, पण ज्ञान मिळत नाही. विद्यार्थ्यांपर्यंत हे ज्ञान पोहोचवण्यासाठी व वाचनाची आवड रुजवण्यासाठी वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील शिक्षक सचिन सावरकर यांनी पाच वर्षांपूर्वी ‘पुस्तक दोस्ती’ अभियान सुरू केले. २४ एप्रिल २०१२ ला जागतिक पुस्तकदिनी सुरू केलेल्या या उपक्रमातून आतापर्यंत दहा हजार विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागली.
‘पुस्तक दोस्ती अभियान’ आज वर्धा जिल्ह्याची ओळख झाले आहे. लवकरच राज्यभरात विस्तार करण्याचा मानस सावरकर यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केला. येत्या २४ एप्रिल २०१८ ला वर्ध्यातील देवळी तालुक्यातील आंजी-अंदोरी व नांदोरा या दोन गावांत लोकसहभागातून ‘पुस्तक दोस्ती वाचनालय’ सुरू करण्यात येईल. पंधरवड्याला एक याप्रमाणे महिन्यातून दोन अशी वर्षाला २४ वाचन शिबिरे आम्ही घेतो. एका शिबिरात सुमारे ७० ते ८० मुले-मुली सहभागी होतात. पाच वर्षांत १२० शिबिरांच्या माध्यमातून सुमारे दहा हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलो, असे सावरकर यांनी सांगितले. ८ ते १० आणि १० ते २० वयोगटातील मुले शिबिरात सहभागी होतात.
लोकसहभागातून मिळतात पुस्तके
अभियानासाठी काही पुस्तके विकत तर काही लोकसहभागातून संकलित केली जातात, असे सावरकर म्हणाले. सावरकर व महेश भिरंगे, विकास बोंदाडे, गणेश चंदनखेडे, किरण भावरकर, नामदेव साखरकर, प्रभाकर पाटील, विवेक महाजन, सिंथिया तेलंग, गौरी देशमुख, प्रीती महाजन, क्षितिजा जाधव हे विद्यार्थी व सहकारी या उपक्रमात सहभागी आहेत.
शिबिरानंतर वक्तृत्व, निबंध स्पर्धा
शहर आणि गावांत शिबिराच्या एक दिवस आधी गाव तसेच शहरातील वॉर्डात अभियानाचे कार्यकर्ते पालकांशी संपर्क साधून शिबिराची संपूर्ण माहिती देतात. दुसऱ्या विद्यार्थ्यांना साने गुरुजी, चिं. वि. जोशी, पु. ल. देशपांडे, स्वामी विवेकानंद, रामकृष्ण परमहंस आदींची पुस्तके वयोगटानुसार वाचण्यासाठी दिली जातात. महिनाभरानंतर ‘मी वाचलेले पुस्तक’ या विषयावर दहा मिनिटांची वक्तृत्व तसेच निबंध स्पर्धा घेण्यात येते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.