आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती: 'मैत्रेय'च्या दोन महाठगांना नाशकात अटक; चौकशीसाठी आणले शहरात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- गुंतवणूक केलेली रक्कम दामदुप्पट करून देण्याचे किंवा भूखंड देण्याचे आमिष दाखवून शहरासह जिल्ह्यातील तब्बल ४१ हजार गुंतवणुकदारांना जवळपास ७४ कोटी रुपयांनी फसवल्याप्रकरणी शहर पोलिसांनी गुरुवारी दोन महाठगांना नाशिकमधून अटक करून शहरात आणले. हे दोघेही वसईचे रहिवासी आहेत. या दाेघांना २३ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. 


मैत्रेयच्या सर्वेसर्वा वर्षा सत्पाळकरसह पाच जणांविरुद्ध दीड वर्षांपूर्वी काेट्यवधींच्या फसवणूक प्रकरणात शहरात गुन्हा दाखल केला होता. दरम्यान नाशिक कारागृहात असलेले मैत्रेयचे दोन सहायक महाव्यवस्थापक तसेच मैत्रेय बंद करण्याचे आदेश आल्यानंतर नव्याने सुरू केलेल्या 'मैत्री सुवर्णसिद्धी' कंपनीच्या संचालकांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुरूवारी नाशिक कारागृहातून ताब्यात घेतले व अटक केली. त्यांना न्यायालयाने २३ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. 


लक्ष्मीकांत श्रीकृष्ण नार्वेकर (४९) आणि विजय शंकर तावरे (४९, दोघेही रा. वसई, पालघर) असे पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत. हे दोघेही मैत्रेयमध्ये सहायक महाव्यवस्थापक पदावर कार्यरत होते. मैत्रेयविरुद्ध राज्यात २१ ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये इतरांसोबत नार्वेकर व तावरे यांच्याविरुद्धही गुन्हे दाखल असल्यामुळे नोव्हेंबर २०१७ मध्ये या दोघांना नाशिक पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर ठाणे, अहमदाबाद पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. दरम्यान १६ मे रोजी आर्थीक गुन्हे शाखेचे पीएसआय प्रविण पाटील, एएसआय दिलीप वाघमारे, अनिल तायवाडे आणि किशोर अंबुलकर हे पथक दोघांना गुरूवारी सकाळी घेऊन शहरात पोहाेचले. आता या दोघांना घेवून पोलिस तपासासाठी मुंबईत जाणार आहे. कारण मुंबईतील विरार येथे मैत्रेयची मुख्य शाखा होती. नार्वेकर व तावरे हे दोघेही पदोन्नतीने २०१३ पर्यंत सहायक महाव्यवस्थापक पदावर पोहोचले. 


सत्पाळकर अद्यापही फरारच :मैत्रेयच्या सर्वेसर्वा वर्षा सत्पाळकर या गुन्ह्यातील मुख्य आरोपी आहेत. त्यांना तात्पुरता अटकपूर्व जामिन मिळाला होता. मात्र त्याची मुदत संपलेली आहे. दरम्यान पोलिसांनी यापूर्वी वर्षा सत्पाळकरचा नातेवाईक जनार्धन परुळेकर याला पोलिसांनी अटक केली होती. आता नार्वेकर व तावरेला अटक झाली आहे. त्यामुळे वर्षा सत्पाळकर व नितीन चौधरी हे दोघे फरार आहेत. 


कोण आहेत नार्वेकर व तावरे 
लक्ष्मीकांत नार्वेकर व विजय तावरे हे दोघेही मधुसुदन सत्पाळकर यांचे वर्गमित्र होय. सत्पाळकर, नार्वेकर व तावरे यांनी वसईच्या अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयातून बी. काॅम.ची पदवी घेतली होती. दरम्यान १९९९ मध्ये मधुसुदन सत्पाळकर यांनी 'मैत्रेय प्लॉटर्स अॅन्ड स्ट्रक्चर्स' कंपनीची स्थापना केली व त्यामध्ये विश्वासू मित्र म्हणून दोघांनाही सहभागी करून घेतले. त्यानंतर नार्वेकर व तावरे हे मैत्रेयविरुद्ध गुन्हा दाखल होईपर्यंत त्यांच्यासोबत जुळलेले होते. 


दरम्यान, मैत्रेयला २०१३ मध्ये 'सेबी'ने नोटीस बजावून अशाप्रकारचा व्यवसाय करण्यावर बंदी घातली. त्यानंतर वर्षा सत्पाळकर यांनी नवा फंडा शोधला. त्यांनी मैत्रेय बंद करून 'मैत्री सुवर्णसिद्धी' ही कंपनी सुरू केली. विशेष म्हणजे या कंपनीचे रजिस्ट्रेशन बंगलोरला केले कारण महाराष्ट्रात सेबीने बंदी घातली होती. या कंपणीमध्ये महाठग नार्वेकर व तावरे हे दोघे संचालक होते. या कंपणीने गुंतवणूकदारांना जमा झालेल्या रकमेपेक्षा अधिक किमतीचा सुवर्णदागिना किंवा भुखंड देण्याचे आमिष दिले होते. शहरातही 'मैत्री सुवर्णसिद्धी'चेे काम सुरू झाले होते. 'मैत्री सुवर्णसिद्धी'चे संचालक म्हणून नार्वेकर व तावरे यांच्या खात्यात ३० लाख रुपये असल्याचे पोलिसांना तपासादरम्यान उघड झाले. त्यामुळे पोलिसांनी दहा महिन्यांपूर्वीच ते खाते सील करण्याबाबत बँकेला पत्र दिले होते. तपास यंत्रणेला या दोघांची अटक महत्वाची होती व ती आता झाली आहे. 


१९९९ मध्ये वेतन ५ हजार २०१५ मध्ये १ लाख 
या दोघांनाही मधुसुदन नार्वेकरांनी १९९९ मध्ये कंपनीमध्ये कामावर घेतले. त्यावेळी दोघांनाही प्रतिमाह पाच हजार रुपये वेतन मिळायचे, भविष्यात मैत्रेयचा पसारा वाढला. देशभरात १०४ शाखा सुरू झाल्यात जवळपास २५ लाखांपर्यंत गुंतवणूकदार झालेत दोन हजार ते २ हजार २०० कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक पोहोचवली. त्यामुळे नार्वेकर व तावरे यांच्या वेतनातही भरघोस वाढ झाली. सप्टेंबर २०१५ ला त्यांनी मैत्रेयचे शेवटचे वेतन घेतले ते होते प्रतिमाह १ लाख ३८ हजार रुपये. 


१२८ मालमत्ता लिलाव साठी 'नोटिफकेशन' 
मैत्रेयचे राज्यात २१ ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. तपासादरम्यान पोलिसांनी मैत्रेयच्या ज्या ज्या मालमत्ता उघड केल्या होत्या. त्यापैकी पाच मालमत्तेचा लिलाव करून ती रक्कम नाशिक येथे उघडलेल्या 'इस्त्रोव्' खात्यात जमा केली असून, नव्याने १२८ मालमत्तांचा लिलाव करण्यासाठी सक्षम प्राधिकारी अधिकाऱ्याने 'नोटीफिकेशन' काढले अाहे. दरम्यान या दोघांना घेवून मुंबईत तपासासाठी जाणार आहे. 
- पंजाबराव वंजारी, पोलिस निरीक्षक 

बातम्या आणखी आहेत...