आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार राज्यांना जोडणाऱ्या रेल्वे मार्गाचे काम कासवगतीने सुरू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोनू सावजी- आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि गुजरात या चार राज्यांना जोडणाऱ्या रेल्वे मार्गाच्या विस्तारीकरणाचे काम अतिशय संथगतीने सुरू असल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला असून, या मार्गाचे काम त्वरित आणि वेगाने पूर्ण करण्याची मागणी केली आहे. 


पूर्वी मिटरगेज मार्गाने सिकंदराबाद ते जयपूर ही गावे जोडली गेली होती. या मार्गावर चार राज्यांमधील अनेक गावे आहेत. नंतर या मार्गाचे टप्प्या टप्प्याने मिटर गेजचे ब्रॉड गेजमध्ये रुपांतर करणे सुरु झाले. यापैकी सिकंदराबाद ते अकोला हा मार्ग लवकर ब्रॉडगेजमध्ये रूपांतरीत झाला. मधला अकोला ते महू हा मार्ग अनेक वर्षे मिटरगेज मधेच कायम राहिला. त्यापुढे ब्रॉडगेज झाले. आता अकोला ते खंडवा या मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रुपांतर करण्यासाठी १ जानेवारी २०१७ पासून या मार्गावरील मीटर गेजची वाहतूक बंद करण्यात आली आहे. अकोट ते अकोला या दोन रेल्वे स्थानकांमधील रुळही काढण्यात आले आहेत. ब्रॉडगेजचे काम सुरू झाले आहे. पण, त्याचा वेग मात्र कमी आहे. 


अकोट ते अकोला या मार्गावर लहान मोठे १५ पुल आहेत पैकी ४ पूलांची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित काही पुलांचे काम सुरू झाले तर काहींचे काम अद्यापही सुरू व्हायचे आहे. 


अकोटच्या स्टेशनचे काम सुरूच नाही
अकोटच्या स्टेशनवर मोठ्या प्रमाणावर काम करावे लागणार आहे. फलटाची कामे, दादरा, गूडस् शेड, स्टेशनवरील कार्यालये, तिकीट खिडकी, प्रतिक्षा गृह, स्वच्छता गृहे, कॉटिन आदी अनेक कामे आहेत. मात्र, या कामांना अद्याप सुरुवातच झाली नाही. 


अकोट पुढील मार्गाचे काय?
अकोटपर्यंत मार्गाचे काम सुरू झाले. पण, अकोट ते खंडवा हा मार्ग पूर्ण झाल्याशिवाय या रुंदीकरणाला काहीही अर्थ राहणार नाही. अकोट ते खंडवा या मार्गावर अभयारण्य असल्याने वनखात्याचे नियम अडसर ठरत आहेत. त्यासाठी तोडगा काढणे आवश्यक आहे.

 
मातीचा भराव टाकणे सुरू
ब्रॉडगेज रुळांसाठी मातीचा उंच भराव पाहिजे, ते काम सुरू झाले आहे. अकोला ते कुटासा व पाटसूल या भागात काम वेगाने सुरू आहे. मात्र, अकोटकडे कामाचा वेग अतिशय कमी दिसत आहे.

 
आदिवासींची गैरसोय
मीटरगेज रेल्वे मार्ग बंद झाल्याने मेळघाटात राहणाऱ्या आदिवासींची गैरसोय होत आहे. हे आदिवासी तुकईथर्ड येथे उतरून मग त्यांच्या गावी जात होते. आता त्यांना खासगी बस सेवेचा सहारा घ्यावा लागतो. 


अाता ग्राहक पंचायत करणार पाठपुरावा 
या कामाला गती यावी, यासाठी जिल्हा व केंद्रिय कार्यकारिणीच्या सहकार्याने पाठपुरावा करू द्या.
- ओमप्रकाश हेडा, अध्यक्ष ता. ग्राहक पंचायत 


रुळाच्या रुंदीकरणाचे काम सुरू अाहे 
अकोटच्या स्टेशनवर अनेक कामे प्रस्तावित आहेत. रुळाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. फलटाची कामे, दादरा, गूडस् शेड, स्टेशनवरील कार्यालये, तिकीट खिडकी, प्रतिक्षा गृह, स्वच्छता गृहे यासह विविध कामे लवकरच करण्यात येतील.
- हरीचरण मीना, स्टेशन मास्टर, अकोट 


व्यापारी महासंघ घेणार कामासाठी पुढाकार 
खासदार धोत्रे हे रेल्वे समितीचे अध्यक्ष आहेत त्यांच्या कड़े या मार्गाचे काम लवकर पूर्ण होण्यासाठी पुढाकार घेऊ.
- संतोष झुनझुनवाला,व्यापारी महासंघ अकोट 

बातम्या आणखी आहेत...