आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्पर्धेतून येणारी जलसमृद्धी हाच शेतकरी आत्महत्यांवर उपाय -अभिनेता आमिर खान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अामीर खान यांनी पत्नीसह केले राणवाडी येथे श्रमदान - Divya Marathi
अामीर खान यांनी पत्नीसह केले राणवाडी येथे श्रमदान

नागपूर/वर्धा- विदर्भासह राज्यात होणाऱ्या शेतकरी आत्महत्या या दुखदच आहे. शेतकरी आत्महत्येच्या बातम्या ऐकून मन सुन्न होते. पण वाॅटर कप स्पर्धेतून गावागावात येणारी जलसमृद्धी हाच यावरील सकारात्मक उपाय आहे, असे स्पष्ट प्रतिपादन अभिनेता आमिर खान याने येथे केले. वाॅटर कप स्पर्धेच्या निमित्ताने आमिर व त्याची पत्नी किरण राव गेले तीन दिवस विदर्भात आहेत. मंगळवारी नागपुरात आयोजित पत्र परिषदेत आमिरने मनमोकळ्या गप्पा मारल्या. 


वाॅटर कप स्पर्धेच्या माध्यमातून पाणी फाऊंडेशन आणि महाराष्ट्र शासन जलयुक्त शिवारच्या माध्यमातून उपयुक्त काम करीत आहे. यामुळे दुष्काळी भागात जलसमृद्धी आल्याने अनेक गावात परिणामकारक बदल झाले आहे. लोक दोन्ही हंगामात पिक घेत आहे. सातत्याने सुरू राहाणाऱ्या या कार्यक्रमामुळे शेती समृद्ध होऊन शेतकरी आत्महत्या थांबण्यास मदत होईल, असे आमिर म्हणाला. 


महिलांचा सहभाग लक्षणीय
वाॅटर कप स्पर्धेमुळे अनेक दुष्काळी गावात पाणी आले. ऐन उन्हाळ्यात गावात पाणी खेळते आहे. शेतकरी दुबार पिक घेत आहे. यामुळे गावात सामाजिक-आर्थिक बदल घडून येत असल्याचे आमिरने सांगितले. वाॅटर कप स्पर्धेच्या कामात महिलांचा सहभाग लक्षणीय असल्याचे आमिरने आवर्जुन सांगितले. अनेक ठिकाणी पुरूष थोडा कंटाळा करतात. पण महिला हीरीरिने सहभागी होतात. 


वाॅटर कपमुळे मनसंधारण 
वाॅटर कप स्पर्धेमुळे गावेच्या गावे एकजूट होऊन कामाला लागली आहे. ३००-४०० गावकरी मतभेद विसरून एकदिलाने काम करीत आहे. जलसंधारणामुळे लाेकांचे मनसंधारण झाले असून हे वाॅटर कपस्पर्धेचे यश आहे, असे आमिर म्हणाला. लोक कोणाचीही मदत न घेता स्वयंप्रेरणेने स्वत:ची कामे स्वत:च करीत आहे. आम्ही फक्त फक्त तांत्रिक आणि जलसंधारणाची कामे कशी करायची याचे प्रशिक्षण देतो. बाकी लोक स्वत: पुढाकार घेऊन करतात. 


गाव पाणीदार करण्याचा ग्रामस्थांनी घेतला संकल्प 
जिल्ह्यासह ग्रामीण भागात पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे.या करिता तूफान आलंया पाणी फाउंडेशनच्या वतीने आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेमध्ये कारंजा तालुक्यातील राणवाडी या गावात आज सिने अभिनेते अमीर खान व त्यांची पत्नी किरणराव यांच्यासह अंध विद्यार्थ्यांनी श्रमदान करून पाणीदार गाव करण्याचा संकल्प यावेळी देण्यात आला. 


यावेळी त्यांचे सोबत अंध असलेल्या पाणी फाउंडेशनच्या जवळपास पाच ते सात युवकांनी श्रमदान केले.अमीर खान व त्यांच्या पत्नी किरणराव यांनी श्रमदानास सुरुवात करताच अनेक हात समोर आले त्या दोघांच्या समक्ष गाव पाणीदार करण्याची शपथ घेण्यात आली. यावेळी प्रशासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी प्रकाश शर्मा, कारंजा तहसिलदार श्री. कुमावत, गटविकास अधिकारी उमेश नंदगवळी,जिल्हा माहिती कार्यालयाचे वरिष्ठ लिपिक दिलीप बोडंसे व पाणी फांउडेशनचे विदर्भ समन्वयक चिन्मय उपस्थित होते. जिल्हयातील आर्वी तालुक्यातील 45, कारंजा 90,सेलू 45, देवळी व वर्धा येथील गावे सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या असून स्पर्धेत सहभागी गावात लोकसहभागातून तलाव खोलीकरण, नाला खोलीकरण, दगडीबांध, बांध बंदिस्थी, शेाष खड्डे, रोप वाटिका, आगपेटीमुक्त शिवार या सारखे कामे केल्या जात आहे. यासाठी नागरिकांचा व सामाजिक संस्थेचा मोठा सहभाग मिळत आहे. यावेळी अमीर खान यांनी पाणी फाउंडेशने दिव्यांग कार्यकर्ते बंडू धुर्वे यांचे सोबत संवाद साधला.अमीर खान गावात येणार असल्यामुळे सर्वांनी एकच गर्दी केली होती. अमीर खान यांचे आगमन होताच पोलीस यंत्रणांना मोठ्या प्रमाणात नागरिकांना समज देण्याचा प्रयत्न केला जात होता. तसेच अामीर खान यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविण्याकरिता त्यांच्या सोबतच्या क्रिकेट सामन्यात सहभाग घेताच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदअश्रू दिसून येत होते. 

बातम्या आणखी आहेत...