आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुचाकीवरून पडले; बसच्या चाकात गेले, 2 दुचाकीच्या धडकेत एक ठार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इन्‍सेटमध्‍ये वरती जखमी रामदास अंबाटकर, मृतक सहदेवराव उमक व मृतक सहदेवराव उमक यांची अपघातग्रस्त दुचाकी.... - Divya Marathi
इन्‍सेटमध्‍ये वरती जखमी रामदास अंबाटकर, मृतक सहदेवराव उमक व मृतक सहदेवराव उमक यांची अपघातग्रस्त दुचाकी....
दर्यापूर - दोन दुचाकीची धडक झाल्यानंतर खाली पडलेल्या दुचाकीस्वाराच्या डोक्यावरून मागून येणाऱ्या एसटीचे चाक गेल्याने घटनास्थळीच मृत्यू झाला. सहदेवराव बाबनजी उमक (वय ६२) रा. नरदोडा, माजी सरपंच असे मृतकाचे नाव आहे. दुसऱ्या दुचाकीवरील रामदास अंबाटकर रा. अकोट हे गंभीर जखमी झाले. ही घटना मंगळवारी सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास सांगळूद नजीकच्या गयाठी नाल्यावरील पुलावर घडली.

 

नरदोडा येथील सहदेवराव उमक दुचाकीने (क्रमांक एमएच२७ एक्यू ५६३३) अकोटकडे जात होते. दरम्यान, अकोट येथील रहिवाशी रामदास अंबाटकर दुचाकीने (क्रमांक एमएच ३० बीए ४६३५) लग्नासाठी दर्यापूरला येत होते. सांगळूद-अकोट दरम्यानच्या गयाठी नाल्यावरील पुलावर दोन्ही दुचाकींची धडक झाली. यात उमक रस्त्यावर पडले. दरम्यान मागून येत असलेल्या अमरावती आगाराच्या एमएच ४० वाय ५०१२ या क्रमांकाच्या एसटीचे मागील चाक उमक यांच्या डोक्यावरून गेले. यात डोक्याचा चेंदामेंदा झाल्याने उमक यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दुसऱ्या दुचाकीवरील रामदास अंबाटकर भिंतीवर जाऊन धडकल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. शहरातील गोदावरी रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर अंबाटकर यांना अकोला येथे पुढील उपचारासाठी पाठवले. दरम्यान येवदा पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून अमरावती येथील महामंडळाची बस व दोन दुचाक्या ताब्यात घेतल्या. पोलिसांनी बस चालक मो. सादीक मो. खलील (वय ५५) रा. अमरावती यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून सायंकाळी अटक केली. घटनेचा पुढील तपास येवद्याचे ठाणेदार नितीन चरडे करत आहे.


अरबट यांच्या मदतीने अंबाटकरवर उपचार
घटनेनंतर मृतक सहदेवराव उमक व जखमी रामदास अंबाटकर यांना बघण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. दरम्यान, शिवसेनेचे तालुका प्रमुख गोपाल अरबट यांनी माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह स्वत:च्या गाडीत आणला, तर अंबाटकर यांनाही उपचारासाठी दर्यापुरात पोहोचवण्यासाठी वाहनाची व्यवस्था केली.

 

 

बातम्या आणखी आहेत...