आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

13 वर्षीय विद्यार्थ्याला एसटीने चिरडले, नागरिकांनी जाळल्या दोन बसेस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वरुड - येथील विश्राम गृहाजवळून सायकलने शाळेत जात असलेल्या एका १३ वर्षीय विद्यार्थ्याला एसटीने धडक दिली. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी पावणे बाराच्या सुमारास घडली. ताबीज राजा फिरोज खाँ पठाण (१३) असे मृतक विद्यार्थ्याचे नाव आहे. घटनेनंतर संतप्त जमावाने राज्य परिवहन महामंडळाच्या दोन बसेस जाळत बसस्थानक परिसरात दगडफेक केली. त्यामुळे नागरिकांमध्ये काही काळ दहशतीचे वातावरण झाले होते. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

 

मृतक ताबीज राजा फिरोज खाँ पठाण हा शहरातील शांतिनिकेतन शाळेतील इयत्ता सातवीचा विद्यार्थी होता. घटनेच्या वेळी तो सायकलने शाळेत जाण्यास निघाला होता. दरम्यान पावणे बाराच्या सुमारास तो येथील विश्रामगृहाजवळून जात असताना वरुडहून अमरावतीकडे जात असलेल्या एसटी (क्रमांक एमएच ४० एन ८४ ९) त्याला धडक बसली. त्यात त्याचा गाडीखाली येऊन जागीच मृत्यू झाला. घटना घडताच बस चालक अब्दूल रफिक अब्दूल रौफ याने घटनास्थळावरून पळ काढला. संतप्त नागरिकांनी बसमधील प्रवाशांना खाली उतरवून बाजूलाच असलेल्या संत्रा मंडीतून तणस, रॉकेल आणून अपघात झालेल्या एसटीसह दुसरी एक एसटी (एमएच ४०/ एन ८४५२) जाळली. दोन्ही बसला लावलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाची गाडी आली असता, जमावाने तिचीही तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, जमावाला पांगवण्यासाठी अमरावती येथून दंगा नियंत्रक पथक बोलावले शहरात तणावपूर्ण शांतता असून, एसडीपीओ दिलदार तडवी, ठाणेदार गोरख दिवे, तहसीलदार बिजवल, नायब तहसीलदार शहारे, देशमुख, शेंदुरजना घाटचे ठाणेदार नितनवरे, बेनोड्याचे ठाणेदार शांतीकुमार पाटील, मोर्शीचे ठाणेदार राजेश राठोड, शिरखेडचे ठाणेदार नितीन चव्हाण, वरुडचे सपोनि. सुनील पाटील, विजय शिंगाडे, दंगा नियंत्रक पथक लक्ष ठेवून आहे.


पोलिसांनाही झाली मारहाण : अपघाताची माहिती मिळताच वरुड पोलिस ताफ्यासह तत्काळ घटनास्थळावर दाखल झाले. मात्र संतप्त जमावाने त्यांनाही मारहाण करण्याचा प्रयत्न केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणेदार गोरख दिवे यांनी शेुंदरजनाघाट, बेनोडा, मोर्शी, शिरखेड येथील पोलिस पथकाला पाचारण केले.

 

शाळा, महाविद्यालय केले बंद : खबरदारीचे उपाय म्हणून पोलिसांनी शहरातील संपूर्ण शाळा व महाविद्यालय बंद ठेवले.  


दगडफेकीमुळे विद्यार्थी व नागरिकांत दहशत
पोलिस घटनास्थळावरून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न करत असतानाच जमावाने दगडफेक करत बसस्थानकाकडे धाव घेतली. दगडफेकीत काही नागरिक किरकोळ जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यामुळे विद्यार्थी व नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले. जमावाने काही दुचाकींचीही तोडफोड केली. घाबरलेले विद्यार्थी जागा मिळेल तिथे लपून जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होते.

 

बातम्या आणखी आहेत...