आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१५ मित्रांनी एकत्र येत सुरु केला कापूस यांत्रिकीकरण प्रकल्प

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- निवृत्त झालेले कृषी अधिकारी, कृषी यंत्र उत्पादक, कृषी सेवा केंद्राचे संचालक, शेतकरी तसेच कृषीमित्रांचा समावेश असलेला जय गजानन कृषीमित्र परिवार हा अकोला जिल्ह्यातील एक व्हाॅटस अॅप ग्रुप. या ग्रुपवर फक्त आणि फक्त कृषीसंबंधी माहितीची देवाण घेवाण व्हायची. यातीलच पंधरा मित्रांनी एकत्र येऊन पूर्ण वेळ शेतीसाठी काम करायचे ठरवून जय गजानन अॅग्रो बिजनेस एल. एल. पी. हा ग्रुप स्थापन केला. आज हा ग्रुप पश्चिम िवदर्भात सघन कापुस लागवडीद्वारे समृद्धी आणण्यासाठी प्रयत्नरत आहे. 


अकोला जिल्ह्यात दोन लाख हेक्टर जमीन कापुस कापुस लागवडीखाली होती. सोयाबीन आल्यानंतर कमी वेळेत,कमी श्रमात आणि फारसे वैयक्तिक लक्ष न देता सोयाबीन हाती येत असल्यामुळे हळूहळू कापसाचे क्षेत्र कमी होत गेले. सोयाबीनमध्ये नवीन जातींचा तसेच पिकांच्या फेरपालटाचा अभाव, पावसाची अनियमितता, पावसाने दडी मारण्याच्या काळात उथळ मुळांमुळे तग न धरण्याची क्षमता, अवेळी पावसामुळे कापणीचा हंगाम संकटात सापडणे आदी कारणांमुळे अलिकडे सोयाबीनची उत्पादकता घटत चालली आहे. ज्वारी, मुग, उडीद, मका आदी खरीप पिके हवामान बदल आणि वन्यजीवांच्या उपद्रवामुळे कमी होत चालली आहे. अशा परिस्थितीत कापुस हेच पिक परवडणारे आहे. हा विचार करून कृषी यांत्रिकीकरणाचा प्रकल्प सुरू केल्याचे सोनोने यांनी सांगितले. 


आज शेतकऱ्यांना मजूर मिळत नाही, मजूरीचे दर परवडत नाही, नांगरणी, डवरणी, वेचणी आदींचे खर्च खूप आहे. यावर यांत्रिकीकरणाद्वारे सघन कापुस लागवड हा एक चांगला पर्याय होऊ शकतो, असे सोनोने म्हणाले. २०१६-१७ मध्ये ग्रुपने प्रायोगिक तत्त्वावर अकोला जिल्ह्यातील २७ गावांमध्ये ५२ शेतकऱ्यांच्या ३९१ एकरात आणि २०१७-१८ मध्ये अकोला, बुलढाणा, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यातील ८५ गावांमध्ये १९४ शेतकऱ्यांच्या १७०४ एकर शेतीत संपूर्ण यात्रिकीकरणाद्वारे अतिघनता कापुस लागवड केल्याचे मोहन सोनाेने यांनी दिली. यावर्षी लागवड केलेले पिक नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये निघून शेतकरी रब्बी हंगामात हरभरा, गहु इत्यादी पिके घेऊ शकतात, असे सोनोने म्हणाले. अतिघनता कापुस लागवडीत एका एकरात २५ ते २७ हजार झाडे लागतात. यात प्रति एकर बियाण्याची पाच पाकिटे लागतात. पेरणीच्या वेळी एकदाच खत द्यावे लागते. अतिघन कापुस लागवडीत गवत होत नाही. डवरा दोनच वेळा करावा लागतो.

 

कापुस सोबत फुटतो आणि पहिल्याच वेच्यात ३ ते ५ क्विंटल निघतो. मजूरीचा व वेचणीचा खर्च वाचून २० ते ५० टक्के नफा होतो, असा दावा सोनोने यांनी केला. यामध्ये फळधारणा करणाऱ्या फांद्या वाढवून झाडांची उंची मर्यादित ठेवली जाते. बी समान अंतरावर आणि समान खोलीवर टाकून उगवण शक्ती वाढवली जाते व खांडण्या न पडता योग्य वाढ केली जाते. यंत्राचा वापर केल्यामुळे एकाच दिवसात वेचणी होऊन खर्च कमी येतो. १० ते १५ युवा शेतकरी स्वत:चा गट तयार करून कृषी यांत्रिकीकरणाचा व्यवसाय करू शकतात. आम्ही ५,५०० रूपयांमध्ये शेतकऱ्यांना लागवडीपासून काढणीपर्यत सर्व मदत करतो, असे सोनोने यांनी स्पष्ट केले. 

बातम्या आणखी आहेत...