आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती: बँकांविरोधात तक्रारी घेऊन 164 शेतकरी पोहचले जनता दरबारात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - शासनाने कर्जमाफी करून वर्ष उलटले तरीही कर्जमाफीचा घोळ संपता संपेना. मागील वर्षी ठराविक शेतकऱ्यांना कृषी कर्ज मिळाले होते. किमान यंदा तरी खरीप हंगामाची 'सोय' लागावी म्हणून शेतकऱ्यांना कृषीकर्ज मिळणे आवश्यक आहे.

 

मात्र अजूनही हजारो शेतकऱ्यांचे कर्ज माफ होऊनही नवीन कर्ज मिळाले नाही. त्यामुळे बँकांसंदर्भात अडचणी असल्यास तक्रार करण्याचे आवाहन करत आमदार बच्चू कडू यांनी शनिवारी (दि. २३) शासकीय विश्रामगृहात घेतलेल्या जनता दरबारात १६४ शेतकऱ्यांनी सकाळी नऊ वाजेपासून आपली गाऱ्हाणी मांडली.यापैकी बहुतांश प्रकरणात आमदार बच्चू कडू यांनी संबधित बँक अधिकाऱ्यांना थेट फोन लावून धारेवर धरले होते.

 

गतवर्षी राज्य शासनाने दीड लाखापर्यंत शेतकऱ्यांचे थकीत कृषीकर्ज माफ करण्याची घोषणा केली. मात्र वर्षभरानंतरही नेमक्या कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आणि कोणाला नाही, हा घोळ अजूनही संपलेला नाही. त्यामुळे कित्येक शेतकऱ्यांकडे यंदा खरीप हंगामात पेरणीची सोय नाही. यातही बँकेकडून शेतकऱ्यांना योग्य वागणूक मिळत नसल्याने आमदार कडू यांनी शनिवारी जनता दरबार घेऊन शेतकऱ्यांच्या तक्रारी व पीक कर्जासंबंधीच्या अडचणी जाणून त्या सोडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी बँकांच्या विरोधात तक्रारी घेऊन आलेल्या शेतकऱ्यांची अडचण समजून घेत आमदार कडू यांनी तक्रारींची वर्गवारी केली. यापैकी काही तक्ररी या जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावरील होत्या तर काही तक्रारींसदर्भात संबधित बँक अधिकाऱ्यांना बच्चू कडू यांनी फोन लावून शेतकऱ्यांचे काम मार्गी का लागत नाही, असा प्रश्न त्यांच्या खास शैलीत विचारून, तातडीने प्रश्न मार्गी लावून कर्ज देण्याबाबत सांगितले.
यावेळी जिल्ह्यातील चांदूर बाजार, तिवसा, भातकुली, अमरावती तालुक्यातील शेतकऱ्यांसह यवतमाळ व वाशिम जिल्ह्यातूनही काही शेतकरी आले होते. यावेळी प्रहारचे छोटू महाराज वसू, चंद्रकांत खेडकर, जागेंद्र मोहोड यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

 

जिल्हाधिकाऱ्यांशी केली चर्चा:
जनता दरबारात शेतकऱ्यांनी बँकांविरोधात केलेल्या तक्रारींचा 'गठ्ठा' घेऊन आमदार कडू दुपारी जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांच्याशी चर्चा केली.

 

सहा महिन्यांनतरही दिले नाही कर्ज
जनता दरबारात चांदूर बाजार तालुक्यातील पुरूषोत्तम राऊत हे शेतकरी आले होते. त्यांच्याकडे घाटलाडकीच्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे एक लाख ६९ हजार रुपये कर्ज होते. त्यापैकी दीड लाख रुपये कर्जमाफ झाले. त्यामुळे उरलेली रक्कम व त्यावरील व्याज मिळून राऊत यांनी २१ डिसेंबर २०१७ रोजी बँकेत ३३ हजार ८९८ रुपयांचा भरणा केला. असे असतानाही अद्याप राऊत यांना नवीन कृषीकर्ज बँकेकडून मिळालेले नाही. असे जिल्ह्यात हजारो शेतकरी आहेत ज्यांनी रक्कम भरुन जुना 'हिशेब' चुकता करूनही नवीन कर्ज मिळाले नाही.

 

बातम्या आणखी आहेत...