आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२० हजार शिक्षकांची भरती सुरू; पवित्र ऑनलाइन प्रणालीने शिक्षण संस्थांच्या गोरखधंद्याला चाप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- शिक्षकभरतीच्या नावावर शिक्षण संस्थांकडून सुरू असलेल्या गोरखधंद्याला चाप लावणारा ऐतिहासिक निर्णय घेत शिक्षण विभागाने शुक्रवारपासून ‘पवित्र’ या ऑनलाइन प्रणालीद्वारे भरती प्रक्रियेचा पहिला टप्पा सुरू केला. या टप्प्यात शुक्रवारपासून पात्र उमेदवारांना स्वत:ची ऑनलाइन माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध झाली असून वर्षभरात सुमारे २० हजार शिक्षकांची पदे भरली जातील. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी विधान भवन परिसरात ही घोषणा केली.


स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी संस्थांच्या शाळांमधील अनुदानित, अंशत: अनुदानित आणि विनाअनुदानित पदांवरील इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या शिक्षकांच्या भरतीसाठी ‘पवित्र’ प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या प्रक्रियेमुळे काही संस्थांमध्ये भ्रष्टाचाराचे प्रकार पूर्णपणे बंद होतील. गुणवत्तेच्या आधारेच शिक्षकांची भरती होईल. 


अर्ज कोण करू शकतील?
- अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (टीएआयटी) मध्ये शून्यपेक्षा अधिक गुण प्राप्त असलेले विद्यार्थी तसेच शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण विद्यार्थी इयत्ता पहिली ते पाचवी तसेच इयत्ता सहावी ते आठवीमधील प्रवर्गानुसार व समांतर आरक्षणानुसार रिक्त जागांसाठी अर्ज करू शकतील.
- इयत्ता नववी ते बारावीसाठीच्या रिक्त पदांवर टीएआयटीमध्ये शून्यपेक्षा अधिक गुण मिळालेले विद्यार्थी अर्ज करू शकतात.
- उमेदवारांना www.edustaff.maharashtra.gov.in/pavitra या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागेल. नोंदणीसाठी टीएआयटीचा आसन क्रमांक हाच उमेदवाराचा युजर आयडी. युजर मॅन्युअलमध्ये नोंदणीची माहिती.


अतिरिक्त ताण कमी करणार
गैरशिक्षक पदांच्या भरतीसाठी आकृतिबंध अंतिम टप्प्यात असून येत्या काळात या पदांचीही भरती होईल.  शिक्षकांवरील अतिरिक्त कामांचा बोजा कमी होणार असून मोजकीच कामे शिक्षकांकडे राहतील, असे तावडे यांनी सांगितले.


वेळापत्रकानुसार अर्ज  
अर्जासाठी गर्दी होण्याची शक्यता पाहता टीएआयटी आसन क्रमांकानुसार  वेळापत्रक संकेतस्थळावर आहे. अर्जासाठी तीन दिवसांचा कालावधी असून नमूद क्रमांकाच्या उमेदवारांशिवाय तीन दिवस इतरांना अर्ज करता येणार नाहीत. २३ ऑगस्ट अंतिम तारीख असेल. 


शिक्षणाधिकारी हेल्पडेस्क 
अर्जातील माहितीत तफावत असल्यास दुरुस्तीसाठी शिक्षणाधिकाऱ्यांशी संपर्क अपेक्षित आहे. पडताळणी केल्यावर माहिती ग्राह्य धरली जाणार असून अशा उमेदवारांना २३ ऑगस्टनंतर पवित्र प्रणालीत अर्ज करण्याची विशेष सुविधा दिली जाणार आहे.


चार टप्प्यांत भरती प्रक्रिया
1 पहिल्या टप्प्यात शुक्रवारपासून उमेदवारांना पवित्र प्रणालीत माहिती भरावी लागेल. २३ ऑगस्टपर्यंत हा टप्पा चालेल.
2 दुसऱ्या टप्प्यात संस्थांनी पवित्र प्रणाली तसेच स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात प्रसिद्ध करणे अपेक्षित.
3 तिसऱ्या टप्प्यात शिक्षण संस्थांनी दिलेल्या जाहिरातींनुसार उमेदवारांना २० संस्थांचे पसंतीक्रम निवडायचे आहेत.
4 चौथ्या टप्प्यात संबंधित शिक्षण संस्थांना उमेदवारांच्या गुणवत्तेनुसार निवड याद्या विभागास उपलब्ध करून द्यायच्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...