आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नागपूर - रायपूर येथून एका कारमध्ये पाठवण्यात आलेली सव्वातीन कोटींची रक्कम पोलिसांनी जप्त केली. ही रक्कम हवालाची असल्याचा संशय आहे. नागपुरातील नंदनवन पोलिसांना एक डस्टर कारमधून हवालाची कोट्यवधींची रोकड छत्तीसगडमधून नागपुरात येत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी नागपूर- रायपूर महामार्गावर प्रजापती चौकात सापळा लावून कार थांबवली.
या कारमध्ये राजेश वामनराव मेंढे (४०, रा. मिनीमातानगर, नागपूर) आणि नवनीत गुलाबचंद जैन (२९, रा. शांतीनगर, नागपूर) हे दोघे होते. दोघांची चौकशी केल्यावर त्यांनी आम्ही कारचे चालक आहोत आणि ही कार वर्धमाननगरातील प्रशांत केसानी नावाच्या व्यापाऱ्याकडे घेऊन जात असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी केसानीला फोन केला असता त्याने पोलिसांना टाळण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे पोलिसांचा संशय पक्का झाला. पोलिसांनी कारची कसून तपासणी केली असता डिक्की आणि चारही सीटच्या पायदानाजवळ विशिष्ट कप्पे (लॉकर) तयार करण्यात आल्याचे पोलिसांना लक्षात आले.
त्यांना लॉकही होते. सकाळी लॉकरची चावी उपलब्ध झाल्यावर पोलिसांनी लॉकर उघडले असता आतमध्ये २०००, ५००, २०० आणि १०० च्या नोटांची बंडले आढळून आली. पोलिसांनी पंचासमक्ष ही रोकड बाहेर काढण्यात आली. त्यासाठी नोटा मोजण्याच्या मशीन्सही मागवण्यात आल्या. एकूण ३ कोटी २२ लाखांची रक्कम निघाली, अशी माहिती पोलिसांनी दिली. ही रक्कम रायपूरमधील मॅपल ज्वेलरी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक खजान ठक्कर यांनी रायपुरातून पाठवल्याची माहिती आहे. प्रशांत केसानी ती रक्कम घेणार होता. मात्र, तो काय करतो हे स्पष्ट झालेले नाही. रक्कम हवालाचीच असावी, असा संशय व्यक्त होत आहे. आयकर विभाग व ईडीला या कारवाईची माहिती देण्यात आली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.