आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती: शाळकरी मुलीला भररस्त्यात गिफ्ट देणारे 3 युवक गजाआड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - शहरातील गर्ल्स हायस्कूलच्या नववीच्या विद्यार्थिनीवर तेल फेकल्याची घटना ताजी असतानाच याच शाळेच्या नववीतील विद्यार्थिनीला तीन तरुणांनी भररस्त्यात भेटवस्तू देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान या विद्यार्थिनीने त्यास नकार दिल्याने मालटेकडी परिसरात तिच्या मैत्रिणीला भेटवस्तू देत असताना पोलिसांनी सतर्कतेने मोहन आनंद माने (१९), पवन विष्णू बगल्ले (१९) आणि नागेश दिपक पंडीत (१९) या तीनही तरुणांना अटक करण्यात आली. विशेष म्हणजे तेल फेकल्याची घटना ज्या परिसरात घडली त्याच परिसरात मुलीला भेटवस्तू देण्याचा प्रयत्न केला गेला. दरम्यान, शहरात प्रेमप्रकरणातून प्रतीक्षा मेहत्रे हिचा खून, विद्यार्थिनीच्या अंगावर तेल फेकल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर शाळकरी मुली सुरक्षित नसल्याचीही चर्चा जोर धरू लागली आहे.


शहरातील गर्ल्स हायस्कूलमध्ये नवव्या वर्गात शिकणाऱ्या एका मुलीला एक मुलगा व त्याचे दोन मित्र गिफ्ट देण्यासाठी आले. त्या मुलीने गिफ्ट स्वीकारले नाही म्हणून त्या युवकाने गिफ्ट मुलीच्या मैत्रीणींकडे देण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार शिक्षकांना माहित झाला. त्यामुळे शाळेतील शिक्षक व दामिनी पथकाच्या पोलिसांनी या तिन्ही युवकाला ठाण्यात आणले. या प्रकरणात फ्रेजरपुरा पोलिसांनी तिघांविरुद्ध प्रतिबंधत्माक कारवाई करून त्यांना अटक केली आहे. हा प्रकार शनिवारी (दि. ३०) दुपारी मालटेकडी परिसरात घडला.

 

गर्ल्स हायस्कूलमध्ये शिकणारी नवव्या वर्गातील विद्यार्थिनी व तीनही तरुण एकाच गावातील आहे. दरम्यान मोहनला त्या मुलीला गिफ्ट द्यावयाचे होते. शनिवार असल्यामुळे सकाळची शाळा होती. त्यामुळे मोहन व त्याचे मित्र पवन आणि नागेश हे तिघे शाळा सुटण्यापूर्वीच शाळेच्या बाहेर उभे होते. शाळा सुटल्यानंतर ती मुलगी बाहेर आली. तिने गिफ्ट घेण्यास नकार देऊन ती निघून गेली. त्यानंतर त्या मुलीच्या दोन मैत्रिणी पायी मालटेकडी मार्गे बसस्थानकावर जात असताना या तिघांनी त्यांना गाठून हे गिफ्ट संबंधित मुलीपर्यंत पोहोचून देण्याबाबत म्हटले. तीन मुले व दोन मुली या पाच जणांची या गिफ्टची देवाणघेवाण सुरू असतानाच हा प्रकार शाळेतील शिक्षकांना कळाला. त्यामुळे शाळेच्या शिक्षक व शिक्षिका मालटेकडीजवळ पोहोचल्या. त्यावेळी गिफ्ट खाली ठेवले होते. तसेच मालटेकडी भागात गस्तीवर असलेल्या दामिनी पथकातील पोलिससुद्धा त्याठिकाणी पोहोचल्या. त्यांना हा प्रकार लक्षात येताच त्या शिक्षक शिक्षिकांसह त्या दोन मुली, तीन मुले तसेच गिफ्ट घेवून पोलिस फ्रेजरपुरा ठाण्यात पोहोचले. ज्या मुलीला गिफ्ट द्यायचे होते, ती पूर्वीच निघून गेली होती.

 

दरम्यान, या प्रकरणात शाळेच्या शिक्षकांकडून तसेच ज्या मुलींकडे गिफ्ट दिले त्या मुलींनी तक्रार देण्यास असमर्थता दर्शवली. तसेच फ्रेजरपुरा पोलिसांनी ही बाब ज्या मुलीसाठी हे गिफ्ट आले होते, त्या मुलीच्या आई वडिलांनाही सांगितली होती. मात्र शनिवारी या प्रकरणात तक्रार दिली नव्हती. मुलीसाठी आणलेल्या गिफ्टमध्ये महागडे हॅन्डवॉच तसेच महागडे चॉकलेट होते. ते पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

 

हा प्रकार शाळेबाहेर घडला : दरम्यान, याबाबत गर्ल्स हायस्कूलचे मुख्याध्यापक किशोर इंगळे म्हणाले, हा प्रकार शाळेच्या बाहेर घडला. या प्रकरणात आम्ह मुलीच्या पालकांसोबत चर्चा केली. त्यांनीही पोलिसात तक्रार देण्यास नकार दिला.

 

...गावात वाद होईल
या प्रकरणानंतर फ्रेजरपुरा ठाण्यात एका राजकीय पक्षाचे दोन पदाधिकारी आले. ते फ्रेजरपुराचे ठाणेदार अासाराम चोरमले यांना म्हणाले, मुले आणि मुली एकाच गावातील आहे. प्रकरण वाढल्यास गावात वाद तयार होतील, त्या राजकीय पदाधिकाऱ्यांकडून पोलिसांना दिलेली ही माहिती होती की अप्रत्यक्ष इशारा होता, असा प्रश्न उपस्थित सर्वांनाच पडला होता.

 

प्रतिबंधात्मक कारवाई
गिफ्ट देण्यासाठी आलेल्या युवकाकडून मुलीने गिफ्ट स्वीकारले नाही. त्यामुळे संतप्त होऊन मुलांकडून कोणत्याही प्रकारचे कृत्य केले जावू शकतात. यापूर्वी अशा अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळेच आम्ही तिन्ही मुलांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. या प्रकरणात अद्याप तक्रार देण्यासाठी कोणीही आले नाही.
- आसाराम चाेरमले, ठाणेदार फ्रेजरपुरा.

 

बातम्या आणखी आहेत...