आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मृत नक्षलवाद्यांचा अाकडा 39 वर, अाता आंतरराज्य मोहिमांवर भर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - एका राज्यात दबाव वाढल्यावर नक्षलवादी शेजारच्या राज्यात आश्रयाला जातात, हा आजवरचा अनुभव लक्षात घेऊन येत्या काळात महाराष्ट्रासह छत्तीसगड आणि तेलंगणा या राज्यांमध्ये योजनाबद्ध रीतीने संयुक्त मोहिमा आखण्यावर नक्षलविरोधी पथकांकडून  भर दिला जाणार आहे.   


केंद्रीय गृहमंत्रालयाने सातत्याने संयुक्त मोहिमांवर भर दिला आहे. तथापि, आजवर अशा संयुक्त मोहिमा अभावानेच आखल्या गेल्या आहेत. मात्र, महाराष्ट्र पोलिसांना मागील चार दिवसांत मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर पुन्हा एकदा आंतरराज्य संयुक्त मोहिमांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. दुसऱ्या राज्यात पळून गेलेल्या नक्षलवाद्यांना तेथेही उसंत मिळू नये, यासाठी त्या त्या राज्यांनी शेजारील राज्यांशी समन्वय राखून योजनाबद्ध संयुक्त मोहिमा आखाव्या, यासाठी आता केंद्रीय गृह मंत्रालयाने पुढाकार घेतला आहे.

 

मात्र, त्यामध्ये तेलंगणा राज्याचा राजकीय अडसर येऊ शकतो, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पावसाळ्यापूर्वीच या मोहिमा शक्य होणार असल्याने त्याबाबत तातडीने पावले उचलावी लागतील, अशी माहिती नक्षलविरोधी अभियानातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.  


अभियान सुरूच  
गडचिरोलीतील नक्षलप्रभावित क्षेत्रांमध्ये सी-६० पथके आणि केंद्रीय राखीव दलांची मोहीम सुरूच आहे. धानोरा, सिरोंचा आणि भामरागडमधील जंगल क्षेत्रांतील गावांमध्ये जाऊन पोलिसांकडून नक्षलवाद्यांबाबत चौकशी सुरू आहे. नक्षलवादी बनलेल्या युवकांच्या नातेवाइकांशी संपर्क साधून त्यांचे आत्मसमर्पण घडवून आणण्याचे प्रयत्नदेखील सुरू असल्याचे सांगण्यात आले. 

 

आणखी दाेन मृतदेह सापडले, संख्या ३९ वर
कसनासूर-बोरिया जंगल क्षेत्रातील इंद्रावती नदीच्या पात्रात गुरुवारी आणखी दाेन नक्षलवाद्याच्या मृतदेहांचे शोध लावण्यात सुरक्षा दलांना यश आल्याने ठार झालेल्या नक्षलवाद्यांचा आकडा आता ३९ वर पोहोचला आहे. चकमकस्थळाजवळ इंद्रावती नदीच्या पात्रातून काही नक्षलवाद्यांचे मृतदेह वाहून गेल्याची शक्यता पोलिसांना वाटत आहे. त्यामुळे गुरुवारीही पोलिसांनी मृतदेहांची शोधमोहीम युद्धपातळीवर सुरूच ठेवली हाेती. 

बातम्या आणखी आहेत...