आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दूध भुकटी निर्यातीसाठी ५०, दुधाला ५ रुपये लिटर अनुदान; पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांची घोषणा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- राज्यातील दूध दराच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने दूध भुकटीच्या निर्यातीसाठी ५० रुपये प्रतिकिलो, तर दुधाच्या निर्यातीसाठी प्रतिलिटर ५ रुपये अनुदान दोन महिन्यांसाठी देण्याची घोषणा मंगळवारी विधानसभेत केली. शासनाच्या विविध विभागांच्या पोषण आहारातही दुधाचा आणि दूध भुकटीचा समावेश करण्यात आला आहे. 


पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी मंगळवारी याबाबत घोषणा करताना तूप व लोण्यावरचा जीएसटी कमी करण्यासाठी केंद्र सरकारला विनंती करणार असल्याचेही सांगितले. दुधाचे दर कोसळल्याने राज्यात दूध दराचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने येत्या १६ जुलैपासून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. विधिमंडळ अधिवेशनातही दूध उत्पादकांवरील समस्यांवर चर्चा झाली. या संपूर्ण पार्श्वभूमीवर मंगळवारी विधानसभा अध्यक्षांच्या दालनात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले होते. या बैठकीत दुधाचे दर आणि भुकटीबाबत तोडगा काढण्यात आला. त्यानुसार दूध भुकटीच्या निर्यातीसाठी ५० रुपये प्रतिकिलो तर दुधाच्या निर्यातीसाठी प्रतिलिटर ५ रुपये अनुदान दिले जाणार आहे. 


पोषण आहार योजनेत दुग्धजन्य पदार्थ 
सर्वात महत्त्वाचे म्हणजे सामाजिक न्याय, आदिवासी विकास विभाग आणि अन्य काही विभागांकडून राबवल्या जाणाऱ्या पोषण आहार योजनेत दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करण्यात आला आहे. तूप आणि लोण्यावरील जीएसटी कमी करण्यासाठी केंद्राला शिफारस करण्याचा निर्णयही या वेळी झाला. 

बातम्या आणखी आहेत...