आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदर्भाची मागणी गुन्हा असेल तर संयुक्त महाराष्ट्रवादी पहिले गुन्हेगार -अॅड. श्रीहरी अणे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- शिवसेनेच्या आरोपाप्रमाणे विदर्भाची मागणी करणे हा गुन्हा असेल तर संयुक्त महाराष्ट्रवादीच या देशातले पहिले गुन्हेगार ठरतात. त्यांनी संयुक्त महाराष्ट्र निर्माण करताना विदर्भाचे राज्य तोडण्याचा गुन्हा केला आहे, असा टोला राज्याचे माजी महाधिवक्ता व ज्येष्ठ विदर्भवादी नेते अॅड. श्रीहरी अणे यांनी शिवसेनेला लगावला. 


विदर्भाची मागणी करणे राजद्रोह असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. त्यावर विदर्भवाद्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. विदर्भ राज्य आघाडीचे प्रमुख अणे म्हणाले की, राजद्रोह नावाचा कोणताही गुन्हा कायद्यात नाही. त्यामुळे कोणतीही कायदेशीर कारवाई त्याबाबत करता येत नाही. किंबहुना, घटनेत दिलेल्या कलम ३ व ४ ने राज्य मागण्याचा प्रत्येक नागरिकास असलेला अधिकार अंकित केला आहे. तेव्हा आधी घटनादुरुस्ती करून मग राजद्रोहाचा कायदा केल्याशिवाय विदर्भाचे राज्य मागणाऱ्यांना गुन्हेगार म्हणता येणार नाही, किंवा त्यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई करता येणार नाही, असे अणे म्हणाले. 


विदर्भाची मागणी करणे हा गुन्हा असेल तर संयुक्त महाराष्ट्रवादी देशातले पहिले गुन्हेगार ठरतील. कारण त्यांनी १९५६ व १९६० ला महाराष्ट्र निर्माण करताना विदर्भाचे राज्य तोडले. बेळगावला महाराष्ट्रात सहभागी करून घेण्याची शिवसेनेची मागणी आहे. ही मागणी राजद्रोह ठरत नाही का? हा दुटप्पीपणा आहे. विदर्भाचे वेगळे राज्य मागणाऱ्या भाजपसोबत सत्ता भोगणाऱ्या शिवसेनेत हिंमत असल्यास आधी भाजपवर राजद्रोहाचा आरोप करावा, असेही अणे म्हणाले. विदर्भाची मागणी करणे राजद्रोह असल्याचा आरोप शिवसेनेने केला तो हास्यास्पद आहे कारण भारतात राहणाऱ्या व्यक्तिला स्वतंत्र विदर्भच काय कोणताही प्रदेश त्यांच्या बहुमताच्या इच्छेनुसार स्वतंत्र राज्याची मागणी करता येते. त्यामुळे शिवसेनेने असे आरोप करणे टाळावे. 

बातम्या आणखी आहेत...