आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लिलावानंतर अल्प दराने हरभरा खरेदीचा प्रयत्न; व्यापाऱ्याचा परवाना रद्दची मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दर्यापूर - लिलाव झाल्यानंतर मोजणीच्या वेळेस ठरलेल्या दरापेक्षा हरभरा तब्बल चारशे रुपये कमी दराने खरेदी करून शेतकऱ्याला लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या मनोहर राठी या खरेदीदाराचा परवाना रद्द करण्यात यावा, अशी तक्रार बाजार समितीचे संचालक गोपाल अरबट यांनी सहायक निबंधक व बाजार समितीच्या सचिवांकडे केली आहे.

 

येथील कृषी उत्पन बाजार समिती मध्ये शेतकऱ्यांचा मालाचा लिलाव ढेरी पद्धतीने होतो. लिलाव झाल्यानंतर काही व्यापारी व अडते संगनमत करून चारशे ते पाचशे रुपये कमी भावाने शेतकऱ्यांचा माल खरेदी करून त्यांची फसवणूक करीत असल्याचे अनेक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान असाच शेतकऱ्याच्या लुटीचा प्रकार येथील बाजार समितीत शनिवारी उघडकीस आला. खल्लार येथील शेतकरी नसिब शाह महेताब शाह या शेतकऱ्याने शनिवारी (दि.२३) बारा पोते हरभरा बाजार समितीत विक्रीस आणला होता. अडते मिलिंद राठी यांच्यामार्फत नसीब शाहच्या हरभऱ्याचा लिलाव ३२०० रुपये प्रति क्विंटल दराने झाला. सदर हरभरा मनोहर राठी यांनी खरेदी केला. परंतु मापाईच्या वेळेस मात्र मनोहर राठी यांनी नसीब शाह यांना हरभरा २८०० रुपये प्रति क्विंटल दराने मागितला.


दरम्यान नसीब शाह यांनी यासाठी नकार दिला. लिलाव झाल्यानंतर त्याच दराने खरेदी करणे खरेदीदाराला बंधनकारक असताना त्यानंतर कमी दराने शेतमाल मागणे हे नियमबाह्य आहे. त्यामुळे नसीब शाह यांनी न्याय मागण्याकरिता संचालक गोपाल अरबट व सचिव हिंम्मत मातकर यांच्या कडे धाव घेतली.


शेतकऱ्याला योग्य न्याय मिळवुन देण्या करिता संचालक गोपाल अरबट,सचिव मातकर यांनी मध्यस्थीचे प्रयत्न केले असता खरेदीदार मनोहर राठी यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. अडते मिलिंद राठी यांना मला वेळ नाही असे सांगितल्याने काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर शेतकऱ्याचा माल राठी यांनी मोजलाही. परंतु सदर प्रकारावरून अडते मिलिंद राठी व खरेदीदार मनोहर राठी यांची शेतकऱ्यांना लुटन्याची प्रवृत्ती उघडकीस आली. त्यानंतर गोपाल अरबट यांच्या दबावापुढे झुकून मनोहर राठी यांनी लिलाव झालेल्या किंमतीत नसीब शाहचा हरभरा खरेदी केला.

 

काही माल होता खराब
बाजार समीतीत ढेर पद्धत असल्याने हमालांना ढेरीची कटाई करण्यासंबंधी सूचना संचालकांनी करणे गरजेचे आहे.संबंधित शेतकऱ्याचा काही माल खराब होता. त्यामुळे अडचण आली.
- मनोहर राठी, खरेदीदार, व्यापारी दर्यापूर.

 

'तो' अधिकार सचिवाला
परवानाधारक खरेदीदाराला नियम व अटी लागू असतात. त्याचे उल्लंघन केल्यास रितसर चौकशी होईल.गैरप्रकार आढळल्यास परवाना निलंबन करण्याचे अधिकार बाजार समिती सचिवाला आहेत.
- राजेंद्र सुने, सहाय्यक निबंधक, दर्यापूर.

 

बातम्या आणखी आहेत...