आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरीविराेधी धाेरणामुळे अाता भाजपमध्ये फक्त संघाला मानणारेच राहतील- अजित पवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- ‘सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणामुळे भाजपचेच आमदार, खासदार नाराज आहेत. नाना पटोले यांनी राजीनामा दिला तर आशिष देशमुख यांनीही नाराजीचे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे. 

 

असेच सुरू राहिले तर आगामी दीड वर्षात भाजपमध्ये फक्त जनसंघाचे आणि संघाला मानणारेच उरतील,’ अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी बुधवारी विधानसभेत केली. तसेच कापूस आणि धान उत्पादकांना २५ आणि १० हजार रुपये एकरी मदत द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. विधानसभेमध्ये नियम २९३ अन्वये सत्ताधाऱ्यांतर्फे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा उपस्थित केली होती. चर्चेत भाग घेताना अजित पवार यांनी म्हटले, ‘सरकार घोषणा खूप करते परंतु काम काही करत नाही. कर्जमाफीही दिशाभूल करणारी निघाली.  सरकारची कर्जमाफी देण्याची मानसिकता नव्हती. योग्य वेळ आली की कर्जमाफी देऊ असे म्हणत होते. शेतकरी संपल्यावर कर्जमाफी देणार की काय असे वाटत होते. आम्ही संघर्षयात्रा काढली.  पुणतांब्याच्या शेतकऱ्यांनी संप पुकारला. त्या वेळी सरकारच्या पायाखालची जमीन सरकली आणि इच्छा नसताना कर्जमाफीची घोषणा सरकारला करावी लागली. मात्र ही कर्जमाफी फसवी निघाली. केंद्र सरकारनेही तीन हजार कोटी जाहिरातींवर खर्च केले, पण कर्जमाफीसाठी मदत केली नाही.  कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर आजही अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. सरकार चालवायला धमक लागते, योग्य निर्णय घेण्याची क्षमता लागते,’ असा टोलाही अजित पवार यांनी लगावला.  


ऊर्जा खाते दयनीय, सर्वाधिक अात्महत्या विदर्भात
सरकारने अनेक शेतकऱ्यांच्या शेतीतील वीज कापल्याचे सांगत अजित पवार म्हणाले,  ऊर्जा खात्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत दयनीय आहे. जर सरकारने योग्य निर्णय घेतले नाही तर हे खाते मोठ्या अडचणीत येईल.  आज राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यात सर्वात जास्त आत्महत्या विदर्भामध्ये झाल्या आहेत. जर असेच चित्र राहिले तर शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये विदर्भ देशात एक नंबरला येईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.  

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती...

बातम्या आणखी आहेत...