आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरची लोकसभेची जागा अजिबात सोडणार नाही, अजित पवार यांचे प्रतिपादन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीगोंदे - दक्षिण नगर जिल्ह्याची लोकसभा मतदारसंघातील जागा राष्ट्रवादीची आहे. कोणत्याही परिस्थितीत या जागेवरचा हक्क राष्ट्रवादी सोडणार नसल्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी जाहीर केले. त्याचबरोबर पुढील विधानसभा निवडणुकीत श्रीगोंद्यातून विद्यमान आमदार राहुल जगताप यांची उमेदवारी जाहीर करून त्यांनी निवडणुकीचा बिगुल फुंकला.

 

संत शेख महंमद महाराज मंदिराच्या प्रांगणात आयोजित राष्ट्रवादीच्या तिसऱ्या टप्प्यातील सरकारच्या विरोधातील हल्लाबोल आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. पवार म्हणाले, "लोकसभेची नगरची जागा राष्ट्रवादी सोडणार असल्याची अफवा उठत आहे. त्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. ही जागा राष्ट्रवादी कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही. गेल्या वेळच्या म्हणजे, सन २०१४ च्या निवडणुकीत मी स्पष्ट सांगितले होते, की एकवेळ बारामतीची जागा गेली तरी चालेल, पण श्रीगोंद्याची जागा राष्ट्रवादीलाच मिळेल, याची व्यूह रचना केली होती. राहुल जगताप यांना आमदार करायचेेच, हे राष्ट्रवादीचे व्हिजन होते. २०१९ च्या निवडणुकीतही जगताप हेच पुन्हा आमदार असतील''.

 

आम्ही ज्यांना पालकमंत्री व प्रदेशाध्यक्ष केले, त्यांची दुसरीकडे गेल्यावर काय अवस्था झाली, असे म्हणत पवार यांनी बबनराव पाचपुते यांना त्यांचे नाव न घेता चिमटा काढला. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले, "या आंदोलनाचा पाचवा टप्पा पूर्ण होईल, त्यावेळी राज्यात भाजपचे आणि शिवसेनेचे सरकार राहणार नाही. या सरकारने दिलेले एकही आश्वासन पाळले नाही. १२५ कोटी जनतेला मोदींनी स्वप्न दाखवले. काळे धन आणणार असे सांगितले. महागाई कमी करू, असे सांगितले. १२५ कोटी जनतेला त्यांनी फसवले. धनगर, मराठा, मुस्लिमांना आरक्षण देण्याचे आश्वासन पूर्ण केले नाही."

 

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, "अजितदादा उपमुख्यमंत्री असताना कधी या भागाला पाण्याची अडचण आली नाही. आताही भीमा नदीत पेडगाव हद्दीत बंधाऱ्याची उंची वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कोपर्डीची घटना देशाला लाजवेल अशी होती. आमच्या आंदोलनाच्या इशाऱ्यामुळेच पीडितच्या नातेवाईकांना न्याय मिळाला. हे मुख्यमंत्री गेली साडेतीन वर्षे फक्त अभ्यासच करत आहेत. एकाच वर्गात बसणाऱ्या मुख्यमंत्र्यांना अजितदादांच्या ट्युशनची गरज आहे. या सरकारने गरीब माणसांचा विश्वासघात केला. वकील, डॉक्टर आणि शेतकऱ्यांची आंदोलने पहिल्यांदा झाली. महिलांच्या सुरक्षेतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. आम्ही २०१९ मध्ये मोठा बदल घडणार आहे. पक्षाचे जेवढे उमेदवार निवडणूक लढतील, त्यांना निवडून आणणार."

 

प्रास्ताविक आमदार राहुल जगताप यांनी केले. त्यांच्या हल्लाबोलचा रोख बबनराव पाचपुते यांच्याकडेच होता. ते म्हणाले, पाचपुतेंच्या काळात विकास रखडला. त्यांनी तालुक्यावर तीस वर्षे अन्याय केला. मंत्रिपद, प्रदेशाध्यक्षपद असताना राष्ट्रवादीने संधी दिली तेव्हा केवळ प्रवचने केली. त्यामुळे जनतेने त्यांना २०१४ च्या निवडणुकीत प्रवचने करण्यासाठी घरी बसवले.

 

यावेळी आमदार संग्राम जगताप, वैभव पिचड, तसेच तुकाराम दरेकर यांचीही भाषणे झाली. जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले, सुजित झावरे, मंजूषा गुंड, दादा कळमकर, भगवानराव पाचपुते, अविनाश आदिक, अंकुश काकडे, प्रमोद हिंदुराव, प्रताप ढाकणे, घनश्याम दरवडे, हरिदास शिर्के, ऋषिकेश गायकवाड, सचिन जगताप, शिवाजीराव गर्जे, शारदा लगड, संग्राम कोते आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...