आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती विभागाचा निकाल ८६.४९ टक्के; राज्याच्या तुलनेत सातव्या स्थानावर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- विदर्भातून अमरावती विभागीय बोर्ड दहावीच्या परीक्षेत प्रथम आले आहे. नागपूर विभागीय बोर्डाला दहावीच्या निकालात मागे टाकले असले तरी संपूर्ण राज्याच्या तुलनेत अमरावती बोर्ड सातव्या स्थानावर आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) परीक्षेच्या निकाल ८ जून रोजी घोषित करण्यात आला. अमरावती बोर्डाचा एकूण निकाल ८६.४९ टक्के लागला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत २.१५ टक्क्यांनी निकालात वाढ झाल्याची माहिती बोर्डाचे सचिव संजय यादगिरे यांनी दिली. 


दहावीची परीक्षा १ मार्च ते २४ मार्च दरम्यान घेण्यात आली. अमरावती बोर्ड अंतर्गत १ लाख ७१ हजार ८११ नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी १ लाख ७० हजार ८९९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यात १ लाख ४७ हजार ८०९ विद्यार्थी उत्तीर्ण असून त्याची टक्केवारी ८६.४९ ऐवढी आहे. विभागात ३४ हजार ७४१ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत (७५ टक्के पेक्षा अधिक), ५५ हजार १९२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत (६० ते ७४ टक्के दरम्यान), ४७ हजार ४२१ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत (४५ ते ५९ टक्के दरम्यान) उत्तीर्ण झाले. १० हजार ४५५ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत आहेत. वाशीम जिल्हा ८९.५० टक्के निकालासह विभागात पहिला आला आहे. बुलडाणा जिल्हा ८९.१६ टक्के निकालासह द्वितीय, अकोला जिल्हा ८५.६४ टक्क्यासह तृतीय, अमरावती ८५.४६ टक्क्यासह चतुर्थ तर यवतमाळ जिल्हा ८३.९९ टक्के निकालासह पाचव्या स्थानी राहिला. अमरावती विभागात ७८ हजार ९८७ मुलींनी नोंदणी केली ७८ हजार ६४३ मुलींनी परीक्षा दिली, त्यापैकी ७० हजार ५६८ मुली उत्तीर्ण झाल्या असून त्यांची टक्केवारी ८९.७३ आहे. मुलांच्या तुलनेत मुलींचा निकाल ६ टक्क्याने अधिक लागला. 


सर्व विषयांच्या परीक्षेदरम्यान बारकोड पद्धतीचा वापर करण्यात आला. विद्यार्थ्यांसाठी प्रथमच प्रवेशपत्रावर इंग्रजीसह मराठीतून सूचना देण्यात आल्या. इंग्रजी, गणित तसेच सामान्य गणित विषयांकरिता बहुसंची प्रश्नपत्रिकांचे ए, बी,सी, डी आदी चार संच वापरण्यात आले होते. व्यक्तिमत्व विकास, आरोग्य व शारीरिक शिक्षण या अनिवार्य विषयांची परीक्षा शालेय स्तरावर घेण्यात आली. 


वाशीम अव्वल 
अमरावती विभागीय बोर्डातून वाशिम जिल्हा अव्वल ठरला. वाशिम जिल्ह्यात १८ हजार २६९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून टक्केवारी ८९.५० आहे. दुसऱ्या क्रमांकावर बुलडाणा जिल्हा असून ३५ हजार ४२१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले, टक्केवारी ८९.१६ आहे. तिसऱ्या क्रमांकावर अकोला जिल्हा असून २० हजार ५२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले, टक्केवारी ८५.६४ आहे. चौथ्या क्रमांकावर अमरावती जिल्हा राहिला असून ३६ हजार ५९७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले टक्केवारी ८५.४६ आहे. पाचव्या क्रमांकावर यवतमाळ असून ३३ हजार ४७० विद्यार्थी उत्तीर्ण झाले, टक्केवारी ८३.९९ आहे. 


अमरावती विभागात २५५४ शाळांमधील विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. यामध्ये २९७ शाळांचा शंभर टक्के निकाल लागला. २ शाळांचा शुन्य टक्के निकाल लागला. ९१ ते ९९.९९ टक्के निकाल लागलेल्या शाळांची संख्या ८९५ आहे. ७१९ शाळांचा ९० टक्के, ३३२ शाळांचा ८० टक्के, १५७ शाळांचा ७० टक्के, ८२ शाळांचा ६० टक्के तर ३६ शाळांचा ५० टक्के निकाल लागला. 

 

पुढील स्लाइडवर पाहा विभागनिहाय निकाल....

बातम्या आणखी आहेत...