आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती: पार्किंगच्या जागेत फ्लॅट; बिल्डर, दलालांवर गुन्हा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - बेनाेडा परिसरातील 'एसएमआर' इमारतीच्या पार्किंगच्या जागेत फ्लॅट बांधून त्याची विक्री केल्याप्रकरणी ग्राहक महिलेच्या तक्रारीवरून बिल्डर राजेश अमरलाल तलरेजा, नारायण तलरेजा, दलाल किशोर वामन खोड आणि विजय श्रीराम गुल्हाणे तसेच एका महिलेसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेवरून पार्किंगच्या जागेवर फ्लॅट बांधून त्याची विक्री करण्याचा मुद्दा शहरात ऐरणीवर आला आहे.

 

सर्वसामान्य व्यक्तींसाठी एक घर विकत घेणे हे आयुष्यभराची कमाई आणि स्वप्न राहते. अनेकांना एक घर विकत घेतल्यानंतर पंधरा ते पंचवीस वर्षे त्या घरासाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते भरावे लागतात. यातही या व्यवहारात त्या व्यक्तीची फसवणूक झाली तर त्याची परिस्थिती अतिशय दयनीय होते. दरम्यान, शहरातील फ्रेजरपुरा ठाण्याच्या हद्दीतील एका फ्लॅटधारक महिलेची अशीच अवस्था झाली आहे. तक्रारदार महिलेने तलरेजाच्या फ्लॅट सिस्टिममध्ये एक फ्लॅट ३१ जुलै २०१७ ला १९ लाख ५० हजार रुपयात खरेदी केला आहे. या फ्लॅटसाठी तक्रारदार महिलेने बँकेकडून कर्ज घेतले आहे. या इमारतीमध्ये बारा फ्लॅट असल्याचे पूर्वी सांगण्यात आले मात्र प्रत्यक्षात इमारतीचे बांधकाम झाले त्यावेळी तेरा फ्लॅट बांधले.


यामध्ये पार्किगसाठी असलेल्या जागेत एक फ्लॅट बांधला व तोच विकल्याचे महिलेने तक्रारीत नमूद केले आहे. फ्लॅट विकत घेण्यापूर्वी तलरेजा तसेच त्याचे दोन एजंट किशाेर खोंड व विजय गुल्हाणे यांनी फ्लॅटची किंमत १९ लाख ५० हजार रुपये सांगितले. त्यानुसार बँकेचे कर्जसुद्धा घेतले. दरम्यान त्यानंतरही तलरेजाकडून मला ४ लाख रुपये अतिरीक्त रकमेची मागणी होत आहे. अन्यथा खरेदी रद्द करण्याची विवीध व्यक्तींना घरी पाठवून धमकी देत असल्याचा असल्याचा आरोप महिलेने केला आहे. हा फ्लॅट सध्या तक्रारदार महिलेच्या ताब्यात नाही. इतकेच नाही तर संबधित फ्लॅट सध्या महिलेची परवानगी न घेताच दुसऱ्याच व्यक्तीला भाड्याने दिलेला आहे. २९ जून २०१८ ला दोन व्यक्तींनी घरी येऊन या प्रकरणात 'सेटलमेन्ट करा, अन्यथा वाईट होईल', अशी धमकी दिली. वारंवार मिळणाऱ्या धमक्यांमुळे आम्हाला धोका असल्याचेही महिलेने तक्रारीत नमूद केले आहे. महिलेने दिलेल्या या तक्रारीवरून पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा नाेंदवला आहे.

 

गुन्हा दाखल; सखोल तपास करणार
महिलेच्या तक्रारीवरून आम्ही बिल्डरसह पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. पार्किंगच्या जागेत फ्लॅट बांधून बिल्डरने मला विकला तसेच धमकी देत असल्याचे महिलेने तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणात आम्ही सखोल तपास करत आहोत. आसाराम चोरमले, ठाणेदार फ्रेजरपुरा.

 

बातम्या आणखी आहेत...