आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमटेंच्या लोकबिरादरी चे प्राणी अनाथालय होणार रेस्क्यू सेंटर; 8 कोटींचा प्रकल्प

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर -   ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांच्या गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसाच्या लोकबिरादरी प्रकल्पाचे वन्यप्राणी अनाथालय आता रेस्क्यू सेंटर होणार आहे. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या सूचनेवरून या रेस्क्यू सेंटरचा आराखडा तयार झाला असून त्यासाठी ८ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.    


 बाबा आमटेंच्या प्रेरणेने डॉ. प्रकाश आमटे यांनी हेमलकशात आदिवासी कल्याणासाठी लोकबिरादरी प्रकल्प सुरू केला.  या प्रकल्पात आदिवासींनी आणून दिलेल्या वन्यप्राण्यांचे संवर्धन केले जाते. अनेक वर्षांपासून हजारांवर वन्यप्राण्यांचे लोकबिरादरी आश्रयस्थान बनले. मात्र, भारतीय वन कायद्यांत वन्यप्राण्यांसाठी अनाथालय किंवा आश्रयस्थान सुरू करून त्यांचे खासगी स्वरूपात संवर्धन करण्याची तरतूद नाही. त्यामुळे वन विभागाने  या वन्यप्राणी अनाथालयावर सातत्याने आक्षेप घेतला. त्यावर उपाय म्हणून डॉ. आमटे यांनी केंद्रीय वन विभागाकडे बरेच प्रयत्न केले. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने या वन्यप्राणी अनाथालयास वन्य प्राण्यांचे रेस्क्यू सेंटर म्हणून मौखिक मान्यता दिली असली तरी त्याला प्राधिकरणाच्या नियमाप्रमाणे रेस्क्यू सेंटरचे स्वरूप द्यावे लागणार आहे. नागपुरातील गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालय व रेस्क्यू सेंटरचा मास्टर प्लॅन तयार करणारे आर्किटेक्ट अशफाक यांनी या केंद्राचाही आराखडा तयार केला असून तो प्राधिकरणाला सादर केल्याची माहिती डॉ. प्रकाश आमटे यांनी दिली.    


‘लोकबिरादरी प्रकल्पाच्या शेजारी १० एकर जागेत वन्यप्राण्यांसाठी स्वतंत्र व मोठ्या स्वरूपाचे पिंजरे उभारण्यात येणार असून त्यासाठी प्राण्यांच्या संपूर्ण देखभालीच्या दृष्टीने सोयी केल्या जाणार आहेत’, अशी माहिती डॉ. आमटे यांनी दिली. मास्टरप्लाननुसार, या संपूर्ण प्रकल्पासाठी सुमारे ८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. 

 

प्राणी माणसाळले  
सर्वच प्राणी माणसाळले असल्याने ते जंगलात सुरक्षित राहणार नाहीत. त्यामुळे त्यांना सोडता येत नाही. त्यांना येथे आश्रय देऊन देखभाल केली जात आहेे. या वन्य प्राण्यांना कुठल्याही परिस्थितीत हाताळता येणार नाही, अशी अट वन्यप्राणी संग्रहालय प्राधिकरणाकडून घालण्यात आली असून त्याचे पालन होत आहे, असे डॉ. आमटे म्हणाले.   

 

प्रकल्पात वैद्यकीय सोय  
सध्या लोकबिरादरी प्रकल्पातच पिंजऱ्यांत प्राण्यांना ठेवण्यात आले असून तिथे त्यांचे खानपान व वैद्यकीय उपचारांची व्यवस्था आहे. सध्या आमटेंच्या वन्यप्राणी अनाथालयात बिबट्या, चार अस्वली, दुर्मिळ असे चांदी अस्वल, पाच तडस, माकडं, चार साळिंदर, घुबड तसेच हरणांचा मोठा कळप आहे. हरणांमध्ये अनेक दुर्मिळ हरणांचा समावेश आहे. याशिवाय नाग, घोणस या सापांच्या विषारी प्रजातींसह धामण, मांडूळ, मांजऱ्या, धोंड्या या बिनविषारी प्रजातींचेही संरक्षण केले जाते.    

बातम्या आणखी आहेत...