आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकजागर राजकीय पक्षाची घोषणा; विधानसभा निवडणुकीत लढवणार २८८ जागा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- राज्यातील प्रख्यात साहित्यिक, लोकजागर अभियानचे अध्यक्ष प्रा.ज्ञानेश वाकुडकर यांनी अमरावतीत एका पत्रकार परिषदेत आज (५ मे) 'लोकजागर' या नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली. शेतकऱ्यांच्या शंभर युवा मुलांसह विधानसभा निवडणुकीत राज्यातील २८८ जागा लोकजागर लढवणार आहे. 'गाव तेथे उद्योग' या मॉडेलची पुढील तीन महिन्यांत निर्मिती करणार असल्याचा निर्धार त्यांनी या वेळी बोलून दाखवला. 


'दिल्लीचाही सातबारा हवा मला अन् तुला रे बळीराजाच्या मुला' तसेच 'शंभर युवा महाराष्ट्र नवा' असे ब्रीदवाक्य घेऊन लोकजागर अभियान राबवले जात आहे. राज्याच्या अनेक भागात दहा हजार विद्यार्थी तसेच युवकांमधून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या मुलांनीच सत्ता ताब्यात घ्यावी म्हणून या राजकीय पक्षाची निर्मिती केली जात आहे. लोकजागर सामाजिक संस्था म्हणूनच राहणार असली तरी आगामी दोन महिन्यात लोकजागर हा राजकीय पक्ष म्हणून जाहीर करणार असल्याचे प्रा. वाकुडकर म्हणाले. जानेवारीत यात निवडणूक आयोगाकडे पक्षाची नोंदणी केली आहे. २०१९ च्या निवडणुकीत 'शंभर युवा महाराष्ट्र नवा' हे ब्रीद घेऊन लोकजागर पक्ष मैदानात उतरणार आहे. विधानसभेच्या २८८ जागी उमेदवार उभे करून जनतेसमोर नवीन पर्याय देणार आहे. कोल्ह्यांच्या हातून लांडग्यांच्या हाती अन् लांडग्यांच्या हातून पुन्हा कोल्ह्यांच्या हाती सत्ता देणे कोठेतरी थांबले पाहिजे. विद्यार्थी, बुद्धिजीवी, विचारवंत, डॉक्टर, प्राध्यापक, शिक्षकांमधून लोकजागरच्या माध्यमातून नवीन पर्याय दिला जाणार आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनात अग्रभागी असलेले शेतकरी नेते, शेतकऱ्यांच्या मुलांनी देशाचे नेतृत्व करावे ही लोकजागरची भूमिका आहे, असे त्यांनी सांगितले. आठ कलमी कार्यक्रमाची घोषणाही प्रा. वाकुडकर यांनी या वेळी केली. हा आठ कलमी कार्यक्रम हाच लोकजागरचा जाहीरनामा राहणार असल्याचे वाकुडकर म्हणाले. श्रमिक पत्रकार भवनात झालेल्या पत्रकार परिषदेला लोकजागरचे महासचिव महादेव मिरगे, अशोक गायगोले, रमेश घोडे, प्रवीण राऊत उपस्थित हाेते. 


तीन महिन्यात करणार 'गाव तेथे उद्योग' मॉडेल 
उद्योगाची निर्मिती झाल्यास गावाकडे विविध संसाधने आपोआप येतात. गावांचा विकास व्हायचा असेल तर उद्योगाची नितांत गरज आहे. आगामी निवडणुकीत आठ कलमी कार्यक्रमाचा भाग असलेला प्रयोग 'गाव तेथे उद्योग' पुढील तीन महिन्यात साकारणार असल्याचे वाकुडकर यांनी सांगितले. 


असा आहे आठ कलमी कार्यक्रम 
१. झिरो बजेट लोकशाही 
२. गाव तेथे उद्योग 
३. कृषी धर्म, कृषी संस्कृती 
४. सामाजिक सरकार, सामाजिक उद्योग 
५. मोफत शिक्षण, मोफत आरोग्य 
६. संपूर्ण गाव एक परिवार 
७. युवा भारत, नवा भारत 
८. जलद न्यायालये, पारदर्शी न्याय 

बातम्या आणखी आहेत...