आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात सरकार प्रायोजित दंगली घडवल्या जात आहेत का? राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांचा सवाल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- राज्यात अनेक ठिकाणी दंगली घडत आहेत. औरंगाबाद आणि कोरेगाव भीमा येथे दंगल घडली. औरंगाबादेत अफवा पसरवण्यात आल्या. गाड्या फोडल्या गेल्या, आर्थिक नुकसान करण्यात आले. पोलिसांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली. जे लोक दंगल करत होते त्यांच्यासोबत काही व्हिडिओमध्ये पोलिस दिसले. या दंगलीत सहभागी होण्याचे हायकमांडकडून काय आदेश होते का, हे या सभागृहात स्पष्ट व्हायला हवे. पोलिसांना दंगल नियंत्रित करण्याचे आदेश होते की दंगल भडकवण्याचे हे स्पष्ट व्हायला हवे, अशी मागणी करतानाच सरकार प्रायोजित दंगली आता महाराष्ट्रात घडवून आणल्या जात आहेत की   काय, अशी शंका लोकांच्या मनात निर्माण होऊ लागल्याची भीती राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी मंगळवारी नियम २९३ च्या प्रस्तावावर विधानसभेत बोलताना व्यक्त केली.  

 
पाटील म्हणाले, राईनपाडा येथे संतप्त जमावाने निर्दोषांची हत्या केली. असे महाराष्ट्रात कधी घडले नव्हते. राज्यातील सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम सरकार करत आहे. सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवर मुख्यमंत्री काय कारवाई करतील, याचे उत्तर मिळायला हवे. जे लोक मोदी यांच्याविरोधात बोलतात किंवा सोशल मीडियावर व्यक्त होतात त्यांना पोलिसांमार्फत नोटीस बजावली जाते. देशभरात दलित, अल्पसंख्याक यांच्यावर हल्ले होत आहेत. सत्ताधारी दोन समाजात फूट पाडण्याचे काम करत आहेत. त्यामुळे दलित व अल्पसंख्याक समाजात भीती निर्माण झाली आहे. सामाजिक कार्यकर्ते, वकील अशा लोकांना पुण्यातून अटक करण्यात आली. आंबेडकर चळवळीतील लोक, मार्क्सवादी लोक, कम्युनिस्ट पक्षाचे लोक सर्वच लोक या सरकारवर नाराज आहेत हे आपण मान्य केलेच पाहिजे, असेही जयंत पाटील म्हणाले.   


गौरी लंकेश यांची हत्या करून मारेकरी  परशुराम वाघमारे महाराष्ट्रात लपला. हत्या करून महाराष्ट्रात लपण्याची एक नवीन प्रथा महाराष्ट्रात रूढ होत आहे की काय, अशी शंका आमदार जयंत पाटील यांनी बोलून दाखवली. शुक्रवारच्या आत विश्वास पाटील यांची ३३ प्रकरणे पटलावर ठेवावीत; अन्यथा आम्ही हक्कभंग आणू, असा इशाराही आमदार जयंत पाटील यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना या वेळी दिला.


मुख्यमंत्र्यांनी स्वतंत्र गृहमंत्री नेमावा
राज्याची कायदा-सुव्यवस्था बिघडली आहे. मुख्यमंत्र्यांनी एक स्वतंत्र गृहमंत्री नेमायला हवा. मुख्यमंत्र्यांना कदाचित मंत्रिमंडळावर वचक ठेवायचा असेल म्हणून त्यांनी स्वतंत्र गृहमंत्री ठेवला नाही आणि विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांना कुणावर जबाबदारी टाकायचीच नाही असे वाटते. मुख्यमंत्र्यांकडे वेळ नाही. त्यांच्याकडे कामाचा व्याप मोठा आहे. म्हणून गृहखात्याकडे त्यांना लक्ष देता येत नाही.  कोरेगाव भीमा  दंगलीतील साक्षीदार पूजा सकट हिचा मृतदेह विहिरीत आढळला. या प्रकरणाचा तपास व्हायला हवा. पूजा सकट हिची हत्या करण्यात आली आहे का, याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही जयंत पाटील यांनी केली. 

बातम्या आणखी आहेत...